दुष्काळातली दिवाळी : ‘एका एकरात एक गोणीच बाजरी झालीय, दिवाळीचं नावच काढू नका’

फोटो स्रोत, BBC/PrashantNanavare
- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुढील सहा-आठ महिने चटणी-भाकरी खायला मिळाली तरी खूप झालं. यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे धान नाही. दिपवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपलेय पण मालकाकडं कोणत्या तोंडानं काय मागावं?
पीक नीट आलं तर तीच आमच्यासाठी दिवाळी. यंदा पीक-पाणी नसताना दिवाळसण काय साजरा करणार? कडुबाई त्यांच्या हातातला कोऱ्या चहाचा पेला माझ्या हातात ठेवतात आणि एक कोपऱ्याला बसून आपली व्यथा सांगतात.
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्तांच्या यादीत बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्याचाही समावेश आहे. तिथल्याच वडगाव ढोक गावात जाऊन शेतकरी दिवाळीची काय तयारी करतायत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण गावात कुठेच दिवाळीचा उत्साह नाही.
शेती सुकून गेल्यामुळे गावातली अर्ध्याहून अधिक मंडळी गाव सोडून कारखान्यावर कामाला गेलेली आहेत. त्यामुळे आता गावात फक्त वृध्द महिला, पुरूष आणि लहान मुलंच मागे राहिलेली दिसतात.
कडुबाई म्हणाल्या, "यंदा गोड काहीच केलं नाही. नातवंड रोज मागे लागतात हे आणा, ते आणा पण कशाने आणावं? चटणी-भाकर, ठेचा-भाकर हेच खायचं आता. सण कशाचा करता?"
सावकार म्हणतात, तुम्ही पैसे कसे फेडणार?

फोटो स्रोत, BBC/PrashantNanavare
गावातले वृध्द शेतकरी उध्दव यादवराव गीते सांगतात, "यंदा दिवाळीचा सण होणारच नाही. दिवाळी साजरी करायला पैसा पाहिजे. पेरणीचा खर्च होऊन बसला. छोट्या शेतकऱ्याच्या दहा हजारापासून मोठ्या शेतकऱ्याचे तीन लाखापर्यंत पैसे गेले. पण हाताला काहीच लागलं नाही."
"दिवाळीसाठी हातात पैसेच नाहीत. सामान कसं आणावं. कुणी उधारी देत नाही. सगळ्यांनी सावकारक्या बंद केल्यात. सावकार म्हणतात तुम्ही पैसे कसे फेडणार? त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. त्यामुळे कपडालत्ता घेतला नाही. आता बाराही महिने बनियनवर राहायचं.
"माझी एक एकर शेती आहे. त्यात बाजरीचं पीक घेतलं पण एक गोणीच बाजरी झाली. इतर वेळी एका एकरला १५-१६ गोण्या होतात. यावर्षी एक थेंबही पाऊस पडला नाही. तळ्यात, विहिरीला पाणी नाही.

फोटो स्रोत, BBC/PrashantNanavare
शेतीला जोडधंदा म्हणून मी बैलाचा व्यापार करतो. पण धंदा बंद पडला. पाणीच नाही तर शेती कुठून करायची? इथे माणसांना खायला नाही तर बैलांना चारा, पाणी कुठून देणार," उध्दव यादवराव गीते यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना आपली कैफियत मांडली.
"सहा महिन्यापूर्वी मी पैशाने बेजार होऊन फाशी घेतली होती. गावातल्या सगळ्यांनी अडवलं म्हणून वाचलो. इतका जीवाचा कंटाळा आलाय आम्हाला. निसर्गाने आम्हाला साथ दिली असती तर आम्हाला कुणाकडे हात पसरवायचा प्रश्नच नव्हता.
चांगलं पीक आलं असतं तर दिवाळीचा आज आनंदाचा सण खाल्ला असता. पोरा-बाळांना, बायकोला कपडे आणले असते. दिवाळीसाठी सरकार आम्हाला मदत देणार आहे का? आता प्राण्यासोबतच माणसं सांभाळायचीही जबाबदारी सरकारची आहे," उद्धवराव सांगतात.

