'शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही'

विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी पुन्हा मुंबईत उतरले आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता ठाण्याहून निघालेला हा 'लोकसंघर्ष मोर्चा' मुंबईत संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे.

'बुधवारी (21 नोव्हेंबर)संध्याकाळी वसंतदादा पाटील इंजिनिअर कॉलेज, चुनभट्टी येथे शेतकऱ्यांची जाहीर सभा घेऊन त्याठिकाणी मुक्काम केला जाईल. तर गुरुवारी (22 नोव्हेंबर) रोजी आझान मैदानावर ठिय्या आंदोलन केल जाणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', अशी माहिती लोक संघर्ष मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

मोर्च्याच्या मागण्या काय आहेत?

1) उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा म्हणजे शेतमालाला दीडपट हमी भाव हवा. त्यासाठी न्यायिक व्यवस्थेची उभारणी करा.

2) शहर आणि शेतीला समान प्रमाणात वीज द्या.

3) वन अधिकारांची पुरेपूर अंमलबजावणी करा.

4) बेकायदेशीररित्या आदिवासींच्या वन हक्कांचे दावे रद्द करू नका.

5) यावर्षी दुष्काळामुळे करपलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या.

6) वन हक्क कायद्यांतर्गत पट्टा मिळालेल्या शेतकऱ्यांना लवकर सातबारा द्या. त्यांना विनाअट विविध कार्यकारी सोसायटी आणि मार्केट कमिटीचे सभासद बनवा.

7) सर्व दुष्काळी गावांना 2 आणि 3 रुपये किलो अशा दराने रेशनचे धान्य द्या.

8) जनावरांना चाऱ्याची तरतूद करा.

9) 100 टक्के आदिवासी गावांचा अनुसुचित सुची 5 मध्ये समावेश करण्यासाठी केंद्राला शिफारस करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)