भारतातलं पाकयाँग जगातलं सर्वांत सुंदर विमानतळ

सिक्कीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला भारताचा 100 वा विमानतळ कदाचित जगातला सगळ्यांत सुंदर विमानतळ असेल.

हा विमानतळ सिक्कीम राज्यातला पहिला विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी गंगटोकपासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाक्योंग या ठिकाणी वसला आहे. याचं वर्णन 'इंजिनिअरिंगची अलौकिक किमया' असं केलं आहे.

पाक्योंग गावाच्यावर असणाऱ्या टेकडीवर हा विमानतळ वसला आहे आणि याची उंची समुद्रसपाटीपासून 4500 फूट आहे. हा विमानतळ 201 एकराच्या विस्तीर्ण जागेत पसरला आहे.

याच्या 1.75 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीच्या दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत. या विमानतळात देन पार्किंग बे आहेत आणि एक टर्मिनल बिल्डिंग आहेत ज्यात 100 प्रवासी मावू शकतात.

अतिशय अवघड भौगोलिक परिस्थिती आणि धोकादायक वातावरणामुळे हा प्रकल्प नऊ वर्षं चालला. "हा विमानतळ पूर्ण करणं खुपच आव्हानात्मक पण रोमांचकारी होतं," ज्यांनी धावपट्टी बांधली त्या कंपनीचे प्रवक्ते पुंज लॉईड यांनी हे सांगितलं.

तंत्रज्ञांच्या मते अवजड यंत्रं चिंचोळ्या रस्त्यांवरून डोंगरावर नेणं आणि तिथे खणणं हे सगळ्यांत मोठं आव्हान होतं. सिक्किममध्ये एप्रिल ते सप्टेंबर असा पावसाळा असतो. या ऋतूत तिथं काम करणं अशक्य असतं. त्यामुळेही काम खोळंबलं होतं.

डोंगराळ भाग आणि भूकंपप्रवणता ही आव्हानंदेखील तंत्रज्ञांसमोर होती.

धावपट्टीसह हा सगळा विमानतळ टेकडीवर बांधलेल्या पक्क्या काँक्रिटच्या जमिनीवर उभा आहे. ही जमीन 263 मीटर उंचीवर आहे अशी माहिती लॉईड यांनी दिली.

या विमातळावरून प्रवासी सेवा 4 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

या विमानतळामुळे सिक्कीमच्या पर्यटनात भर पडेल अशी आशा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)