भल्या पहाटे पत्रकाराला फोन येतो, ‘सर एक एन्काऊंटर सुरू आहे’

एंकाउंन्टर

फोटो स्रोत, HIRDESH KUMAR

    • Author, नितिन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, अलीगढहून

एन्काऊंटर झालेल्या त्या लाल विटांच्या बंगल्यात याआधी कोणीच राहत नव्हतं. 20 सप्टेंबरनंतर या बंगल्यावर सगळीकडे बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण दिसत होते.

ब्रिटिशकालीन या आलिशान बंगल्यात त्याकाळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी राहायचे. या जागेपासून जवळच स्वच्छ पाण्याचा कालवा शांतपणे वाहतो. तर बंगल्यामागच्या मैदानात गावचा आठवडी बाजार भरतो.

बंगल्यातल्या एका मोठ्या खोलीत दोन ठिकाणी रक्त पडलेलं होतं. तसंच आणखी एका खोलीतही असंच रक्त दिसत होतं.

रक्त पडलेल्या ठिकाणी पोलिसांनी पांढऱ्या रेषा मारल्या होत्या. "रक्ताचे निशाण हे एन्कांउटरमध्ये मृत्यू झालेल्या त्या आरोपींचे होते. ते या बंगल्यात लपले होते," असा पोलिसांचा दावा आहे.

एन्काउंटर

फोटो स्रोत, HIRDESH KUMAR

अलीगढमधल्या हरदुआगंज परिसरात ही घटना घडली आहे. "गेल्या महिन्यात या भागात 6 हत्या झाल्या होत्या. त्या गँगमध्ये हे दोघेपण सामील होते," असं पोलिसांचं म्हणणं आहे.

प्रत्यक्षात काय घडलं होतं?

अलीगढमधल्या एक पत्रकाराला त्यादिवशी सकाळी साडेसहा वाजता फोन आला. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संपर्क अधिकाऱ्याने हा फोन केला होता. "एक एन्कांऊटर सुरू आहे," असं त्या पत्रकाराला सांगण्यात आलं.

पुढच्या वीस मिनिटांत मी कॅमेरा घेऊन घटनास्थळी पोहोचलो. आम्ही तिथं जाण्याआधीच 100 मीटर अंतरावर आम्हाला थांबवण्यात आलं. आजूबाजूला पाहिलं, आणखी काही पत्रकारही पोहोचले होते. पोलिसांनी फोन करून सांगितलं म्हणूनच तेही आले होते.

गोळ्यांचा आवाज येत होता. दोन डझनहून अधिक पोलीस पडक्या वास्तूच्या दिशेने बंदुका रोखून तयार होते. जिल्ह्याचे एसएसपी आणि एसपी यांच्यासह सगळे मोठे अधिकारी बुलेटप्रुफ जॅकेट घालून फायरिंग करत होते.

एन्काउंटर , उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, HIRDESH KUMAR

फोटो कॅप्शन, एन्काऊंटर ठिकाणचं दृश्य

अर्ध्या तासानंतर गाड्या तिथून निघाल्या. दोन जण आणि पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं.

जिल्ह्याचे एसएसपी अजय साहनी यांनी बीबीसीला सांगितलं की, "आमच्या फौजदाराच्या पायाला गोळी लागली आणि दोन्ही आरोपी जखमी झाले आहेत. त्यांच्याकडे पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर होतं. त्यांच्याकडे डझनभर काडतुसंही होती. त्या दोघांनी काल रात्री चोरलेली बाईकही बाजूला पडली होती. पोलिसांच्या एका तुकडीनं नाक्यावर त्यांना रोखलं तेव्हा त्यांनी पळ काढला आणि या पडक्या इमारतीत येऊन लपले."

दोन तासांनंतर जखमी अवस्थेतल्या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सगळं घडलं तेव्हा अनेक प्रत्यक्षदर्शी होते. आरोपींना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेताना त्यांनी पाहिलं आहे.

मात्र बीबीसीनं तिथं उपस्थित पत्रकार आणि प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला. गाड्यांमधून कोणाला नेण्यात आलं हे कोणीच पाहिलं नाही कारण बाकी सगळ्यांना 100 मीटर अंतरावर रोखण्यात आलं होतं.

एन्काउंटर , उत्तर प्रदेश
फोटो कॅप्शन, कालव्याजवळच्या याच पडक्या इमारतीसमोर एन्काऊंटर झालं.

पडक्या इमारतीच्या बाजूच्या कालव्याजवळ छोटंसं हॉटेल आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध महिला पानसिगारेटचा गाडा चालवते.

