सोशल - 'फाळणी झाली नसती तर आपण कायम दंगलींच्या छायेत असतो'

जवाहरलाल नेहरूंऐवजी मोहंमद अली जिन्ना पंतप्रधान झाले असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती, असं वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी मंगळवारी केलं. गोवा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात विद्यार्थांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

एका विद्यार्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना दलाई लामा म्हणाले की, "महात्मा गांधी मोहम्मद जिन्ना यांना पंतप्रधान करणार होते. पण नेहरूंना ते मान्य नव्हतं. ते आत्मकेंद्रित होते. नेहरूंनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी जिन्ना पंतप्रधान झाले असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती."

दलाई लामा यांच्या या वक्तव्याबाबत आम्ही वाचकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हा आहे काही प्रतिक्रियांचा संपादित आढावा.

"नेहरूंनी काही केलं असेल किंवा नसेल, पण जिन्ना यांना भारताचे पंतप्रधान होऊ दिलं नाही, हेच खूप मोठं काम आहे, यात काहीच शंकाच नाही," असं मत खालिद सय्यद यांनी व्यक्त केलं आहे.

तर मुकुल निकाळजे म्हणतात, "फाळणी झाली ते चांगलंच झालं. मतभेद दूर होऊ शकतात पण मनभेद नाही. जर फाळणी झाली नसती तर आपण सगळे कायम दंगलींच्या काळ्या छायेत राहिलो असतो."

"जे जिन्ना केवळ नेता बनून नेतृत्व निर्माण करण्यासाठी या देशाचे तुकडे पाडू शकतात ते जर पंतप्रधान झाले असते तर काय काय केलं असतं," असा प्रश्न अमरदीप दगडे यांनी विचारला आहे.

विजय कांबळे यांनी, "सरदार पटेल यांना पंतप्रधान व्हायचं होतं, पण नेहरूंनी हट्ट धरला," असं म्हटलं आहे.

सध्या राजकीय परिस्थितीत नेहरूंना दूषणं देण्यासाठी चक्क जिन्नांचेही समर्थन करणारे अंधभक्त ही तर वेगळीच शोकांतिका आहे, असं मत चेतन मोरे यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)