दरवेळी सुवर्ण जिंकणाऱ्या भारतीय कबड्डी संघांचं आशियाई गेम्समध्ये नेमकं कुठं चुकलं?

फोटो स्रोत, Twitter
- Author, शिवकुमार उलगानाथन
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाचं झालं की भारताच्या कबड्डी संघांना सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. ना पुरुष ना महिला संघाला जेतेपद पटकावता आलं नाही.
भारतीय पुरुषांची टीम 18-27नं इराणकडून पराभूत झाली आणि त्यांचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. गुरुवारी महिला टीम इराणकडून पराभूत झाली.
1990 मध्ये बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धांपासून कबड्डीचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला. आतापर्यंत भारतानं या स्पर्धांमध्ये सात वेळा सुवर्ण पदक पटकावलं आहे. यावेळी मात्र भारतीय पुरुष खेळाडूंना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
2010 पासून आशियाई खेळांमध्ये महिला कबड्डी स्पर्धेचा समावेश करण्यात आला. मागच्या दोन स्पर्धांमध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला सुवर्ण पदक मिळालं. पण यावेळी महिला संघाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं.
या कामगिरीमुळे भारतीय कबड्डी रसिकांमध्ये नाराजी आहे. भारताचं या खेळातलं वर्चस्व संपुष्टात आलं का, अशी चर्चा होऊ लागली आहे. कबड्डीतल्या पराभवाची कारणं काय आहेत, याचा शोध बीबीसीनं घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय पुरुषांचा कबड्डी संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण भारतीय संघावर दोन सामन्यांमध्ये पराभूत होण्याचा प्रसंग ओढावला. नेमकी चूक कुठे घडली?
"तो दिवसच भारताचा नव्हता, असं म्हणावं लागेल. त्या दिवशी आम्हाला नशिबाची साथ मिळाली नाही. आमचे खेळाडू अनुभवी आणि उत्तम होते, पण काही गोष्टी आमच्या नियोजनाप्रमाणे घडल्या नाहीत," असं भारतीय संघाचे प्रशिक्षक रामबीर सिंह सांगतात.
"अजय ठाकूर, दीपक हुडा आणि संदीप हे खेळाडू अनुभवी आहेत, पण आमची रणनीती चालली नाही," ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
या पराभवामुळं आपलं कबड्डीतलं वर्चस्व संपुष्टात आलं आहे का, असं विचारलं असता ते सांगतात, "नाही. एक-दोन वेळा हरल्यावर आपण असं म्हणू शकत नाही. यामुळे भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसला नाही. आपण अजूनही शर्यतीत पुढेच आहोत. आपल्याकडे असणाऱ्या अनुभव आणि सामर्थ्याच्या जोरावर आपण पुन्हा उसळी मारू शकतो."
"खेळात विजय-पराजय असतातच. या दोन्ही गोष्टी खेळाचा भाग आहेत," असं रामबीर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात गेल्या काही वर्षांपासून प्रो-कबड्डी लीग सुरू झाली आहे. IPLच्या धर्तीवर असलेल्या या व्यावसायिक स्पर्धेत भारताचे तसेच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू एकाच संघांकडून खेळतात. त्यामुळे अशा स्पर्धांमुळे भारतीय कबड्डीपटूंचं तंत्र विदेशी खेळाडूंना कळतं आणि त्याचा त्यांना फायदा होतो, अशी टीका जाणकार करतात.
त्यावर कोच सिंग सांगतात, "प्रो-कबड्डीमुळे जसं आपल्या खेळाडूंच्या शक्तिस्थानांची आणि कमतरतेची जाणीव विदेशी खेळाडूंना होते, तसंच विदेशी खेळाडूंच्या खेळाची माहिती आपल्या खेळाडूंनाही होते. अशा स्पर्धांमुळे कबड्डी जागतिक स्तरावर जाण्यास मदत होते. हे आमच्या पराभवाचं कारण नाही आणि त्यांच्या सामर्थ्याचं कारण नाही," असं ते ठामपणे सांगतात.
"जेव्हा भारत सातत्यानं जिंकत होता तेव्हा हा प्रश्न कुणालाच पडला नाही की आम्ही नेमक्या काय गोष्टी बरोबर करत आहोत. पण एकदा हरलो की सर्व बाजूंनी प्रश्नांचा भडिमार होत आहे," रामबीर सांगतात.

