You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमात उत्तर भारतीयांशी संवाद साधला.
प्रथमच हिंदीतून केलेल्या या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे मांडले. या मुद्द्यांचा नेमका अर्थ आणि त्यामागची राजकीय भूमिका काय आहे? सातत्याने उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन करणाऱ्या राज ठाकरेंना असं संबोधित करण्याची वेळ का आली असावी?
याच बाबत बीबीसी मराठीनं वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली.
उत्तर भारतीयांना टाळून चालणार नाही
दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांना राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत विचारलं, तेव्हा ते म्हणाले,
"राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांबरोबर संवाद करावासा वाटला ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात जाऊन राम मंदिराच्या मुद्दयावर तिथल्या जनतेचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एका उत्तर भारतीय संघटनेबरोबर संवाद साधला आणि हिंदीत भाषण केलं.
"भाषणाच्या शेवटी मराठी माणसांचं हित तर मला जपायचं आहे, पण त्याचबरोबर तीन चार पिढ्या इथे राहणारे जे उत्तर भारतीय आहे त्यांच्याबाबत मी विचार करतो हा संदेश दिला. उद्धव ठाकरे यांनी दोन हजारच्या दशकामध्ये मी मुंबईकर अभियान राबवून जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता तोच संदेश राज यांनी 2018 मध्ये दिलेला आहे.
संदीप प्रधान पुढे सांगतात,
"1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीवासियांसाठी मोफत घराची योजना राबवली होती ती परप्रांतियांचे लोंढे येण्यास कारणीभूत ठरली ही कबुली राज ठाकरे यांनी दिली. त्या काळी प्रभावशाली नेते असूनही आज इतक्या वर्षांनंतर ते या योजनेबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत ती एक मोठी गोष्ट आहे.
"उद्धव आणि राज यांना एक गोष्ट लक्षात आली आहे की त्यांच्या भागात म्हणजे मुंबई, ठाणे किंवा नाशिक या भागात राजकारण करायचं असेल तर मराठी मराठी करून चालणार नाही. विविध शहरात येऊन कष्ट करणारा उत्तर भारतीय वर्गाची एकगठ्ठा मतं मिळाली तर त्यातच आपलं राजकीय हित आहे ही जाणीव राज ठाकरे यांना झाली आहे.
प्रादेशिकतेचा मुद्दा पुढे आणायचा आहे.
शिवसेनेने अयोध्येला जायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा स्पर्धक म्हणून जन्माला आलेल्या मनसेने उत्तर भारतीयांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. राज ठाकरे यांनी आजवर जे मुद्दे उपस्थित केले तेच त्यांनी हिंदी भाषेत मांडले, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर सांगतात.
"राज यांनी बोलताना भारतातील काही ज्येष्ठ नेत्यांची उदाहरण दिली. त्यात इंदिरा गांधीचं उदाहरण दिलं. आपला मुद्दा पटविण्यासाठी नोकरभरतीची जाहिरात उत्तर प्रदेशात का असते अशा प्रकाराचे मुद्दे उपस्थित केले. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना प्रादेशिकता राज यांना पुन्हा पुढे आणायची आहे त्याचाच हा प्रयत्न दिसतो," त्या पुढे म्हणाल्या.
मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांत जे भाषिक स्थित्यंतर झालं त्याचा लाभ भाजपनं महापालिका निवडणुकीत घेतला होता. झोपडी आणि चाळींमध्ये राहणारी परप्रांतीय मतं भाजपाकडे वळली असं म्हणता येईल. त्यामुळे राज यांची भूमिका या चाळींपर्यंत गेली तर त्यांना आपल्यासाठी लढणारा कोणी आला आहे, अशी भावना त्यांच्या मनात रुजली आहे का, याची चाचपणी करण्याची गरज नानिवडेकर व्यक्त करतात.
