You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बेळगावात काळा दिन, मराठी भाषिक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
- Author, स्वाती पाटील-राजगोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
बेळगाव, कारवार, निपाणी या भागासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी आजच्या 1 नोव्हेंबर या कर्नाटक राज्याच्या स्थापनादिनी काढण्यात आलेल्या रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली 62 वर्षं सीमावासीयांचा लढा सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस सीमावासीय काळा दिन म्हणून पाळतात. त्यानिमित्तानं गुरुवारी बेळगाव शहरात निषेध रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. संभाजी उद्यान ते मराठा मंदिर असा या रॅलीचा मार्ग होता. पण ही रॅली गोवा वेस चौकात आली तेव्हा पोलिसांनी मराठी भाषिक आंदोलकांवर लाठीमार केला.
कन्नड भाषिक 1 नोव्हेंबर विजय दिवस म्हणून साजरा करतात. या अंतर्गत शहरात विजयी रॅली काढण्यात आली. या दोन्ही रॅली गोवा वेस चौकात आल्यानंतर दोन्ही गट एकमेकांसमोर आले. त्यावेळी पोलिसांनी मराठी भाषिकांना मार्ग बदलण्यास सांगितलं मात्र त्यांनी नकार दिल्याने पोलिसांनी या तरुणांवर लाठीमार केला.
याबाबत पोलीसांची भूमिका जाणून घेण्यासाठी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास आपण असमर्थ आहोत असं स्पष्ट केलं. तर वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही.
गोवा वेस चौकामध्ये अचानक पोलिसांनी मराठी तरुणांवर लाठीमार केला त्यामुळे या लाठीमाराचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. मराठी भाषिकवर झालेल्या लाठीमारचा निषेध करत महाराष्ट्र सरकारने पाठीशी राहून सीमाप्रश्न सोडवण्याची अपेक्षा माजी महापौर सरिता पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)