You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठीचा पहिला वाढदिवस : ५ समाधानाच्या गोष्टी, ५ आक्षेपांना उत्तरं
- Author, आशिष दीक्षित
- Role, संपादक, बीबीसी मराठी
नव्वदच्या दशकात जेव्हा पहिल्यांदा केबल टीव्ही आलं, तेव्हा बीबीसी वर्ल्ड नावाचं न्यूज चॅनल भारतात दिसू लागलं. त्यातल्या वैविध्यपूर्ण बातम्या, दर्जेदार निर्मिती, संयत भाषेतल्या आक्रमक मुलाखती आणि भटकंतीचे अफलातून कार्यक्रम पाहून आपण सगळेच भारावून जायचो. हे सर्व कधी मराठीत येईल, असं कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल.
पण 2 ऑक्टोबर 2017 रोजी आम्ही मायमराठीत पदार्पण केलं. इथे पत्रकारितेची थोर परंपरा आहे. सत्यशोधनाचा इतिहास आहे. चिकित्सेला पोषक वातावरण आहे. या सर्व गोष्टींना आम्ही जागतिक संदर्भ आणि नवा दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न करू लागलो.
हे करण्यात आम्हाला गेल्या एका वर्षात किती यश आलं हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी तुम्हा वाचक-प्रेक्षकांचा आहे. या एका वर्षात आम्ही अनेक चांगले प्रयोग केले, जे तुम्ही डोक्यावर घेतले. तर आमच्या काही गोष्टी कदाचित तुम्हाला आवडल्या नसतील. तुमच्यापैकी काही जणांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर चिडचीड केली. यातल्या 5 मुख्य आक्षेपांबद्दल बोलूया. पण त्याआधी एक नजर टाकूया आम्ही केलेल्या 5 यशस्वी प्रयोगांवर:
1. वाचकांशी सतत संवाद
फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्ही वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांना रोज आणि सतत उत्तरं देत असतो. कारण तुम्हाला काय वाटतं, हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आमच्यावर झालेल्या टीकेला आम्ही न भीता सदैव उत्तरं देतो.
संवाद हा कधीच एकतर्फी होऊ शकत नाही, असं आम्हाला वाटतं. म्हणून तुमची मतं समजून घेऊन आम्ही त्यावर आधारित रोज एक बातमी करतो.
2.डिजिटल व्हीडिओ
आम्ही मराठीत पहिल्यांदाच डिजिटल व्हीडिओ हा प्रकार आणला. हे व्हीडिओ मोबाईलवर आणि विशेषतः फेसबुकवर बातम्या पाहणाऱ्यांसाठी आम्ही बनवतो. तुमच्याकडे कदाचित इअरफोन्स नसतील, हे गृहित धरून आम्ही खाली सबटायटल्सही देतो.
मराठी माणसाची अभ्यासातली आणि कोडी सोडवण्याची आवड लक्षात घेऊन आम्ही क्विझ हा प्रकार पत्रकारितेत आणला. आंबेडकरांपासून मराठी भाषेपर्यंत अनेक क्विझेसना तुम्ही जोरदार प्रतिसाद दिला.
3.सीमोल्लंघन
मराठीत जिल्हावार वृत्तपत्रं आणि कॉलन्यांच्या पुरवण्या निघू लागल्यापासून जागतिक बातम्यांची जागा संकुचित होत गेली. जिल्हा पातळीचं राजकारण लाईव्ह दिसू लागलं, पण शेजारच्या देशांत, अमेरिकेत, आखातात काय चाललंय हे कळेनासं झालं.
दूरवरच्या या सर्व गोष्टींचे आपल्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतात. म्हणून या बातम्या आम्ही नियमितपणे दाखवतो.
सुरुवातीला आम्ही दिलेल्या जागतिक बातम्यांना अल्प प्रतिसाद होता, पण तो हळूहळू वाढत आहे. पाकिस्तानात ब्यूरो असलेली आणि भारतीय भाषांमध्ये बातम्या देणारी बीबीसी ही कदाचित एकमेव संस्था असेल.