"परप्रांतियांना पुन्हा एकदा आपण परके आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी नव्याने सुरू केलेल्या प्रयत्नांत ध्रुवीकरण करू शकतात का, त्यांच्याकडे त्या ताकदीचे नेते म्हणून बघितलं जाईल का ते कळेलच. आघाड्यांचं राजकारण या निवडणुकीत अपरिहार्य असेल तर राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन देणारा कोणी आहे का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल,"असंही त्या पुढे सांगतात.
आघाडीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न
राज ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 13 वरून जवळपास शुन्यावर गेली आहे. पुढच्यावर्षी त्यांना पुन्हा हा आकडा गाठायचा आहे. असं झालं नाही तर पक्षाचं अस्तित्वच उरणार नाही. ज्या मतदारांना त्यांनी नाराज केलं त्यांच्यासमोर प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मत सकाळ टाइम्सचे संपादक रोहित चंदावरकर यांनी व्यक्त केलं.
"विरोधी पक्षांबरोबर युती करण्यासाठीही त्यांची चाचपणी सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल. आघाडीसाठी आपला चेहरा स्वीकारला जावा अशी त्यांची धडपड सुरू आहे. बाळासाहेबांच्या योजनेवर राज यांनी पहिल्यांदाच टीका केली आहे. ती का केली याचा विचार करणं गरजेचं आहे," असं ते म्हणाले.
अशा प्रकारच्या संवादाची गरज
राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांशी संवाद साधण्याच्या पावलाचं मी स्वागत करतो. असं मत नवभारत टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार मनीष झा यांनी व्यक्त केलं आहे.
"अशा प्रकारचा संवाद व्हायला हवा. भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी प्रामुख्याने मिळायला हव्यात या त्यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. मात्र त्याचवेळी मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या उत्तर भारतीयांमध्ये दहशत पसरविण्याचं राजकारणही त्यांनी करू नये. अशा पद्धतीने मनसे दीर्घकालीन राजकीय खेळी करू शकत नाही. त्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी दबाव टाकायला पाहिजे. त्यात त्यांना अपयश आलं आहे," असं झा यांना वाटतं.
मनसे हा नेहमीच गोंधळलेला पक्ष
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना मनसे हा नेहमीच गोंधळलेला पक्ष वाटतो.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मनसेचे राजकीय आराखडे नेहमी चुकत आले आहेत. त्यांच्याबाबतीत गांभीर्याने घेण्यासारखं काही नाही. 2006मध्ये पक्षाची स्थापना झाली तेव्हा मराठी हा मुद्दा कुठेच नव्हता. दोन वर्षानंतर त्यांनी हा मुद्दा उचलला. त्यानंतर उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांना मारहाण सुरू केली. गेल्यावेळेस नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. नंतर मोदींच्याविरोधात गेले. दरवेळेस ते उघडे पडत गेले."
मनसेला आघाडीत सामावून घेण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होईल, असं काँग्रेसला वाटतं का? याविषयी बोलताना सावंत यांनी मनसेला काँग्रेसचा नेहमी विरोध राहील असं स्पष्ट केलं.
कोणताही राजकीय अर्थ काढू नका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे या कार्यक्रमामागे कुठलाही राजकीय अर्थ काढू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
उत्तर प्रदेश महापंचायतचे काही पदाधिकारी मला भेटले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातून हा कार्य्रकम आकारास आला. बऱ्याचदा राज ठाकरे यांचं मराठी भाषण हिंदी माध्यमांमध्ये चुकीचा अर्थ काढून दाखविली जातात. त्यामुळे राज ठाकरे यांनी थेट हिंदीतूनच संवाद साधला, असं ते म्हणाले.
"आघाडीमध्ये जायचं किंवा इतर कुणाबरोबर आघाडी करायची याचा निर्णय तर राज ठाकरेच घेणार आहेत. पण सध्यातरी आम्ही कुणासोबत जाऊच असं नाही," असं देशपांडे यांनी पुढे स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)