सकाळी सहा वाजता ही मंडळी आपापल्या दुकानांच्या इथं पोहोचतात. मात्र त्यादिवशी त्यांना दुकानापासून दूर थांबवण्यात आलं. संपूर्ण परिसरात पोलिसांची नाकाबंदी होती. दोन तासांनंतर सगळी माणसं गेली आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं काम सुरू केलं.

नाव न सांगण्याच्या अटीवर सात ते आठ स्थानिकांशी आमचं बोलणं झालं. त्यापैकीच एकानं सांगितलं की, "एक दिवस आधी या पडक्या इमारतीच्या सुरक्षेसाठी चौकीदार असतो का असं विचारायला कुणीतरी आलं होतं.

दुसरा म्हणाला, "हरयाणा राज्याची नंबरप्लेट असलेली एक गाडी या भागात फेऱ्या मारत असताना आम्ही पाहिलं होतं. साध्या कपड्यातली उंच धिप्पाड माणसं होती."

तिसरा म्हणाला, "तुम्ही त्या पडक्या वास्तूमध्ये जाऊन रक्ताचे दोन थेंब पाहिलेत का? एखाद्या तरुण माणसाला गोळी लागली तर रक्ताची धार लागते. याठिकाणी दोन लोकांना गोळ्या लागल्याची चर्चा आहे."

अलीगढ पोलीस एसएसपींनी या सगळ्या गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असंही त्यांनी सांगितलं. एन्काऊंटर पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींचे व्हीडिओ त्यांनी आम्हाला दाखवले.

हे तिनही व्हीडिओ या पडक्या इमारतीसमोरच चित्रित करण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी हे कधी आणि का चित्रित केले आहेत यावर अजूनही वाद आहे.

पोलीस गाडीतून कोणाला घेऊन गेले हे तिथं उपस्थित पत्रकारांनाही कळलं नाही मग हे प्रत्यक्षदर्शी आले कुठून? यावरही उलटसुलट वाद सुरू आहेत.

एन्काउंटर , उत्तर प्रदेश
फोटो कॅप्शन, प्रत्यक्षदर्शी

एसएसपी अजय साहनी यांच्या तर्कानुसार, एन्काऊंटरवेळी माणसं दूरदूरहून येत होते. पडक्या वास्तूत नक्की काय सुरू आहे हे कालव्याच्या पलीकडे जाऊन पाहण्यासाठी झुंबड उडाली होती.

आम्ही प्रत्यक्षदर्शींशी बोललो. त्यांनी सांगितलेला तपशील वेगळा आहे. पोलिसांनी आधीच सगळा परिसर ताब्यात घेतला होता. मोटारसायकलवरून पळून जाणारी तरुण मुलं कालव्याच्या किनारी असलेल्या खंडरमध्ये लपण्याचा का विचार करतील हेच अजब आहे. या पडक्या इमारतीच्या तिनही बाजूंना शेती आणि पक्के रस्ते आहेत. त्यांनी पुढे जाण्याचा विचार का केला नाही? असं प्रत्यक्षदर्शी म्हणाले.

प्रकरण काय?

अलीगढ जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात सहा निर्घूण हत्या झाल्या. या हत्यांमागचं प्रमुख कारण लूटमार हे आहे. काही हत्यांमागे अंतर्गत वाद हे कारण होतं.

हत्या प्रकरणानंतर प्रशासनावरचा दबाव वाढला. सहा हत्या सहा वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या. यापैकी दोन पुजारी होते. एक दांपत्य तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे सध्याचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे लांबचे नातेवाईक आहेत.

या सगळ्या हत्या अलीगढ अतरौली परिसरात झाल्या. भाजपचे दिग्गज नेते कल्याण सिंह यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यांचे चिरंजीव राजवीर सिंह एटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत तर पुतण्या संदीप सिंह, कल्याण सिंह यांचा आधीचा मतदारसंघ अतरौलीचे आमदार असून योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत.

अलीगढ पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हत्यांमागे आठ लोक आहेत. यापैकी दोघांना मारून टाकण्यात आलं आहे. पाच अटकेत आहेत तर एकजण फरार आहे.

कुटुंबाचं काय म्हणणं?

कुटुंबातील सदस्य आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरच्या दुपारी अलीगढपासून अर्ध्या तासावर भैंसपाडा वस्तीत दोन युवक जेवत होते.

मुस्तकीम नौशाद यांचं मेव्हणा-भावजीचं नातं होतं. जवळच्या एका कपड्याच्या दुकानात विणकाम करतात.

एन्काउंटर , उत्तर प्रदेश
फोटो कॅप्शन, मुस्तकीन आणि नौशाद राहत होते तो भैसपाडा परिसर.

