You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टिपू सुलतान जयंतीवरून कर्नाटकात राजकारण पेटलं - #5मोठ्याबातम्या
आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात -
1. कुमारस्वामी यांची भूमिका दुतोंडी-भाजप
टिपू सुलतान या माजी शासकाच्या जयंतीवरून कर्नाटकात वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काही हिंदुत्ववादी गटांनी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर आक्षेप घेतला असून, सरकारी कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली आहे. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील हुबळी आणि धारवाड या शहरांमध्ये पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यक्रमातून माघार घेतल्यामुळे कुमारस्वामी यांचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे अशी टीका भाजपने केली आहे. NDTVने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राज्य सरकारने यापूर्वीच टिपू सुलतान जयंतीनिमित्त राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणाऱ्या कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी कितीही आंदोलनं केली तरी कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय हा जयंतीचा कार्यक्रम होईल असं कर्नाटक सरकारने म्हटलं आहे.
राज्याच्या हितासाठी सरकारने हा कार्यक्रम थांबवायला हवा. टिपू सुलतानची जयंती साजरी करून सरकार केवळ मुस्लिम समाजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे असं कर्नाटकचे भाजप अध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा यांनी म्हटलं आहे.
2. भारतीय महिलांची विजयी सलामी
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध 34 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकप मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.
ट्वेन्टी-20 प्रकारात शतक झळकावणारी हरमनप्रीत कौर पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. महिला ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमध्ये शतक साकारणारी हरमनप्रीत केवळ तिसरी खेळाडू आहे. तिने 51 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 103 धावांची धुवांधार खेळी केली.
जेमिमा रॉड्रिग्जने 45 चेंडूत 7 चौकारांसह 59 धावा करत तिला चांगली साथ दिली. हरमनप्रीतच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 194 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 160 धावा केल्या. सुजी बेट्सने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. भारतातर्फे हेमलता आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. हरमनप्रीतला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
3. शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्यासाठी काँग्रेस मैदानात- मोदी
ज्या लोकांच्या मुलांच्या हातात लेखणी असायला हवी. मात्र राक्षसी मनोवृत्तीचे लोक त्यांच्या हातात बंदुका देत आहेत. शहरी नक्षलवादी अशाप्रकारचे जीवन जगत आहेत आणि आदिवासी मुलांचे जीवन उद्धव्स्त करत आहेत. काँग्रेसचे लोक अशा शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सकाळने याबाबत बातमी दिली आहे.
छतीसगढमधल्या बस्तर या नक्षलग्रस्त भागातील प्रचारसभेत मोदी बोलत होते. नक्षलवादी वातानुकुलित खोलीत बसतात. त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात. पण ते रिमोट कंट्रोल पद्धतीद्वारे आदिवासी तरुणांचे आयुष्य उद्धव्स्त करत आहेत. अशा शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस का पाठिंबा देत आहे? पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात अशी टीका मोदी यांनी केली.
4. अवनीच्या मृत्यूप्रकरणी समिती स्थापन
टी-1 अर्थात अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती स्थापना करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील यांच्या अध्यतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरिया हे या समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. 'एबीपी माझा' वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.
टी1 वाघिणीच्या मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्वं तसंच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबली गेली की नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करतील.
5. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन
साचेबद्ध प्रतिमांना झुगारुन देत बंडखोर मात्र आशयघन भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पुण्यात निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. कमला, गिधाडे, सखाराम बाईंडर, रथचक्रसारख्या नाटकात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत बातमी दिली आहे.
नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भूमिकांमधून त्यांनी केवळ केवळ मनोरंजनावर भर न देता सामाजिक संदेश देण्यावर भर दिला. नाटकांमागील नाट्य, मी आणि माझ्या भूमिका, जगले जशी, बहारदार किस्से अशी पुस्तकंही त्यांनी लिहिली. कणकवली येथे झालेल्या 87व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)