फोटो स्रोत, BBC/PrashantNanavare
'दिवाळीचं नावंच काढू नका...'
गावातील राम पुरी म्हणाले की, "परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सण तर साजरा करावा लागतोय. पण दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न पडलाय. जनावरं वाऱ्यावर सोडून देण्याची पाळी आली आहे. मागच्या वर्षी बोंड अळीने सर्व पीक नेलं आणि यावर्षी तर पाऊसच नाही त्यामुळे शेत सुकून गेलं. पाच रूपये शेकड्यानेसुध्दा कुणी पैसा देईनात खर्चायला. उगाच जगायचं म्हणून जगतोय."
"दोन एकर शेतीत यंदा फक्त दोन गोण्या कापूस आलाय. ज्वारी पेरून ठेवलेय पण ती उगलीच नाही. तो खर्चही वाया गेला. तुरीची पानंसुध्दा गळायला लागली. येऊन-जाऊन फक्त आठ तास वीज असते. शेतीला पाणी नाही तर दिवाळीचं काय घेऊ बसलात. त्यात यंदा घरात दु:ख झालंय. त्यामुळे दिवाळीचं नावंच काढू नका", असं पुरी म्हणतात.
गेवराईमधील न्यू किर्ती किराणा स्टोर्सचे मालक अमोल हस्तीमल बाफना यांना दिवाळीच्या खरेदीविषयी विचारल तर ते म्हणातात की, "जिथे लोक दोन किलो माल न्यायची तिथे आता अर्धा किलो माल नेऊ लागलेत. ज्या माणसांची माझ्याकडे सामानाची साडेतीन-चार हजाराची यादी व्हायची तिथे माणूस सतराशे रूपयात दिवाळी गुंडाळायला लागलाय. दिवाळीच्या काळात बोलायला वेळ मिळायचा नाही. लोकं आठ दिवस आधी सामानाची यादी बनवायला यायचे. लोकांचं सामान बांधायला रात्रीचे बारा वाजायचे. दिवाळी दोन दिवसांवर आलेय आणि माणूस नाही दुकानावर."

फोटो स्रोत, BBC/PrashantNanavare
"हरभरा डाळ ४० रूपयांची ५२ रूपये झाली, मैदा २५ चा ३५ झाला. एक वेळ अशी होती लवंग, मिरीच्या पोतीच्या पोती घ्यावी लागायची. आता एक-दोन किलो बाजार आणावा लागतोय.
गेल्या तीन वर्षांपासून गुजरात आणि राजस्थानमधून शेंगदाणा येतोय. त्याचाही भाव ७०-७५ रूपये सुरू आहे. शेंगदाण्याला कुणी विचारत नाही तर सुक्यामेव्याचा प्रश्नच नाही. पाकीटंच्या पाकीटं तशीच्या तशी पडून आहेत. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये १५ किलो तूप विकत घेतलं होतं. ते तूप गेल्या वर्षभरात विकलं गेलेलं नाही," अशी माहिती बाफना यांनी दिली.
बाफना सांगतात, "रेशनिंगच्या मालामध्ये सरकार गहू, तांदूळ, चणा दाळ, साखर, उडदाची दाळ देतं. फराळात उडदाची दाळ कशासाठी लागते? गेल्या महिन्यात तूर दाळ दिली होती. ती शिजता शिजत नाही. त्याला गरम पाणी, कुकरला लावा कसलाच फरक फरक पडत नाही. तुरीची डाळ रेशनिंगवर ५५ रूपये आहे आणि आमच्याकडे ६० रूपये किलो. पण लोकं पाच रूपयांचाही विचार करू लागले आहेत."

फोटो स्रोत, BBC/PrashantNanavare
वडगाव ढोक गावातल्या एकाही घरावर कंदिल लावलेला दिसत नाही की घराला रोषणाई केलेली आढळत नाही. जुन्या मंदिरालाही कसलीच रंगरंगोटी केलेली दिसत नाही. दुष्काळामुळे दिवाळीवर अंधाराचं सावट पसरल्याचं चित्र सगळीकडे दिसतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