दोघांची महिन्याची मिळकत दोन ते तीन हजार रुपये होती. सायकलवरून ते कामावर जात असत.

नौशादची आई आणि मुस्तकीमची सासू शाहीन रविवारच्या त्या दुपारी हमसून हमसून रडत होत्या.

"अडीच वाजता मी मजुरी करून घरी परतले. मोठी मुलगी रडत होती. पोलीस घरी येऊन गेल्याचं तिने सांगितलं. नौशादला म्हणजे माझ्या मुलाला घेऊन गेल्याचं तिने सांगितलं. मुस्तकीमलाही मारहाण करून घेऊन गेले. पोलीस त्याला सोडून देतील असा धीर परिसरातल्या लोकांनी दिला. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. काही माणसं नौशादला सोडवून आणण्यासाठी पोलीस स्टेशनलाही गेली होती. पण पोलीस त्यांना ओरडले," असं नौशादच्या आईने सांगितलं.

मुस्तकीमची आजी रफीकन यांनी आपला अनुभव सांगितला.

"नौशाद आणि मुस्तकीम यांना पोलीस घेऊन गेले. त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना ओढत ओढत नेण्यात आलं. काही कागदांवर त्यांना आमचे अंगठेही घेतले," असं त्यांनी सांगितलं.

एन्काउंटर , उत्तर प्रदेश
फोटो कॅप्शन, नौशादचे छायाचित्र

शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार रविवारी दुपारी या छोट्या वस्तीत पोलिसांनी धाड टाकली. प्रत्यक्षदर्शी अस्लम खान यांनी काय घडलं ते सांगितलं.

काही पोलीस साध्या वेशात होते. काही वर्दीत होते. मुस्तकीम आणि नौशाद यांना मारहाण करून घराबाहेर काढून गाडीत टाकण्यात आलं. मुस्तकीमनं पळून जाण्याचा प्रयत्नही केला. त्याला बेदम चोपण्यात आलं.

शेजारी राहणाऱ्या ताहिर यांनीही काय बघितलं ते सांगितलं. त्यांचं कुटुंब साधारण नऊ महिन्यांपूर्वी याठिकाणी राहायला आलं होतं. दोन्ही मुलं सायकलवर कामाला जात असत. कपड्याच्या दुकानात कशिद्याचं काम करत असत.

हशमत अली मुस्तकीमचे शेजारी आहेत. "रविवारी जे घडलं त्यावेळी मी तिथेच होतो. नौशाद, मुस्तकीन यांच्यासह सलमान आणि नफीस यांनाही घेऊन गेले. मुस्तकीम आणि नौशाद फरार आहेत असं सांगत पोलीस मंगळवारी पुन्हा हजर झाले. रविवारी सगळ्यांसमोर त्यांना बेदम मारहाण करून नेण्यात आलं. त्यानंतर पोलीस त्यांना घेऊन गेले. पोलिसांच्या ताब्यात असताना हे दोघे फरार कसे होऊ शकतात," असं हशमत विचारतात.

भैंसपाडाच्या या वस्तीत हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात. वस्तीत नाल्याचं पाणी शिरलं आहे आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये माणसं दाटीवाटीने राहत आहेत.

एका हिंदू महिलेशी आम्ही बोललो. तिने या घटनेबद्दल सांगितलं. ही मुलं चांगली वाटत होती. सायकल घेऊन कामावर जाणारी मुलं मोटारसायकल चालवणं आणि चोरी करायला कधी शिकली?

"मुस्तकीम आणि नौशाद यांचं त्याच दिवशी झटपट दफन करण्यात आलं. दोन महिला सोडून बाकी घरचे तसंच नातेवाईकांना कब्रस्तानात प्रवेश नाकारण्यात आला. दफनविधीपूर्वीचे धार्मिक विधीही अर्धवट सोडून देण्यात आले," असं मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

काय घडलं नक्की? पोलिसांचं काय म्हणणं?

मुस्तकीन आणि नौशाद यांना पोलिसांनी रविवारी त्यांच्या घरून ताब्यात घेतलं का? असा प्रश्न आम्ही अलीगढचे एसएसपी अजय साहनी यांना विचारला.

ते म्हणाले, "नाही. पोलिसांची एक तुकडी केवळ चौकशीसाठी त्या दोघांच्या घरी गेली होती. त्यांची छायाचित्रं घेऊन पोलीस परतले."

भैंसपाडा वस्तीतले प्रत्यक्षदर्शी आणि पोलीस यांच्या वर्णनात प्रचंड तफावत आहे.

मुस्तकीम, नौशाद, सलमान आणि नफीस यांना भैंसपाडाहून पकडलं नव्हतं का? असा प्रश्न आम्ही विचारला.

