You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त, विमान प्रवासात या गोष्टी ठेवा लक्षात
मुंबईहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी आवश्यक स्वीच सुरू करण्यास क्रू कर्मचारी विसरल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला.
मुंबईहून जयपूरच्या दिशेने विमानानं उड्डाण केलं. हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी एक स्विच सुरू करणं आवश्यक असतं. मात्र तो सुरू करण्यास कर्मचारी विसरले आणि हवेचा दाब कमी झाला.
या विमानात 166 प्रवाशी होते. यापैकी 30 प्रवाशांच्या कान तसंच नाकातून रक्त वाहू लागलं. काही लोकांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. काहीजणांना मळमळही होऊ लागली. विमानानं उड्डाण केल्यानंतर घडलेल्या या प्रकारानं घबराटीचं वातावरण होतं. हवेचा दाब कमी झाल्याने ऑक्सिजन मास्क बाहेर निघाले. त्यावेळचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनेकांना त्रास झाल्याने हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशनं नेण्यात आलं. मुंबईत विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. विमानात त्रास झालेल्या प्रवाशांना विमानतळावरील दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान डीजीसीएने अर्थात 'डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन' याप्रकाराची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तसंच केबिन क्रूला निलंबित करण्यात आलं आहे.
जेट एअरवेजच्या B737 या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान "सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानाबाहेर नेण्यात आलं. सर्व प्रवाशांना उपचार पुरवण्यात आले आहेत. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत केबिन क्रूचं निलंबन करण्यात आलं आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जयपूरला जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही वैमानिकांचंही निलंबन करण्यात आलं आहे," असं जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितलं.
हवाई वाहतूक मंत्रालयाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डीजीसीएला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवेचा दाब कमी झाला तर काय होतं?
विमान हवेत झेपावण्यापूर्वी हवाई सुंदरी प्रवाशांना सूचना देतात. आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं ते सांगतात. विमान पाण्यात किंवा आव्हानात्मक ठिकाणी उतरवण्याची वेळ आल्यास काय करायचं तेही सांगितलं जातं.
विमानात हवेचा दाब कमी झाल्यास ऑक्सिजन मास्क ड्रॉप डाऊन होतील अशा वाक्यानं सुरुवात होते. तो मास्क लावून श्वास कसा घ्यायचा हे समजावून देण्यात येतं. लहान मुलांना त्रास झाला तर कशी मदत करावी हेही सांगण्यात येतं.
प्रवाशांची नेआण करणारं विमानं साधारणत: 40,000 फूट उंचीवरून वाहतूक करतात. एवढ्या प्रचंड उंचीवर ऑक्सिजनची पातळी विरळ असते.
तुम्ही नेहमीप्रमाणे श्वास घेऊ लागलात तर 12 सेकंदात तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिशांचं भान हरपू शकतं, बेशुद्ध पडायला होऊ शकतं आणि कदाचित मृत्यूही ओढवू शकतो.
विमान हवेत झेपावताना तसंच नंतरही केबिन प्रेशर म्हणजे विमानाच्या आतला हवेचा दाब बदलत राहतो. म्हणूनच विमान प्रवासादरम्यान कानात दडे बसतात.
हवेचा दाब नियंत्रित करणं ही शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. पण तसं झालं नाही तर विमान 8000 फूट उंचीपर्यंत खाली आणावं लागतं. जेणेकरून प्रवासी श्वास घेऊ शकतील. अशावेळी त्यांनी आपात्कालीन परिस्थितीत आवश्यक गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. त्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी बोलणं आवश्यक असतं. विमानतल्या अन्य यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची शहानिशा करावी लागते.
अशा वेळी काय कराल?
एअरक्राफ्ट ऑक्सिजन सिस्टममध्ये 12 मिनिटांचा राखीव ऑक्सिजनसाठा असतो.
हवेचा दाब नियंत्रित न झाल्यास प्रवासी दोन स्वरुपाच्या तक्रारी करतात असं अनुभवी क्रू कर्मचारी सांगतात. पहिली म्हणजे ऑक्सिजन मास्क काम करत नाही आणि दुसरी म्हणजे क्रू कर्मचाऱ्यांनी याबाबत नीट माहिती न देणं.
मास्कमधून हलक्या स्वरुपात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे प्रवाशांना मास्कच्या यंत्रणेत गडबड असल्याचं वाटू शकतं. तणावात असलेले प्रवासी मास्क पूर्ण ओढायचा प्रयत्न करतात. काहीवेळेला ते मास्कची यंत्रणा पूर्ण खेचून तोडण्याचा प्रयत्न करतात.
आपात्कालीन परिस्थितीत गोंधळाची परिस्थिती असते. सूचना देण्यात गडबड होऊ शकते. नक्की कशामुळे काय होतं आहे याची क्रू कर्मचाऱ्यांनाही माहिती नाही असं होऊ शकतं. क्रू सगळ्या गोष्टी नीट करण्याच्या प्रयत्नात असतात. पण प्रवाशांची संख्या खूप असते आणि क्रू मर्यादित असतो.
अशावेळी प्रवाशांनी लवकरात लवकर मास्क घालणं अपेक्षित आहे. विमानात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं किंवा आजारी व्यक्तीही असतात. लहान मुलं पालकांच्या मांडीवर असतात. त्यावेळी चटकन मास्क परिधान करणं अवघड होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)