उमरेड बलात्कार : स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात, ती मृत्यूशी झुंज देत होती

    • Author, जयदीप हर्डीकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी नागपूरहून

"हे कृत्य माणसाचं नाही, कुठल्यातरी जनावरचं वाटत होतं," नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राजेश अटल सांगत होते. "ती वेदनेने कण्हत होती. तिचा श्वास संथ झाला होता आणि श्वास घेतानाही तिला त्रास होत होता. तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार करण्यात आला होता."

डॉ. अटल 26 वर्षांच्या ज्या महिला पेशंटविषयी सांगत होते, तिला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. तिच्यावर नागपूरच्या उमरेड तालुक्यात बलात्कार झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण हे कृत्य करणाऱ्यांनी इथेच न थांबता तिच्यावर 2.5 किलोंच्या दगडाने हल्ला करून तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला.

14 ऑगस्टच्या संध्याकाळी तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, तेव्हा तिची खूपच प्रकृती चिंताजनक होती. तिच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जबर जखम झाली होती, जबड्याचं हाड मोडलं होतं आणि डाव्या डोळ्याच्या खोबणीतून बुब्बूळ बाहेर आलं होतं. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या आणि बराच रक्तस्राव झाला होता.

नेमकं काय झालं होतं?

नागपूरपासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेडच्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (WCL) कोळशाच्या खाणीत ही महिला काम करते. तिथे असलेल्या एका वे-ब्रिजपासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली, तेही भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एक दिवस आधी.

'गोकुळ' ही WCLची खाण जंगलाच्या मधोमध असून ती 2015 साली कार्यान्वित झाली आहे. 756 हेक्टरवरील ही खाण 11 वर्षं सुरू राहणार आहे.

इथे चार वे-ब्रिज आहेत. या वे-ब्रिजवर किंवा धर्मकाट्यावर आधी रिकाम्या ट्रकचं वजन केलं जातं, त्यानंतर ट्रक भरून पुन्हा त्याचं वजन केलं जातं, जेणेकरून भरलेल्या मालाचं वजन कळू शकेल. पण या वे-ब्रिजवर कोणतंही स्वच्छतागृह नाही.

ही घटना घडली त्यादिवशी वे-ब्रिज क्रमांक 4 वरील एक कर्मचारी न आल्यामुळे पीडितेला तिथे पाठवण्यात आलं होतं. पीडितेकडे रिकाम्या ट्रकचं आणि भरलेल्या ट्रकचं वजन यांची काँप्युटरवर नोंद करण्याची जबाबदारी होती.

त्या दिवशी तिथे काम करणारी ती एकटीच महिला होती. दुपारी 1.50 वाजता जेवण झाल्यानंतर पीडित महिला शौचालयात गेली. या खाणीच्या कँटिनपासून हा वे-ब्रिज 500 मीटर अंतरावर आहे. आणि तिथून बांबूच्या तट्ट्यांपासून बनवलेलं हे शौचालय 300 फूट अंतरावर एका नाल्यावर आहे. या वे-ब्रिजपासून चिखलाने भरलेला रस्ता तुडवत संडासापर्यंत जावं लागतं.

इथल्या काळ्याकुट्ट रस्त्याच्या बाजूने वे-ब्रीजवर अनेक ट्रक रांगेने उभे होते. उमरेड पोलीस ठाण्यातील निरीक्षक प्रकाश हाके सांगतात, "वे-ब्रिज क्रमांक 1वर असलेल्या CCTVतील फुटेजवरून ही महिला दुपारी 2 च्या आसपास टॉयलेटला जाताना दिसते. तिच्या मागेमागे संशयितही जाताना दिसतो. 17 मिनिटांनंतर संशयित परत येताना दिसतो, पण ती महिला परत येताना दिसत नाही."

तिथे काय घडलं कुणीही पाहिलं नाही. संडासकडे जाणारा मार्ग दिसण्यात ट्रकमुळे अडथळा येत होता, नाहीतर कुणीतरी तिला वाचवू शकलं असतं.

