जंगलाच्या राजाचा एकच प्रश्न, कोणी घर देतं का घर?

सिंह

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रॉक्सी गागडेकर छारा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, अहमदाबाद

आठ दिवसांत 11 आशियाई सिंहांचा मृत्यू.

गुजरातच्या स्थानिक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर आलेली ही बातमी राष्ट्रीय स्तरावरच्या वर्तमानपत्रातही ठळकपणे झळकली. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत गुजरातच्या गीर अभयारण्यात 184 सिंहांचा मृत्यू झाला. त्यापैकी फक्त 34 मृत्यू हे नैसर्गिक होते.

सिंहांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे?

सिंहांचे मृत्यू चर्चेचा मुद्दा होऊ नये म्हणून सिंहांच्या आपापसातल्या संघर्षात हे मृत्यू झाल्याचं सरकारच्यावतीनं सांगण्यात आलं.

वन्यजीव कार्यकर्त्यांच्या मते, ही परिस्थिती धोकादायक आहे. सिंहांच्या वाढत्या संख्येमुळे हद्दीचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यातून त्यांच्यात संघर्ष वाढतोय आणि ते सिंहांच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे.

या वर्षभरात 12 ते 19 सप्टेंबर या काळात गीर अभयारण्यातल्या दलखानिया आणि जसाधर रेंजमध्ये 11 सिंहांचा मृत्यू झाला.

सिंह

फोटो स्रोत, Getty Images

गुजरातच्या वन विभागाचे प्रमुख जी. के. सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितलं की, "या 11 पैकी 8 सिंहांचा मृत्यू हा आपापसातल्या संघर्षात झाला आहे."

"तीन सिंह दलखानिया रेंजमध्ये घुसले होते त्यांनी तीन छाव्यांना ठार केलं. सिंहांचे हे असे हल्ले ही एकदम सामान्य गोष्ट आहे," असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलं.

एकीकडे सरकारी अधिकारी ही सामान्य गोष्ट असल्याचं सांगत असले तरी सिंहांची वाढती संख्या आणि कमी पडणारी जागा हा मुद्दा त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

गुजरातमध्ये गीर नॅशनल पार्क, गिरनार अभयारण्य, मितियाळा अभयारण्य आणि पाणिया अभयारण्य हे सिंहांसाठीचं संरक्षित क्षेत्र आहे. त्यात किमान 323 सिंह वावरत आहेत.

राज्याच्या किनारी भागातही सिंहांचा अधिवास आहे. सुत्रापडा, कोडीनार, ऊना आणि वेरावळ तसंच राजुला, जाफराबाद आणि नागेश्री या किनारी भागातही सिंह आढळतात.

2015 मधल्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये 523 सिंह आहेत. 2010 मध्ये ही संख्या 411 होती.

सिंह

फोटो स्रोत, Getty Images

जंगलाच्या बाहेर राहणाऱ्या सिंहांचा विचार केला तर अमरेली जिल्ह्यात त्यांची संख्या मोठी आहे. 2015मध्ये सावरकुंडला, लिलिया, राजुला आणि आसपासच्या भागात 80 सिंह असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याशिवाय, भावनगरमध्ये 37 सिंह आहेत. अमरेली आणि भावनगरमध्ये सिंहांसाठी अभयारण्य नाही.

भावनगर आणि अमरेली या दोन जिल्ह्यांतल्या सिंहांमध्ये हद्दीवरून संघर्ष सुरू असतो. या भागात 109 चौ.किमींचं अभयारण्य तयार करण्यात यावं असा प्रस्ताव वनविभागानं राज्य सरकारला दिला आहे.

गुजरातच्या वन विभागाचे प्रमुख संरक्षक जी. के. सिन्हा यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "तो प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे."

राज्याचे वनमंत्री गणपत वसावा यांनी जून-2018 मध्ये घोषणा केली की, भावनगर आणि अमरेली मधली 109 चौ. किमींची जागा सिंहांसाठी आरक्षित केली जाणार आहे. अर्थात, ही घोषणा अजून प्रत्यक्षात आलेली नाही.

गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये सिंहांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. गुजरात हायकोर्टमध्ये राज्य सरकारच्या वनविभागानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राज्यात 523 सिंह आहेत. त्यापैकी किमान 200 सिंह असुरक्षित भागात रहात आहेत.

वन्यजीव कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, सिंहांच्या वाढत्या संख्येकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता येणार नाही. राज्य सरकारनं प्रयत्न केले असले तरी सिंहांसाठी सुरक्षित क्षेत्र तयार करण्यात त्यांना यश आलेलं नाही.

सिंह

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीशी बोलताना, वन्यजीव कार्यकर्ते भूषण पंड्या म्हणाले की, "2015नंतर सिंहांची संख्या वाढली आहेच. पण सरकारी आकड्यांपेक्षा ती वाढ अधिक आहे. कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीचा विचार केला तर गुजरातमध्ये किमान 700 सिंह आहेत आणि त्यापैकी निम्मे अभयारण्याच्या बाहेर आहेत."

पंड्या काही दशकं सिंहांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. ते म्हणतात, "जोवर सरकार सिंहांसाठी इको सेन्सेटीव्ह झोन तयार करत नाही तोवर ते निर्धास्त राहू शकत नाहीत. त्यांच्या मृत्यूच्या घटना अशाच सुरू राहतील. कधी नैसर्गिकरित्या तर कधी आपसातल्या संघर्षांत त्याचे प्राण जातच राहतील."

