गौतम गंभीरला 6 दिवसात तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी - दिल्ली पोलीस

माजी क्रिकेटकर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांना गेल्या सहा दिवसात तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. 'ISIS काश्मीर'कडून ही धमकी मिळाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.

पहाटे एक वाजून 37 मिनिटांनी आलेल्या ईमेलमध्ये म्हटलंय की, "तुमचं दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता (डीसीपी) सुद्धा माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत. आमचे हेर दिल्ली पोलिसातही हजर आहेत. तुमच्याबद्दल सर्व माहिती मिळत आहेत."

याआधी गौतम गंभीर यांना गेल्या मंगळवारी आणि बुधवारी अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

दिल्ली पोलिसांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या धमक्यांबाबत तपास सुरू करण्यात आलाय.

गंभीर यांचे खासगी सचिव गौतम अरोरा यांनी तक्रार दाखल केली असून, त्यात म्हटलंय की, "गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची पहिली धमकी त्यांच्या अधिकृत ईमेलद्वारे मंगळवारी 9 वाजून 32 मिनिटांनी मिळाली होती. ISIS काश्मीर नावानं पाठवलेल्या धमकीत लिहिलं होतं की, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मारणार आहोत."

डीसीपी श्वेता चौहान (सेंट्रल दिल्ली) यांनी सांगितलं की, "ही तक्रार मिळाल्यानंतर गौतम गंभीर यांची खासगी सुरक्षा वाढवण्यात आलीय. त्याचसोबत राजेंद्र नगर भागातील त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षाही वाढवण्यात आलीय. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत."

त्यानंतर दिल्ली पोलिसांच्ये स्पेशल सेलच्या इंटेलिजियन्स फ्युजन व स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स यूनिटने गूगलशी संपर्क करून ईमेल अकाऊंट वापरणाऱ्याच्या नोंदणीकृत अकाऊंटची माहिती मागितली आहे.

तक्रारदाराच्या माहितीनुसार, गंभीरला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये गंभीरच्या घराचा एक व्हीडिओही होता.

या धमकीत असं लिहिलंय की, "आम्ही तुला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र वाचलास. जर तुला तुझं आयुष्य प्रिय असेल तर राजकारण आणि काश्मीरच्या मुद्द्यापासून दूर राहा."

क्रिकेटर ते भाजप खासदार

धडाकेबाज फलंदाजी आणि परखड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध गौतम गंभीरने क्रिकेटमधून डिसेंबर 2018 मध्ये निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 37 वर्षीय गंभीरने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर गंभीरनं दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. सध्या तो भाजप खासदार म्हणून कार्यरत आहे.

2007 मध्ये ट्वेन्टी-20 वर्ल्डकप तर 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप भारताला जिंकून देण्यात गंभीरचा मोलाचा वाटा होता. 2011 वनडे वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत गंभीरने दडपणाच्या क्षणी साकारलेल्या 97 धावांच्या खेळीने भारताच्या विश्वविजयाचा पाया रचला होता.

''अत्यंत जड अंत:करणाने आयुष्यातला सगळ्यात कठीण असा हा निर्णय घेतला आहे'' असं गंभीरने ट्वीटर आणि फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं.

गंभीरने 58 टेस्ट, 147 वनडे आणि 37 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं.

गंभीर आणि सेहवाग या बिनीच्या जोडीने टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 प्रकारात भारतीय संघाला दमदार सलामी देत संघाच्या विजयाच निर्णायक भूमिका बजावली होती.

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत गंभीर सुरुवातीला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. काही वर्षांनंतर कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानची सहमालकी असलेल्या कोलकाता संघाला IPL जेतेपद मिळवून देत गंभीरने आपल्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब केलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी गंभीरला 2008 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 मध्ये गंभीरने ICCच्या टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. त्याचवर्षी ICCने सर्वोत्कृष्ट टेस्ट प्लेयर म्हणून गंभीरला सन्मानित केलं होतं.

दिल्लीकर गंभीरने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत असताना स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीतर्फे खेळताना 15,000 हून धावा केल्या आहेत.

क्रिकेट खेळतानाच अनेक सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी गंभीर प्रसिद्ध आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि गंभीर यांच्यादरम्यानही अनेकदा वाद झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)