एका वयस्कर ट्रक ड्रायव्हरला नाल्याच्या बाजूने या संडासमधून तिच्या कण्हण्याचा आवाज ऐकू आल्याने तिला शोधता आलं. ती या संडासात पडली होती आणि तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. मात्र ती शुद्धीवर होती.

तोवर खाणीतील कामगार तिथं धावले. यात काही महिलाही होत्या. पीडितेला एका तात्पुरत्या स्ट्रेचरवरून खाणीतील डिस्पेन्सरीत नेण्यात आलं. तिथून तिला अँब्युलन्समधून नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिच्यासोबत तीन महिला आणि दोन पुरुष कर्मचारी होते.

'उमरेड सर्व्हायव्हर'

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, जेव्हा देशभर आनंदाचं वातावरण होतं, तेव्हा या हॉस्पिटलचे डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये या महिलेला वाचवण्यासाठी आठ तास कष्ट घेत होते. डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या माथ्यावर आणि डोक्यावर बरेच फ्रॅक्चर झाले होते. सुदैवाने मेंदूला दुखापत नव्हती. तिचा दात तुटला होता आणि जबडा पूर्णपणे फ्रॅक्चर झाला होता.

"अशा प्रकारचं क्रौर्य मी माझ्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये कधी पाहिलेलं नाही," डॉ. अटल म्हणाले. "तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, तेव्हा तिचा रक्तदाब खूपच खाली गेला होता. आमच्या हातून वेळ निघून चालली आहे, असा आम्हाला वाटत होतं. तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आणखी थोडा जरी उशीर झाला असता तर ते जीवघेणं ठरलं असतं."

पुढचे काही तास डॉक्टर तिची प्रकृती स्थिरावण्यासाठी झटत होते. त्या रात्री तिची प्रकृती स्थिरावरली. तिच्या जखमांवर पहिल्या टप्प्यात काही शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यानंतरच्या आठवड्यात तिच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

तिची प्रकृती धोक्याबाहेर असून बरीच सुधारली आहे. "ती अजून बोलू शकत नाही. खाणाखुणातून ती संवाद साधते," असं डॉक्टर सांगतात. ती काही दिवसांत बोलू शकेल, असं ते सांगतात.

या महिलेचा उल्लेख हॉस्पिटलमध्ये 'उमरेड सर्व्हायव्हर' असा करण्यात आला आहे.

आरोपी कोण?

पोलिसांनी या प्रकरणी मम्लेश चक्रवर्ती (24) आणि संतोष माळी (40) यांना संशयित म्हणून अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न (कलम 307) आणि बलात्कार (कलम 376-D) असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे दोघं मूळचे मध्य प्रदेशातील देवासचे राहिवासी असून एका कंपनीच्या ट्रकवर ते काम करतात. WCLच्या या खाणीतून काढण्यात आलेला कोळसा देशभरात पोहोचवण्याचं काम ते करायचे.

या गुन्ह्यातील तपासासाठी तिचा जबाब नोंदवणं फार आवश्यक आहे, असं उमरेडच्या पोलीस उपअधीक्षक पौर्णिमा तावरे यांनी सांगितलं. तिची साक्ष नोंदवल्यानंतर संशयितांचे अन्य कोणी साथीदार होते का, हे स्पष्ट होईल, असं पोलिसांचं मत आहे.

यातील माळी हा ट्रक चालक तर चक्रवर्ती हा क्लिनर आहे. हा चक्रवर्तीच मुख्य संशयित असून हे कृत्य करताना तो दारूच्या नशेत होता, असं पोलीस सांगतात. गुन्ह्याची नोंद होताच त्यांना त्यांच्या ट्रकमधून अर्ध्या तासातच अटक करण्यात आली.