अधिकाऱ्यांच्या भूमिकांवर शंका

अमरेलीतील वन्यजीव संरक्षण कार्यकर्ते राजन जोशी यांचं म्हणणं आहे की, "11 सिंहांचा मृत्यू आपसातल्या संघर्षात झाला यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. गेल्या काही वर्षांत मी तरी अशी कोणतीही घटना पाहिलेली नाही."

राजन यांना शंका येते ती कोणत्यातरी संसर्गजन्य आजाराची. वन विभागानं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली.

"बरेचदा बाहेरचे कुत्रे सिंहांच्या हद्दीत प्रवेश करतात. सिंहांनी केलेली शिकारही खातात. तिच शिकार सिंह पुन्हा खातात तेव्हा कुत्र्यांची लाळ सिंहांच्या पोटात जाते. त्यातून ते संक्रमण एका सिंहाकडून दुसऱ्याकडे जाते. अशा प्रकारच्या शंकांकडे दुर्लक्ष करू नये,"असं त्यांनी स्पष्ट केलं.

वनाधिकारी जी. के. सिन्हा यांनी मात्र अशा कोणत्याही शक्यतेचा इन्कार केला. त्या सर्वं सिंहांचं पोस्टमार्टेम करण्यात आलं आहे. त्यात अशा कोणत्याही व्हायरसचा मुद्दा समोर आलेला नाही, असं ते म्हणाले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम जुनागडला गेली आहे. त्याचवेळी वन मंत्री गणपत वसावा यांनी म्हटलंय की, "स्थानिक लोकांनी त्या सिंहांची शिकार करण्यासाठी त्यांना विषही दिलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही."

गीरच्या अभयारण्यात 300 सिंह राहू शकतात. पण 1995मध्येच तिथली संख्या 304च्या आसपास गेलेली होती.

सिंह मध्य प्रदेशात पाठवा

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एस. एस. राधाकृष्णन आणि चंद्रमौळी कुमार प्रसाद यांच्या खंडपीठानं 2013मध्ये एक आदेश दिला होता. त्यानुसार, सिंहांना शेजारच्या मध्य प्रदेशात पाठण्यास सांगितलं होतं. ते काम इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) यांच्या मार्गदर्शनानुसार केलं जावं, असंही स्पष्ट केलं होतं.

वन्यजीव संरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष किशोर कोटेचा यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सिंहांसाठी पुरेशी जागा नाही. IUCNच्या निर्देशानुसार अजून सर्व्हेक्षण करण्यात आलेलं नाही. हा विषय सुप्रीम कोर्टात आहे."

वन्यजीव संरक्षण ट्रस्टचे सदस्य भूषण पंड्या म्हणाले की, जोवर मध्य प्रदेशचं सरकार IUCNच्या निर्देशांप्रमाणे पाहणी करत नाही तोवर सिंहांचं स्थलांतर होणार नाही.

सिंहांच्या मृत्यूची कारणं

विजेच्या धक्क्यानं मृत्यू - राज्य सरकारच्या वन विभागाच्या माहितीनुसार, 2016-17 या काळात तीन सिंह विजेच्या धक्क्यानं ठार झाले. सिंह संरक्षक राजन जोशी यांच्या मते, गावांमध्ये पीक वाचवण्यासाठी विजेच्या तारांचं कुंपण घातलं जातं. त्या तारांच्या संपर्कात आल्यानं सिंह प्राण गमावतात.

रस्ते अपघात - राज्य सरकारच्या आकड्यांनुसार, 2016-17 या काळात तीन सिंह रस्ते अपघातात ठार झाले. पिपवाव-सुरेंद्रनगर राज्य महामार्गावर हे अपघात होतात.

उघड्या विहिरी - बरेच सिंह खुल्या विहिरींमध्ये पडूनही मरतात. शिकारीच्या नादात बरेचदा सिंह विहिंरींमध्ये पडतात.

विषारी पाणी - 2017मध्ये दोन सिंह विषारी पाणी पिऊन मृत्युमुखी पडले. राजन यांनी बीबीसीला सांगितलं की, शेतात युरियाचा वापर केलेला असतो. तेच पाणी सिंह प्यायले तर प्राणघातक ठरू शकतं.

रेल्वे अपघात - 2017मध्ये पिपवाव-सुरेंद्रनगरच्या दरम्यान मालगाडीनं दिलेल्या धडकेत दोन सिंह ठार झाले होते. त्यानंतर प्रशासनानं काही ठिकाणी कुंपण घातलं पण मोठा भाग अजूनही खुला आहे आणि तिथूनच सिंह रेल्वेमार्ग ओलांडतात.

गुजरातच्या बाहेर 1884मध्ये शेवटचा आशियाई सिंह दिसला होता. गुजरातच्या सौराष्ट्र भागात ध्रांगध्रा, जसदण, चोटीला, बरडा हिल्स, गिरनार आणि गीर वनांच्या काही भागात सिंह वास्तव्याला होते. हळूहळू त्यांची संख्या गीर वनांपर्यंतच मर्यादित राहिली. जुनागडच्या नवाबांनी सिंहांचं रक्षण केलं.

2015मध्ये सिंहांची गणना झाली. त्यात राज्याच्या आठ जिल्ह्यांत 22 हजार किमींच्या क्षेत्रात 523 सिंह आहेत. त्यांचा अधिवास गीर वनात आहे. हा भाग सोमनाथ जिल्ह्यात येतो. जुनागड, अमरेली, भावनगर, राजकोट, बोटाद, पोरबंदर आणि जामनगर जिल्ह्यात हे सिंह आढळतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)