मुंबई: 17 वर्षांच्या मुलाशी लग्न करणारी 20 वर्षीय तरुणी अटकेत

    • Author, भूमिका राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुंबईत 20 वर्षांच्या एका तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणीवर 17 वर्षांच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या तरुणीने या मुलाशी लग्न केल्याचा दावा केला आहे. या तरुणीला 5 महिन्यांची मुलगी असून ती तिच्या बाळासह भायखळ्यातील तुरुंगात आहे.

पोक्सो (बाल अत्याचार प्रतिबंध कायदा) कायद्यातील तरतुदींनुसार तिला अटक करण्यात आली. सध्या ही तरुणी तिच्या बाळासह भायखळ्यातील तुरुंगात आहे. तिनं जामीन अर्ज केला आहे पण तिला जामीन मिळालेला नाही.

मुलाच्या कुटुंबीयांनी या तरुणीविरोधात एका वर्षांपूर्वी तक्रार नोंदवली होती. मुंबईच्या कुर्ला पोलिसांनी तिला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अटक केली. कुर्ला पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ही तक्रार एका वर्षापूर्वी नोंदवण्यात आली होती. मात्र हा विषय संवेदनशील असल्यामुळे जपून पावलं उचलावी लागली, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की FIRच्या आधारावर या तरुणीला अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

मुलावर लैंगिक शोषण झालं आहे अशी तक्रार मुलाच्या आईने 23 नोव्हेंबर 2017ला केली होती. तर महिलेचं म्हणणं आहे की तो मुलगा तिचा पती आहे.

ही महिला 20 वर्षांची आहे. आणि तिचं याआधी दोनदा लग्न झालं आहे असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. या तरुणीच्या जबाबानुसार हा अल्पवयीन मुलगा गेली 2 वर्षं संपर्कात होता.

मुलाच्या आईने या तरुणीचं पूर्वी लग्न झालं होतं असा दावा केला आहे. या तरुणीने आपल्या मुलाला फसवून लग्न केला, असा दावा आईने केला आहे.

मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणीवर अपहरण, धमकी देणे, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्यांतील तरतुदींनुसार गुन्हा नोंद झाला आहे.

या तरुणीने मुंबईतील न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये तिने या मुलाशी लग्न केल्याचं आणि त्याच्यापासून 5 महिन्यांची मुलगीही झाली असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)