'हे विश्वचि माझे घर' असं ज्ञानोबामाऊली 13व्या शतकात म्हणाले होते. आता मात्र आपण विश्व सोडून आपल्या गल्लीत रमलो आहोत की काय, असा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
4. वेणूताई ते पार्वतीबाई
बातम्या ही पुरुषांची मक्तेदारी आहे, असा आपल्या इथे अनेकांचा गैरसमज असतो. महिलांसाठी केवळ एक रेसिपी आणि मेकअपचा कोपरा देण्यात अनेक वृत्तपत्रं धन्यता मानतात.
महिलांनाही सर्व बातम्यांमध्ये पुरुषांइतकाच रस आहे, असं आम्ही मानतो. त्यापलीकडे जाऊन त्यांना महिलांच्याच प्रेरणादायी गोष्टी वाचायला आणि पाहायला आवडतात, असंही आमच्या लक्षात आलं. महिलांवर कुठेही अन्याय झाला, त्यांना समान हक्क नाकारले, तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतो.
बीबीसी मराठीच्या बातम्या चाळीसच्या दशकात लंडनहून वाचणाऱ्या वेणूताईंपासून तर पाकिस्तानात उकडीचे मोदक करून गणपतीची पूजा करणाऱ्या पार्वतीबाईंपर्यंत आम्ही सर्व प्रकारच्या स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून बातम्या देतो.
5.पहिलं डिजिटल बुलेटिन
मराठी भाषा डिजिटल होत आहे. मराठी तरुण डिजिटल होत आहे. त्यामुळे आम्ही बातमीपत्रही डिजिटल करायचं ठरवलं. आणि JioTV अॅपवर 'बीबीसी विश्व'चा जन्म झाला. हे अनोखं बातमीपत्र तुम्ही यूट्यूबवरही पाहू शकता. JioTV अॅपवर बीबीसी मराठीच्या उत्तमोत्तम व्हीडिओंची झरा 24 तास अव्याहत वाहत असतो.
याशिवायही आम्ही भरपूर गोष्टी केल्या आणि करत आहोत.
भीमा कोरेगावपासून औरंगाबादपर्यंत जेव्हा दंगली झाल्या, मराठ्यांपासून धनगरांपर्यंत जेव्हा आंदोलनं झाली, बोंडअळीपासून हमीभावापर्यंत जेव्हा शेतकऱ्यांवर संकटं ओढावली, तेव्हा बीबीसी मराठीने सविस्तर आणि रोखठोक ग्राउंड रिपोर्ट्स केले.
आता आत्मस्तुती पुरे करतो आणि तुम्ही फेसबुक, ट्विटरवर आमच्यावर घेतलेल्या आक्षेपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो.
आक्षेप 1: बीबीसी मराठीला बीबीसी इंग्रजीचा दर्जा नाही
निर्मितीचा दर्जा सरावाने येतो. बीबीसी इंग्रजी सुमारे एका शतकापासून अस्तित्वात आहे, आम्ही तो दर्जा काही महिन्यांत आणू शकत नाही. आमचा दर्जा एका वर्षात चांगलाच सुधारला आहे. त्याची पावती तुम्हीच कमेंट्समध्ये अनेकवेळा आम्हाला दिली आहे.
संपादकीय दर्जा यायलाही वेळ लागतो. डिजिटल पत्रकारिता मराठीत नवी आहे. त्यामुळे हे माध्यम शिकण्यापासून आमची सुरुवात होती. शिवाय, इंग्रजीची टीम शेकडो पत्रकारांची आहे, मराठीत बोटावर मोजता येईल एवढीच टीम आहे. पण ही छोटीशी टीमही तुमच्यापर्यंत महत्त्वाच्या बातम्या आणण्यात कधी अपुरी पडणार नाही.
आक्षेप 2: बीबीसी मराठी हिंदूंच्या विरोधात आहे?
अजिबात नाही. महिलांना मंदिर प्रवेशापासून सर्वत्र समान हक्क मिळावेत, अशी भूमिका आम्ही घेतल्यामुळे असा गैरसमज काहींनी करून घेतला. आम्ही सर्व धर्मांची चिकित्सा करणारे लेख दिले आहेत. व्हॅटिकनमधल्या जादूटोण्याविरोधातला लेखही आम्ही दिला आणि तिहेरी तलाकविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या कथाही दाखवल्या.