बाजूला बसलेले अलीगढचे एसपी अतुल श्रीवास्तव यांचं उत्तर असं होतं. "नाही. मुस्तकीम आणि नौशाद फरार होते. बाकीच्यांना अन्य ठिकाणांहून अटक करण्यात आली."

एन्काउंटर , उत्तर प्रदेश
फोटो कॅप्शन, नौशादची आई शाहीन

मुस्तकीम आणि नौशाद यांच्या कुटुंबीयांच्या पार्श्वभूमीचा तपास केला जात आहे असा दावा पोलिसांनी केला आहे. हे लोक या ठिकाणी नऊ महिन्यांपूर्वीच भाड्यानं राहायला आले होते.

याआधी हे लोक छर्रा इथं बऱ्याच वर्षांपासून राहत होते. त्याआधी ते कुठे राहत होते हे अजून आम्हाला माहीत नाही.

नौशादची आई आणि मुस्तकीमच्या आजीचं असं म्हणणं आहे की 15 वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब बिहारहून उत्तरप्रदेशातला या भागात राहायला आलं होतं.

नौशाद आणि मुस्तकीम यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांनी हत्येच्या गुन्ह्यांतील सहभागाची कबुली दिली होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

माध्यमांतल्या काही लोकांनीच नव्हे तर काही पोलिसांनी देखील आपल्या फोनवर पूर्ण एनकाउंटर रेकॉर्ड केल्याचं म्हटलं जात आहे.

ज्या वेळी नौशाद आणि मुस्तकीम हा गुन्हा कबुल करत होते त्यावेळी एकाही पोलीसाच्या खिशात कॅमेरा असलेला फोन नव्हता का?

20 सप्टेंबरच्या संध्याकाळी अलीगढच्या सरकारी रुग्णालयातल्या शवागृहात या दोघांचे मृतदेह पाहिले आहेत ही गोष्ट राष्ट्रीय माध्यमांतल्या काही पत्रकारांनी पोलिसांना सांगितली होती.

त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही युवकांपैकी एकाची आई आणि दुसऱ्याच्या पत्नीला मुद्दामहून माध्यमांपासून दूर ठेवण्यात आलं.

पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की शवगृह असो वा दफनभूमीत आम्ही कुणाला अडवलं नाही.

एक महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस आणि मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या कथनात ताळमेळ बसत नाहीये.

कुटुंबीयांनुसार मुस्तकीमचं वय 22 आणि नौशादचं वय 17 होतं.

तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुस्तकीमचं वय 25 आणि नौशादचं वय 22 होतं.

मृतांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी जेव्हा छापा मारला तेव्हा सर्व कागदपत्रं जप्त केली.

तर पोलीस म्हणत आहेत की त्यांची पार्श्वभूमी आणि ओळख पटण्यासाठी आम्ही अजून तपास करत आहोत.

पोलिसांनी ही गोष्ट शेवटी मान्य केली की गुंडांसोबतच्या चकमकीची माहिती माध्यमातील काही पत्रकारांना देण्यात आली होती. कारण माध्यमातून विचारपूस सुरू झाली होती.

सध्या काय सुरू आहे?

या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे.

बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय लोक दल, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रशासनावर खोट्या एन्काऊंटरचे आरोप केले आहेत.

या घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी तसंच मानवाधिकार आयोगानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती कुटुंबीयांनी आणि पत्रकारांनी प्रसिद्धिपत्रक काढून केली आहे.

हे सर्वं घडत असतानाच काही 'बिगर राजकीय संघटनांनी' प्रशासनाची वारेमाप स्तुतीदेखील केली आहे.

एन्काउंटर , उत्तर प्रदेश
फोटो कॅप्शन, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जेव्हा बीबीसीची टीम उपस्थित होती त्यावेळी किमान अशा तीन संघटनांशी निगडित लोक आले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ दिले. गेल्या महिन्यात झालेल्या सहा हत्याप्रकरणांचा छडा लावल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

उल्लेखनीय बाब आहे की गेल्या वर्षभरापासून उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या एन्काऊंटरच्या प्रकरणातली ही सर्वांत ताजी घटना आहे.

भाजप सरकारचं म्हणणं आहे की ही मोहीम भाजप सरकारच्या गुन्ह्याबाबत असलेल्या झिरो टॉलरन्सच्या धोरणाचा एक भाग आहे. भाजप सत्तेत येऊन दोन वर्षं झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत 1000 हून अधिक पोलीस एनकाउंटर झाले आहेत. त्यात 67 'गुन्हेगार' मारले गेले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)