बीबीसी न्यूज मराठीचं पहिलं मराठी डिजिटल बुलेटिन आजपासून JioTV अॅपवर

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस पहिल्यांदाच भारतात मोबाईल प्रेक्षकांसाठी बातमीपत्र घेऊन येत आहे. 'बीबीसी विश्व' हे बीबीसी न्यूज मराठीचं बातमीपत्र आजपासून रिलायन्स JioTV अॅपवरच्या 24 तास व्हीडिओ स्ट्रीमिंगद्वारे बघता येईल.

'बीबीसी विश्व' या बुलेटिनचं थेट प्रक्षेपण संध्याकाळी 7 ते 7.20 या कालावधीत होईल.

JioTV वर भारतीय भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करणारी बीबीसी ही एकमेव आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे. जिओच्या माध्यमातून बीबीसी न्यूज मराठीला देशातल्या सगळ्यांत मोठ्या 4G नेटवर्कवरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची ही सर्वोत्तम संधी असेल.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे कार्यक्रम मोबाईल प्रेक्षकांपर्यंत नेणारा हा पहिलाच अभिनव प्रयत्न आहे. या समन्वयातून ट्रेंडिंग विषय, राजकारण, युवा, खेळ, मनोरंजन, व्यापार, आरोग्य, शिक्षण अशा विविधांगी विषयांवरचं दर्जेदार वृत्तांकन नियमितपणे पाहता येईल.

'बातमीच्या पल्याड जात सर्वसमावेशक विश्लेषण' ही डिजिटल विश्वातल्या अनोख्या अशा 'बीबीसी विश्व' बातमीपत्राची ओळख असेल. देशभरातील तसंच जगभरातल्या बीबीसी प्रतिनिधींच्या विश्वासार्ह आणि आशयघन बातम्या आणि विश्लेषण पाहण्याची, ऐकण्याची संधी मराठी प्रेक्षकांना या निमित्ताने मिळणार आहे.

"महाराष्ट्रातील तरुण मंडळी हल्ली बातम्यांसाठी डिजिटल माध्यमांना पसंती देऊ लागली आहेत. हे लक्षात घेऊनच आम्ही मराठीतलं पहिलं डिजिटल बुलेटिन घेऊन आलो आहोत. जागतिक घडामोडींची जाण असणाऱ्या मराठी तरुण-तरुणींना बीबीसीच्या विश्वासार्ह बातम्या आणि उत्तमोत्तम कथा पाहता येतील," असं बीबीसी न्यूज मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी सांगितलं.

"सध्याच्या जगात प्रेक्षकांपर्यंत नव्या संकल्पना, नवीन रूपात घेऊन जाण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. डिजिटल फॉरमॅटमध्ये भारतीय भाषांमध्ये बातम्या आणि कार्यक्रम तयार करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशातल्या तरुणांना एका क्लिकवर अव्वल दर्जाचे डिजिटल कार्यक्रम पाहता यावेत या उद्देशाने JioTV अॅपच्या प्रयत्नांचा 'बीबीसी विश्व' हे बातमीपत्र निर्णायक असणार आहे. जिओच्या लक्षावधी मराठी प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या मातृभाषेत कार्यक्रम देता येणं खूपच समाधान देणारं आहे," असं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ज्योतिंद्र ठाकर म्हणाले.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने गेल्या वर्षभरात विस्तारीकरणाचा भाग म्हणून जगभरात 12 विविध भाषांमध्ये डिजिटल तसेच टीव्ही वृत्तसेवा देण्यास सुरुवात केली. यापैकी भारतात बीबीसीने हिंदी आणि तामिळच्या बरोबरीने मराठी, तेलुगू, पंजाबी आणि गुजराती या चार नव्या भाषांमधील वेबसाइट्स आणि टीव्ही बुलेटिन सुरू केले आहेत. या चार सेवांसाठी बीबीसीने भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, आणि JioTV अॅपवर बीबीसी मराठीचं 'बीबीसी विश्व' न्यूज बुलेटिन याच सेवेचा भाग आहे.

या नव्या सेवांसाठी बीबीसीच्या दिल्ली ब्युरोचा विस्तार करण्यात आला. यामुळे UKनंतर दिल्ली ब्युरो हा बीबीसीचा जगातला दुसरा सगळ्यांत मोठा ब्युरो झाला आहे. या ब्युरोच्या माध्यमातून दक्षिण आशियाई प्रदेशासाठीचे डिजिटल आणि टीव्ही कार्यक्रम तयार करून प्रक्षेपित केले जातात.

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडित महत्त्वाच्या गोष्टींचा वेध घेण्याचा 'बीबीसी विश्व'चा प्रयत्न असेल. देश आणि जगभरातल्या प्रतिनिधींहे या बुलेटिनचं वैशिष्ट्य असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)