फोटो स्रोत, Twitter
2016मध्ये भारताने कबड्डीचा विश्वचषक जिंकणाऱ्या टीमचे एक सदस्य होते चेरलाथन. एशियन गेम्समध्ये भारताच्या पराभवाबद्दल बोलताना चेरलाथन यांनी निराशा व्यक्त केली.
"ही दुःखद गोष्ट आहे. लीग सामन्यांवेळी दक्षिण कोरियाविरोधात आपण सामना हरल्यानंतर पुढचे सामने अधिक काळजीने खेळण्याची गरज होती. भविष्यात आपल्या खेळाडूंना कसून तयारी करावी लागणार आहे," ते म्हणाले.
"सेमी-फायनल मॅचच्या वेळी भारतीय कर्णधार ठाकूर हे जखमी झाले होते. त्यामुळे भारताला फटका बसला. भारतीय खेळाडूंकडून महत्त्वाच्या वेळी चुका झाल्या," असं ते सांगतात.
भारत उत्कृष्ट संघाकडून हरला
भारतीय महिला संघाच्या कामगिरीबद्दल आम्ही माजी कबड्डीपटू तेजस्विनी यांच्याकडून जाणून घेतलं. त्या म्हणतात, "भारतीय महिला संघानं परिश्रम घेतले पण फायनलमध्ये इराणकडून हार पत्करावी लागली. जेव्हा सर्वाधिक गरज होती त्याचवेळी मात्र त्यांना आपलं कौशल्य पणाला लावता आलं नाही."

फोटो स्रोत, Twitter
"भारतीय संघाच्या रायडर्सची (चाल करून जाणारे खेळाडू) महत्त्वाच्या वेळी पीछेहाट झाली. आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपण एका उत्कृष्ठ संघाकडून पराभूत झालो आहोत. ते चँपियनसारखे खेळले आणि जिंकले, याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल."
भारताचं वर्चस्व संपुष्टात?
"भारत फक्त इराणकडून हरला नाही तर लीग मॅचमध्ये दक्षिण कोरियाकडूनही हरला. भारताचा विश्वचषकातही पराभव झाला," असं कबड्डीपटू थॉमस सांगतात.
"इतर काही टीमचे चांगले खेळत आहेत. त्यांची तयारी आणि सराव दोन्ही चांगली असते. भारताला आत्मपरीक्षणाची गरज आहे. जर आपण ते केलं नाही तर भारताचा या खेळातला वर्चस्व कमी होऊ शकतो," असं थॉमस सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
इराणनं भारताचा 28 वर्षं चाललेला अश्वमेध रोखला. भारतीय कर्णधार अजय ठाकूर रडत असतानाचे आणि भारतीय महिला टीम हरल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पाहून भारतीय क्रीडा रसिकांचं मन हेलावून गेलं.
काही लोकांनी या पराभवाची तुलना भारतीय हॉकी टीमच्या पराभवाशी केली. 1980मध्ये भारतीय हॉकी संघानं मॉस्को ऑलिम्पिकमध्ये शेवटचं सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यानंतर भारतीय हॉकीला ही उंची गाठता आली नाही.
या पराभवानंतर भारतीय कबड्डी संघांनं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याबरोबरच ते हे देखील म्हणतात एका पराभवानंतर भारताच्या आशा संपुष्टात आल्या नाहीत. भारत आपलं पुनरागमन करू शकतो.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








