सोशल : रक्तानं माखलेलं पॅड घेऊन मित्राच्या घरी जाणार का? - स्मृती इराणी

"मासिक पाळीदरम्यान रक्तानं माखलेला पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का? तुम्ही नाही जाऊ शकत, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तर मग मासिक पाळीत देवाच्या घरी जाणं योग्य आहे, असं तुम्हाला का वाटतं ?" केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी याचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे.

मुंबईतल्या 'यंग थिंकर्स कॉन्फरन्स'मध्ये इराणी यांना शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे मत व्यक्त केलं.

"मी केंद्रीय मंत्री असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविषयी काही बोलू शकत नाही. मला पूजा करण्याचा अधिकार आहे पण अपमान करण्याचा नाही. आपण हे अंतर समजायला हवं आणि त्याचा आदर करायला हवा," असंही इराणी यांनी म्हटलं आहे.

स्मृती इराणी यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. इंटरनेटवर हा व्हीडिओ आल्यानंतर त्याची चर्चा व्हायला लागली आणि #SmritiIrani ट्रेंड व्हायला लागलं.

स्मृती यांचं वक्तव्य अपरिपक्व आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी त्यांचं समर्थनही केलं आहे.

तर इराणी यांनी हा व्हीडिओ फेक न्यूज असल्याचा खुलासा केला आहे.

काय आहेत प्रतिक्रिया?

"प्रिय स्मृती इराणी, मासिक पाळीदरम्यान रक्तानं माखलेलं पॅड पर्समध्ये ठेवून कुणी हिंडत नाही. पण त्या काळात महिला मित्र-मैत्रिणांच्या घरी जातात, चित्रपट बघतात, स्वयंपाक करतात, खेळात सहभागी होतात आणि देशासाठी पदकंही जिंकतात. त्यामुळे तुमच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे?" असं एका ट्वीटर युजरने म्हटलं आहे.

"एक महिला म्हणून स्मृती इराणी आपलं मत मांडत आहे. परंपरावादी महिलांनाही बोलण्याचा अधिकार आहे आणि स्मृती इराणी परंपरावादी मूल्यांसहित जगत आल्या आहेत, लहानाचं मोठ्या झाल्या आहेत," असं एका वापरकर्त्यानं म्हटलं आहे.

हे प्रकरण म्हणजे फेक न्यूज आहे, असं म्हटल्यानंतरही स्मृती इराणी यांच्यावर टीका होत आहे.

"याला फेक न्यूज म्हणणं हे अतीच झालं. कारण इराणी यांच्या भाषणाचा व्हीडिओ अनेक चॅनेल्सकडे उपलब्ध आहे," नम्रता ददवाल यांनी असं ट्वीट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल

वय आणि वर्गाचा विचार न करता सर्व महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश दिला जावा, असा आदेश गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

एखाद्याची श्रद्धता आणि धर्माविषयीचं स्वातंत्र्य याला बंधन घालण्याची परवानगी पितृसत्ताक पद्धतीला देता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं होतं.

यापूर्वी 10 ते 50 वयोगटाच्या महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश नव्हता. न्यायालयानं या परंपरेला घटनात्मदृष्ट्या चुकीचं ठरवलं आहे.

सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि पोलिसांची सुरक्षा या दोन्ही गोष्टी असूनही शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्या आणि पत्रकारांना मारहाणही झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)