You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्येष्ठांचा प्रणय आपल्याला एवढा का खटकतो? : ब्लॉग
- Author, पल्लवी बर्नाल
- Role, अॅडल्ट एज्युकेटर
पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा...
वय वाढलं की लोक निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग करायला लागतात. आपलं आयुष्यही याच साच्यातून जातं ना... शिक्षण, नोकरी, आणि मग एक निवांत आयुष्य.
उत्तम रिटायरमेंट प्लॅन, बाजारात मिळणारं आरोग्यदायी खाणं, उत्तम आरोग्यसेवा आणि भरपूर बँक बॅलन्स. हे सगळं असलं की 'श्रमसाफल्य' किंवा 'सावली' असं आपल्या घराचं नाव ठेवून वयस्कर लोक निवांत आयुष्य जगायला मोकळे असंच आपल्याला वाटतं.
हे सगळं गरजेच आहेच. पण कधी विचार केलाय की ज्येष्ठांचा 'त्या' गरजांचं काय ज्यांच्याबद्दल आजही चारचौघांत बोलणं म्हणजे पाप समजलं जातं?
ज्येष्ठांच्या लैंगिक गरजांविषयी सगळीकडे अळीमिळी गुपचिळीच पाळली जाते. आपले आजी-आजोबाही सेक्स करत असतील असा विचार किती जणांच्या मनात येतो?
'बधाई हो' चित्रपट अशाप्रकारच्या संबंधांवरती भाष्य करतो.
आपल्या संस्कृतीत आयुष्याच्या या टप्प्याला वानप्रस्थाश्रम म्हटलं आहे. या पुढचा टप्पा म्हणजे संन्यास. वानप्रस्थाश्रमात आपल्या जबाबदाऱ्या हळूहळू मुलांकडे सोपवायच्या. आपल्या संपत्तीचा योग्य विनियोग करायचा आणि संसारातून लक्ष काढून घ्यायचं आणि सरतेशेवटी सर्वसंगपरित्याग करून ईश्वराच्या आराधनेत वेळ घालवायचा.
म्हणजे आयुष्यातल्या साध्या साध्या इच्छांसाठीही स्कोप नाही, सेक्सची तर बातच नको.
पण ज्येष्ठांना लैंगिक भावनाच नसतात, असा समज का?
80 वर्षांच्या हॉलिवुडच्या अभिनेत्री ज्युडी डेंच एक मुलाखतीत म्हणतात, "सेक्स आणि खोडकरपणा आयुष्यात खूप गरजेचे आहेत. याची इच्छा कधीच कमी होत नाही."
प्लेबॉय मासिकाचे संस्थापक ह्यू हेफ्नर यांनी 86व्या वर्षी लग्न केलं. आपल्याकडे अशी किती लग्न दिसतात?
भारतीय समाजात ज्येष्ठांच्या कामेच्छांना हीन नजरेने पाहिलं जातं. चित्रपटांमध्येही प्रणय करताना फक्त तरुण जोडपीच दाखवली जातात. हिरो 55 वर्षांचा असेल तर केस रंगवून, चेहऱ्यावर मेक-अप थापून त्याला तरुण दाखवायचा प्रयत्न केला जातो.
वयस्कर हिरोईन ही तर कविकल्पनाच आहे.
अर्थात, 'वन्स अगेन' आणि 'चिनी कम' अशा चित्रपटांनी ज्येष्ठांच्या लैंगिक इच्छांच्या विषयाला हात घातला. पण समाजाने या चित्रपटांनाही सहजपणे स्वीकारलं नाही, मग खऱ्याखुऱ्या आयुष्यात हा विषय स्वीकारण्याचा प्रश्न लांबच राहिला.
ज्येष्ठांचे अनुभव काय?
चेन्नईत राहाणाऱ्या 64 वर्षांच्या गोविंदराजांच्या बोलण्यातून कडवटपणा झळकतो. ते म्हणतात, "सोशल मीडिया आणि डेटिंग साईटवर मी अनेक महिलांच्या संपर्कात आहे. पण जेव्हा नात्यात शरीरसंबंधांचा विषय येतो तेव्हा याच महिला आश्चर्य व्यक्त करतात. त्यांना वाटतं की माझ्या वयाच्या मानाने मी जास्तच बोल्ड आहे."
वल्लभ कन्ननांनी 60 पावसाळे पाहिलेत. त्यांच्या लग्नाला 28 वर्षं झाली आहेत आणि त्यांचं लैंगिक आयुष्य समाधानी आहे. पण पत्नीसोबत प्रणय करताना त्यांच्या डोक्यावर कायम भीतीची एक टांगती तलवार असते की चुकून मुलांच्या नजरेत नको यायला.
त्यांची मुलं आपल्या आईवडिलांचा रोमान्स पाहून अस्वस्थ होतात आणि कित्येकदा तर त्यांच्यावर डाफरतात.