त्यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

'तिची अनेक स्वप्नं आहेत'

"माझी मुलगी बोलेल आणि तिच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेल," या पीडितेची आई सांगत होती. आपल्या मुलीला ज्या पाशवी अत्याचाराला सामोरं जावं लागलंय, त्याच्या धक्क्यात त्या अजूनही होत्या. हॉस्पिटलमध्ये बीबीसी मराठीशी बोलताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते.

पीडितेने डिसेंबर 2016पासून इथे काम सुरू केलं, अशी माहिती तिच्या भावाने दिली. तिचं सहा महिने ट्रेनिंगही झालं होतं.

घटनेच्या 10 दिवसांपूर्वीच पीडितेने तिच्या पालकांसह 26वा वाढदिवस साजरा केला होता आणि ती लगेच कामावर रुजू झाली होती. ती कला शाखेची पदवीधर असून उमरेडमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहते. तिथून कामावर जाण्यासाठी तिला दररोज कंपनीच्या बसने 32 किलोमीटर प्रवास करावा लागतो. कधी गरज पडल्यास ती दुचाकीने कामावर जाते, असं तिच्या घरच्यांनी सांगितलं.

"इथलं काम फारच अवघड परिस्थितीत आहे. त्यामुळे मला नेहमीच तिची काळजी वाटत होती. पण ती आमची समजूत काढायची. तिला तिच्या पायावर उभं राहायचं होतं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं होतं," असं तिची आई म्हणाली.

पीडितेचं कुटुंब छत्तीसगढच्या भिलाईमध्ये राहतं. तिथे तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात. आई गृहिणी आहे तर भाऊ एका दवाखान्यात काम करतो. या कुटुंबाची उमरेडमध्ये शेती होती. पीडितेच्या वडिलांना पाच एकर शेतजमीन WCLला द्यावी लागली. त्या बदल्यात भरपाई म्हणून त्यांच्या मुलीला कंपनीत कारकुनाची नोकरी देण्यात आली होती.

"आमची मुलगी स्वतंत्र बाण्याची आहे, धाडसी आहे. तिची अनेक स्वप्नं आहेत," असं तिची आई सांगते.

चौकशी सुरू

खाणकामात महिलांनी काम करणं पूर्वी दुरापास्तच होतं. पण आता या पीडितेसारख्याच अनेक महिला या क्षेत्रात काम करतात. पण या घटनेमुळे WCLमध्ये काम करण्यासाठी या उणिवाही लक्षात घ्याव्या लागतील.

खाणीचे सुरक्षाधिकारी रवींद्र खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार WCLच्या या 'गोकुळ' या खाणीवर पीडित महिलेसह एकूण आठ महिला काम करतात. दोघींची नियुक्ती क्रमांक 1च्या वे-ब्रिजवर करण्यात आली आहे, दोघी जणी कँटिनमध्ये भांडी धुण्याचं काम करतात तर चार महिला खाण व्यवस्थापकाच्या कार्यालयात काम करतात.

या खाणीत किंवा इतर कोणत्याही खाणींत पहिल्यांदाच एखाद्या महिलेची नियुक्ती वे-ब्रिजवर करण्यात आली होती. या प्रकरणात हलगर्जीपणाची शक्यता लक्षात घेऊन व्यवस्थापक G. S. राव यांची विभागीय चौकशी सुरू असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

उमरेड रस्त्यावर

घटनेची माहिती बाहेर आली तेव्हा संपूर्ण नागपुरात हळहळ व्यक्त होत होती. 16 ऑगस्टला उमरेडमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि पीडितेला न्याय मिळावा, यासाठी आंदोलन करू लागले. महिला कर्मचाऱ्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या WCLच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावं, अशी त्यांची मागणी होती.

जवळजवळ 10 हजार कार्यकर्ते एकत्र आले. या रॅलीमुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना खाणीला भेट देणं भाग पडलं. त्यांनी खाणीतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली आणि गुन्हेगारांना कडक शासन करण्याचं तसंच काही हलगर्जीपणा झाला असेल तर अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

पीडित महिलेने इतर महिला कर्मचाऱ्यांसह कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृह आणि इतर सुविधा नसल्याची तक्रार तोडीं स्वरूपात केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असा दावा तिच्या पालकांनी केला आहे.

