You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत राजघाटजवळ असलेल्या स्मृतिस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दत्तक मुलगी नमिता भट्टाचार्य यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
वाजपेयी यांचं दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटलमध्ये काल संध्याकाळी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. मूत्राशयाचा त्रास वाढल्यामुळे जून महिन्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सायं. 5.00 - अखेरचा निरोप
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांची दत्तक मुली नमिता यांनी अग्नी दिला.
दुपारी 4.30 - अंत्यविधी सुरू
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरू. त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा वाजपेयी यांची नात निहारिका यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दुपारी 4.10 - वाजपेयींचं अंतिम दर्शन
स्मृती स्थळावर वाजपेयी यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भूतानचे राजे जिग्मे वांगचूक, नेपाळचे राष्ट्रपती प्रदीपकुमार ग्यावाली, बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अब्दुल हसन अली, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री अली जाफर, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री लक्ष्मण किरिएलिया उपस्थित आहेत.
दुपारी 3.50 - पार्थिव स्मृती स्थळी पोहोचले
वाजपेयी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा स्मृती स्थळी पोहोचली. लष्करानं त्यांना मानवंदना दिली.
दुपारी 2.45 - अंत्ययात्रा विजय घाटाच्या दिशेनं...
वाजपेयी यांच्या पार्थिवाचा अखेरचा प्रवास सुरू आहे. वाजपेयींच्या चाहत्यांनी त्यांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
दुपारी 2.00 - अखेरचा प्रवास सुरू
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सुरू. मुख्यालयातून विजय घाटकडचा प्रवास सुरू. सायंकाळी पाच वाजता होणार अंत्यसंस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्ययात्रेत सहभागी.
दुपारी 1.45 -भूतान नरेशांनी घेतले दर्शन
भूतानचे राजे जिग्मे वांगचूक यांनी वाजपेयी यांचं दर्शन घेतलं.
दुपारी 12.00 - अडवाणी, ठाकरे यांनी घेतले दर्शन
लालकृष्ण अडवाणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाजपेयी यांचं अंत्यदर्शन घेतलं.
सकाळी 11.00 - पार्थिव मुख्यालयात
वाजपेयी याचं पार्थिव भाजप मुख्यालयात पोहोचलं आहे. तिथं ते दुपारी एक वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घेतलं दर्शन.
सकाळी 10.15 - मुख्यालयात गर्दी
भाजपच्या मुख्यालयात वाजपेयी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे.
सकाळी 9.50 - निवासस्थानाहून पार्थिव निघाले
अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव लष्करी वाहनावरून भाजप मुख्यालयाकडे निघालं. मोठा जनसमुदाय उपस्थित.
भाजप मुख्यालयात दुपारी एकपर्यंत वाजपेयींचं दर्शन घेता येणार.
सकाळी 8.00 - थोड्याच वेळात पार्थिव भाजप मुख्यालयात
अटल बिहारी वाजपेयी याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या 6, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी येत आहेत. थोड्याच वेळात वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना होणार आहे.
पद्मजा फेणाणींकडून आठवणींना उजाळा
गायिक पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींची कविता गाऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नवी दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या 9 आठवड्यांपासून ते रुग्णालयात होते.
गुरुवारी सायंकाळी त्याचं पार्थिव AIIMS हॉस्पिटलमधून 6, कृष्ण मेनन मार्ग या वाजपेयींच्या निवासस्थानी आणण्यात आलं. तेथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सोनिया गांधी आदींनी त्यांचं दर्शन घेतलं.
'राजकीय संवाद सुरूच राहावा' - फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणात राजकीय संवाद कधीच बंद होऊ नये, ही वाजपेयींची शिकवण महत्त्वाची वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)