You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्धा : पुलगावमधल्या लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ स्फोट; 6 ठार, 10 जखमी
- Author, नितेश राऊत, सुरभी शिरपूरकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
वर्धा येथील पुलगावमधील लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ झालेल्या स्फोटात 6 ठार झाले आहेत. यातील 4 जाणांचा जागीच तर 2 जणांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींची संख्या 10 इतकी आहे.
वर्ध्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली.
पुलगावमध्ये भारतीय लष्करासाठीच्या दारूगोळ्याचं भांडार आहे. या भांडाराच्या बाजूला असलेल्या खुल्या मैदानात हा स्फोट झाला. जुनी स्फोटक नष्ट करण्यासाठी भांडाराच्या मालकीची स्वतंत्र जागा आहे.
सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी हा स्फोट झाला अशी माहिती संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्फोटक उतरवताना हा स्फोट झाला असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी लष्कराच्या तज्ज्ञाचं पथक रवाना झालं आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
1. खमारिया आणि जबलपूर इथली जुनी स्फोटकं नष्ट करताना हा स्फोट झाला.
2. जखमी आणि मृतांतील काही लोक प्रशिक्षित तर काही अप्रशिक्षित कामगार होते.
3. स्फोटकं नष्ट करण्यासाठी खड्डा खणून त्यात स्फोटक ठेवली जातात. त्यानंतर त्यावर वाळूची पोती ठेवलेली जातात. हे काम अप्रशिक्षित कामगारांकडे असते.
4. हा स्फोट स्फोटक उतरवत असताना झाला अशी माहिती स्फोटावेळी तिथं असणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.
सोनगाव इथलं ग्रामस्थ राजेश टेकाम म्हणाले, "स्फोटकं निकामी करण्याचं काम खासगी कंत्राटदारांकडे आहे. त्यांनी गावातील काही लोकांना या कामावर घेतलं होतं. स्फोटकं उतरवताना हा स्फोट झाला."
जनसंपर्क अधिकारी कॅप्टन बी. बी. पांड म्हणाले, "मृतांमध्ये एक व्यक्ती शस्त्र भांडारातील कर्मचारी आहे. तर इतर सर्व खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी आहेत. चंद्रपूर ऑर्डन्स फॅक्टरीतील तज्ज्ञांचं पथक पुलगावला येत असून त्यांनी पाहाणी केल्यानंतर स्फोट नेमका कसा झाला ते सांगता येईल."
जुनी आणि निरुपयोगी स्फोटक निकामी करताना हा स्फोट झाला असं ते म्हणाले. या प्रक्रियेसाठी खड्डा खोदण्याचं आणि खड्ड्यात स्फोटकं ठेवल्यानंतर त्यावर वाळूचे पोती ठेवली जातात, हे काम कंत्राटदारांच्या कामगारांकडे होते, असं ते म्हणाले.
2016चा स्फोट
पुलगाव इथल्या दारूगोळा भांडारात 31 मे 2016ला झालेल्या स्फोटात 17 जण ठार झाले होते. या भीषण स्फोटानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले होते.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)