पण आता WCL वे-ब्रिज क्रमांक 1च्या जवळ स्वच्छचागृह उभारण्यात येत आहेत.

ज्या वाहतूक कंपनीसाठी हे दोन संशयित काम करत होते, त्या कंपनीला WCLने ब्लॅकलिस्ट केलं आहे.

WCLमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं की उमरेड आणि इथल्या इतर खाणींत सर्वसाधारण गटातील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती झाली आहे. यातील अनेकांची नियुक्ती ही कुटुंबांची जमीन अधिग्रहण केल्याने भरपाई म्हणून करण्यात आली आहे. या सर्वसाधारण गटातील काही कामगार इंजिनीअर, M.Tech आणि MBA झालेले आहेत.

जेव्हा पीडितेच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात आली तेव्हा कुटुंबीयांनी तिची निवड केली, कारण ती एक पदवीधर आहे, तसंच तिचा भाऊ आधीच एका खासगी कंपनीत व्यवस्थापक आहे. तिनेही ही नोकरी लगेच स्वीकारली.

कोल इंडियाचा मुख्य घटक असलेल्या WCLचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. बीबीसीने या कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना महिलांची सुरक्षा आणि या गुन्ह्यात जबाबदारी निश्चितीच्या संदर्भात ईमेलने प्रश्न विचारले आहेत. पण त्याला अजून उत्तर देण्यात आलेलं नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तिचा समावेश या बातमीत केला जाईल.

काही प्रश्न अजूनही अनुत्तरित

WCLच्या खाणीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात काही प्रश्न उभे राहतात -

1. पीडितेची नियुक्ती जिथं तिला ट्रक चालक, क्लिनर आणि इतर लोकांसमवेत काम करावं लागणार, अशा ठिकाणी म्हणजे वे-ब्रिजवर कुणी केली?

2. महिला कर्मचाऱ्यांबद्दल कंपनीचं काय धोरण आहे?

3. WCLने उमेरडमधील एका वरिष्ठ महिला कर्मचारी व्यवस्थापकाची बदली तातडीने नागपूरला का केली? यातून कंपनीला कुणाची कातडी वाचवायची आहे की कुणाला बळीचा बकरा करायचं आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

WCLने हलगर्जीपणाबद्दल 10 ते 12 अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याचं समजतंय. वे-ब्रिजनजीक स्वच्छतागृह नसल्याबद्दल सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहे. पण कामगार विभागाला अजून कोणतंही उत्तर मागण्यात आलेलं नाही. खाणीच्या ज्या परिसरात सुरक्षा आणि संरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत, अशा ठिकाणी सर्वसाधारण गटातील महिलांची नियुक्तीची प्रथम जबाबदारी याच विभागावर येते.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, "कंपनीमध्ये 300च्यावर महिला कर्मचारी सुशिक्षित आहेत, ज्या सर्वसाधारण गटातील कर्मचारी म्हणून नेमण्यात आल्या आहेत. पण त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा, याबद्दल कंपनीकडे काही नियोजन नाही. ज्या ठिकाणी महिलांसाठी अतिशय असुरक्षित परिस्थिती आहे, तिथं मुलींची नियुक्ती करताना कामगार विभाग दुसऱ्यांदा विचारही करत नाही."

एखाद्या खाणीमध्ये वे-ब्रिजसारख्या ठिकाणी महिलांना काम करण्यासाठी परिस्थिती फार काही चांगली नसते. पीडिता तर इथे दररोज 800 ट्रकांसोबत काम करत होती. सुरक्षेची कसलीही व्यवस्था नसताना हे महिलांसाठी असुरक्षित आहे. अशा ठिकाणी दारू प्यालेले आणि उद्धट क्लिनर तुम्हाला भेटतात. या महिलेला सुद्धा त्या वाईट दुपारी दुर्दैवाने अशाच लोकांची गाठ पडली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)