मुंबईजवळ शिवस्मारक कार्यक्रमासाठी जाताना स्पीड बोट बुडून एकाचा मृत्यू

मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणारी स्पीडबोट खडकावर आदळून बुडाल्यानंतर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

मंगळवारी संध्याकाळी अपघातग्रस्त झालेल्या या स्पीड बोटीवर 25 जण होते. मृताचं नाव सिद्धेश पवार असून तो मेटे यांच्या शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यकर्ता असल्याचं कळतंय.

"महाराष्ट्र सरकारच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक होतंय, त्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्याकरिता शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, राज्याचे मुख्य सचिव, बांधकाम सचिव आणि बरेच अधिकारी गेले होते. तिथे दोन बोटी होत्या. त्यातल्या एका बोटीला अपघात झाला," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ही नेमकी घटना कशी घडली याची योग्य ती चौकशी केली जाईल, असंही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

या घटनेची चौकशी महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं PTI वृत्तसंस्थेचे पत्रकार निखिल देशमुख यांनी दिली.

"अपघातानंतर शिवस्मारक पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे," असं शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ही एक दुर्भाग्यपूर्ण घटना आहे, असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले.

पाहा गेटवे ऑफ इंडियाहून फेसबुक लाईव्ह

नेमकं काय घडलं?

या घटनेची सविस्तर माहिती देताना मेटे म्हणाले, "शिवस्मारक पायाभरणीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आम्ही सर्वजण चाललेलो होतो. एकूण चार ते पाच बोटी होत्या. बोटींमध्ये आम्ही अधिकारी, पत्रकार आणि संघटनेचे काही पदाधिकारी होतो. सगळेजण व्यवस्थित जात असताना एका बोटीला खालून डॅश झाला आणि ती बोट खालून फाटली आणि त्यात पाणी भरलं.

"बोटीतील लोकांना हे लक्षात आल्यावर आम्हाला संपर्क केला गेला. आम्ही सर्व यंत्रणांना सांगितलं आणि त्यांनी घटनास्थळी पोहचून लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं."

कोस्टगार्डचे डेप्युटी कमांडंट अविनंदन मित्रा यांनी सांगितलं की, "कोस्टगार्डच्या मुख्यालयाला संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास शिवाजी स्मारकाच्या प्रस्तावित जागेच्या जवळ बोट बुडाल्याचा SOS मिळाला. ही जागी नरिमन पॉइंटपासून 2.6 किमीवर आहे. इंडियन कोस्टगार्डने त्यांचे हेलिकॉप्टर आणि हॉवरक्राफ्ट 15 मिनिटांच्या आत घटनास्थळी पाठवले. सर्व व्यक्तींना वाचवण्यात यश आलं आहे."

मात्र नंतर एकाचा मृतदेह बुडालेल्या बोटीत आढळल्याची बातमी 'ABPमाझा'ने दिली.

ही स्पीड बोट महाराष्ट्र सरकारच्या मालकीची होती. मेटे यांच्यानुसार सर्व बोटींमध्ये सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आली होती.

"अपघातग्रस्थ बोटीला जिथे अपघात झाला तिथे आधी एक बुडाली असल्याचा अंदाज आला नाही आणि हा अपघात झाला. मी स्वत: त्या ठिकाणी १५ ते २० वेळा जाऊन आलेलो आहे. पण असं कधी झालं नाही," असं मेटे म्हणाले.

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाचं 24 डिसेंबर 2016 रोजी 'जलपूजन' झालं होतं.

मुंबईतील शिवस्मारकाच्या बांधकामाचे काम L&T कंपनीला देण्यात आलं आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)