आम्ही पंढरपूरच्या वारीपासून गणपती उत्सवापर्यंत आणि ईदपासून नाताळपर्यंत सर्व सणांच्या बातम्या सामाजिक आणि सांस्कृतिक अंगांनी दिल्या आहेत.
आक्षेप 3: बीबीसी मराठी भारतविरोधी बातम्या देतं?
आम्ही कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात बातम्या देत नाही. आम्ही निष्पक्षपणे बातम्या देणारी संस्था आहोत. बीबीसी भारतात मराठी आणि इतर 8 भाषांतून बातम्या देतं, त्याप्रमाणेच पाकिस्तानात उर्दूमधून, अफगाणिस्तानात पश्तूमधून आणि जगातल्या एकूण 40 भाषांमधून बातम्या देतं. आम्हाला कुठलाही देश लाडका किंवा दोडका नाही. जे घडतं ते आम्ही दाखवतो.
स्थानिक माध्यमं कधीकधी बातम्यांना देशभक्तीचा रंग देतात. आम्ही बातम्यांना कुठलाही रंग देत नाही. बातम्या तटस्थपणे पाहण्याची सवय नसल्यामुळे अनेकांना आमच्या काही बातम्या वेगळ्या वाटत असतील. पण आम्हाला नियमितपणे फॉलो केल्यावर त्यांच्या लक्षात येईल की आम्ही नेहमी सर्व बातम्यांच्या सर्व बाजू देत असतो.
आक्षेप 4: बीबीसी मराठी फार नकारात्मक बातम्या दाखवतं
हा आरोप आमच्यावरच नाही, तर अनेक वृत्तपत्रं, न्यूज चॅनल्स आणि वेबसाइट्सवर होतो. नेहमीपेक्षा काही वेगळं घडल्यावरच बातमी होते. हे वेगळं अनेकवेळा नकारात्मक असतं (जसं अपघात, हल्ले, हत्या).
आम्ही जगभरातल्या बातम्या देत असल्यामुळे रोज युद्ध आणि अपघात दाखवणं आलंच. सीरियातलं युद्ध आणि इंडोनेशियातला भूकंप मराठी लोकांपर्यंत पोहोचवणं आम्हाला गरजेचं वाटतं. या गोष्टी टाळल्या तर आम्ही आमच्या कामात कसूर केल्यासारखं होईल.
हे करत असतानाच जगात रोज खूप काही सुंदर घडत असतं. आम्ही दररोज किमान एक प्रेरणादायी बातमी दाखवतो/प्रकाशित करतो. मोरोक्कोतल्या तौली केबिरापासून अहमदनगरमधल्या राहीबाई पोपेरेंपर्यंत आम्ही शेकडो गोष्टी दाखवल्या, ज्यामुळे समाजात सकारात्मकता पसरेल.
आक्षेप 5: बीबीसी मराठी महाराष्ट्रातल्या बातम्या कमी दाखवतं
हा एकमेव आक्षेप पूर्णपणे मान्य. आम्ही महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या दाखवतो, पण सर्व बातम्या नक्कीच नाही दाखवत. कारण आमचं बलस्थान आंतरराष्ट्रीय बातम्या आहेत. स्थानिक बातम्या चांगल्या पद्धतीने स्थानिक मध्यमं दाखवत आहेतच की.
महाराष्ट्रातली त्या दिवसाची महत्त्वाची बातमी देतानाही आम्ही ती वेगळ्या दृष्टिकोनातून देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. त्या बातमीचा गुंता सोडवून सांगण्यावर आमचा भर असतो.
आता येणाऱ्या काळात आम्ही तुमच्या नजरेतून निवडणुका कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मुद्द्यांना व्यासपीठ देऊ. बीबीसी ही सार्वजनिक कंपनी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं हित आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे. ते डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही बातम्या देत आहोत आणि देत राहू.
एखादी गोष्ट नाही आवडली तर हक्काने कळवत जा. तुमचा उदंड प्रतिसाद असाच मिळू द्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)