वल्लभ सांगतात, ते एकदा आपल्या पत्नीबरोबर बागेत फिरायला गेले होते. दोघांनी एकमेकांचा हात धरला होता. येणारा-जाणारा प्रत्येक जण त्यांच्याकडे वळून वळून पाहात होता जणू काही ते काही अश्लील कृत्य करत होते.
उत्तर भारतात अजून प्रतिबंध?
उत्तर भारतात जिथे तरुणांना खुलेपणाने प्रेम करण्याची अनुमती नाही तिथे वृद्धांची काय कथा.
पंजाबात राहाणाऱ्या 65 वर्षांच्या सुरेंद्र यांच्या वैवाहिक जीवनात सेक्स उरला नाहीये. पण त्यांना लैंगिक इच्छा तर अजूनही आहेत.
ते खुलेपणाने या विषयावर काही बोलू शकत नाहीत म्हणून मनोराज्यांचा आधार घेतात. ते म्हणतात, "मी कधी बाजारात गेलो आणि एखादी सुंदर मुलगी दिसली तर ती दिवसभर डोक्यात राहाते."
असे अनुभव पाहात प्रश्न पडतो की, असेक्शुअल आयुष्य जगणाऱ्या वृद्धांची संख्या आपल्या समाजात जास्त आहे का?
वृद्धापकाळात हवी स्थिरता
माधवी कुकरेजा 55 वर्षांच्या सिंगल मदर आहेत. त्या न कचरता सरळ सांगतात की, "मी सेक्शुअली सक्रिय आहे. तुम्ही तरुण असता तेव्हा सेक्शुअल आयुष्यात वेगवेगळे प्रयोग करावेसे वाटतात. त्यावेळेस कदाचित तुम्ही अनेक जणांशी संबंध बनवू शकता. पण जसं वय वाढतं तशी तुम्हाला स्थिरतेची गरज भासते."
माधवी यांचं पहिलं लाँग टर्म रिलेशनशिप 10 वर्षांपूर्वी सुरू झालं. तेव्हा त्या 45 वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांना आपल्या घरातूनच विरोध झाला होता. त्यांच्या आईने त्यांना विचारलं होतं, "तुला आता नव्या नात्याची काय गरज आहे?"
मेनॉपॉजच्या दरम्यान शरीरात झालेल्या काही हार्मोनल बदलांमुळे माधवी यांचं सेक्शुअल आयुष्य अनियमित झालं होतं. पण त्यानंतर ते सुरळीत झालं.
वाढत्या वयाबरोबर लैंगिक जीवनात काही बदल जरूर होतात पण ज्येष्ठांना कधी सेक्स करूच नये, ही समजूत चुकीची आहे.
तुमची तब्येत ठणठणीत असेल, खाणंपिणं चांगलं असेल आणि तुम्ही अॅक्टिव्ह असाल तर तुमच्या लैंगिक जीवनात काहीही बदल होणार नाही.
वय वाढलं तरी सेक्शुअली अॅक्टिव्ह राहाण्याचे फायदे अनेकांना माहितीच नसतात.
वृद्धापकाळातला सेक्स कसा आरोग्यदायी?
सेक्समुळे तुमच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि एन्डोर्फिनसारखे हार्मोन्स वाढतात. ऑक्सिटोसिन तुमचा स्ट्रेस कमी करतं. इतकंच नाही तर हाय ब्लडप्रेशर आणि हार्टअॅटॅकच्या संभावनाही कमी करतं.
एन्डोर्फिन एक नैसर्गिक वेदनाशामक आहे.
म्हातारपणात अनेक त्रास होतात जसं की, कंबरदुखी, सांधेदुखी आणि गुडघेदुखी. अशा त्रासांमध्ये एन्डोर्फिन उपयुक्त आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या मेनोपॉजनंतर नको असलेल्या गर्भधारणेचा धोका टळतो. त्यामुळे दोन वयस्कर व्यक्ती कोणत्याही गर्भनिरोधक साधनांशिवाय लैंगिक आनंद उपभोगू शकतात.
शारीरिक फायदेच नाही तर सेक्स तुमच्या मानसिक आरोग्यात आणि जीवनशैलीत एक महत्त्वाची भूमिका बजावतो. फक्त लैंगिक संबंध सुरक्षितरीत्या आणि सहमतीने ठेवले पाहिजेत.
मग 'अवघे पाऊणशे वयोमान' का असेना...
(पल्लवी अॅडल्ट एज्युकेटर आहेत. या लेखात व्यक्त केलेले विचार लेखिकेचे वैयक्तिक आहेत. यातली तथ्यं आणि विचार बीबीसीचे नाहीत आणि बीबीसी त्यांची जबाबदारी घेत नाही.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)