महाराष्ट्र बंद : मराठा आंदोलनाला पुणे आणि औरंगाबादमध्ये हिंसक वळण

मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे शहरांना या बंद मधून वगळण्यात आलं आहे. पण मुंबईत काही ठिकाणी बंदचा परिणाम दिसून येत आहे. इतर व्यवहार मात्र सुरळीत आहेत. पुणे आणि औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागले होतं.

रा. 9.00 - पुण्यात 40 कार्यकर्ते ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी 10 तासांपेक्षा जास्त काळ ठिय्या आंदोलन केलं. रात्री पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. लाठीचार्जही करण्यात आला. आतापर्यंत 40 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

आजच्या 'महाराष्ट्र बंद'मध्ये दिवसभरात काय काय घडलं? पाहा...

सायं. 5.00 - पुण्याला चांदणी चौकात लाठीचार्ज, रस्ता मोकळा केला

पुण्यात चांदणी चौक येथे झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या एका वाहनाचे नुकसान झालं. तेथे झालेल्या दगडफेकीत चार हवालदार जखमी झाले. दुपारी 3.30च्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूरही सोडण्यात आला. आता रस्ता मोकळा झाला आहे.

दु. 4.35 - नाशिक - द्वारका पॉइंटवर रास्ता रोको

नाशिकमध्ये युवकांचा जमाव अचानक हायवेवर आला. त्यांनी द्वारका पॉइंटवर रास्ता रोको केला आहे.

दु. 4.30 - औरंगाबाद - वाळूजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

औरंगाबादच्या वाळूजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसंच पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या भागात 2 पत्रकार जखमी झाले आहेत.

वाळूज MIDC मध्ये आज सकाळपासूनच कंपन्यांच्या कामगारांना रोखण्यात येत होतं. दुपारी 3.30-4च्या सुमारास बजाज नगर भागात संतप्त जमावानं दगडफेक केली. वाळूज परिसरात पोलिसांच्या वाहनांसह एक ट्रक आंदोलकांनी पेटवून देण्यात आल्याची माहिती स्थानिक पत्रकार R. K. भराड यांनी दिली.

त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांडाच्या फोडल्या. पोलीस आयुक्तांसह मोठा ताफा सध्या घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या ठिकाणी जलद कृती दल (QRT) दाखल झालं आहे.

स्थानिक पत्रकार श्यामसुंदर गायकवाड आणि सुदाम गायकवाड यांना संतप्त जमावाने मारहाण केल्याची घटना घडली.

श्यामसुंदर यांनी सांगितलं की, "वाळूजमध्ये आज काही कंपन्यांचं कामकाज सुरू होतं. या कंपन्या बंद करण्यासाठी आंदोलक तोडफोड करत असल्याचं कळताच आम्ही तिकडे गेलो. साजापूर फाटा भागामध्ये घटनेचं चित्रण करताना जमाव आमच्यावरच चालून आला. यामध्ये मला आणि सुदाम गायकवाड यांना मारहाण करण्यात आली."

मोरे चौकात संतप्त जमावाच्या दगडफेकीमुळे PSI प्रतीक चिलवंत हे जखमी झाले आहेत, असं भराड यांनी सांगितलं.

दु. 4.00 - कोल्हापूर दसरा चौकात सभा

कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावातून मराठा तरुण दसरा चौकात आले. या ठिकाणी गेल्या 17 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. सभेत बोलताना सकल मराठा समाजचे इंद्रजित सावंत म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू द्यायचं नाही. गेली 4 वर्षं आरक्षण देतो म्हणून दिलं नाही. सोशल मीडिया बंद करूनही मराठ्यांचं वादळ थांबणार नाही."

दु. 3.45 - सांगलीमध्ये कडकडीत बंद

सांगलीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सहकारी संस्था, कारखाने, शाळा ,कॉलेज, खाजगी संस्था बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातील एस टी सेवा बंद ठेवण्यात आली होती. सांगली स्टेशन चौकात ठिय्या आंदोलन करत आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या.

दु. 3.30 - मुंबईत संमिश्र प्रतिसाद

मुंबई आणि परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. आजच्या 'महाराष्ट्र बंद'चा मुंबई आणि राज्यावर काय परिणाम झाला, हे सांगत आहेत बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर.

दु. 2. 00 - पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी आरक्षणासाठी आंदोलकांचे ठिय्या आंदोलन. 200 ते 250 लोकांचा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत ठिय्या देऊन बसला आहे. कार्यालयाबाहेर सुमारे 2000 लोकांच्या जमावाची ठिय्या आंदोलन सुरू. लक्ष्मी रोडवर एका बसची तोडफोड.

दु. 1.21 - आंदोलकांच्या गाड्यांची तोडफोड

नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनाच्या स्टेजच्या मागील बाजूला लावलेल्या आंदोलकांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे.

दु. 1 - अमरावतीमध्ये रास्तारोको

अमरावतीमध्ये नांदगाव-पेठ जवळ मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.

दु. 12.52 - मुंबईत अनोखे आंदोलन

मुंबईच्या वांद्र्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांकडून तोंडाला आणि डोळ्यांना काळ्या पट्ट्या बांधून अनोख्या पध्दतीनं आंदोलन केलं जात आहे. मुंबईमध्ये मात्र सध्या व्यवहार सुरळीत आहेत.

दु. 12.46 - बुलढाण्यात चक्काजाम आंदोलन

बुलडाण्यात प्रमुख रस्त्यांवर टायर पेटवून शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

सकाळपासून जिल्ह्यातली बससेवा बंद आहे. जिल्ह्यातली शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दु. 12.31 - नाशिकमध्ये बंदचा परिणाम नाही

नाशिकमध्ये बंदचा फारसा परिणाम नाही. पण बस सेवा बंद आहे. बाजारपेठा अंशतः सुरू आहेत. तर शाळा महाविद्यालयांमध्ये कमी उपस्थिती दिसून येत आहे.

दु. 12.27 - मुंबईत ठिय्या आंदोलन

मुंबईतील वांद्र्यामध्ये असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

दुपारी 12.10 - केडगावमध्ये टायर जाळले

अहमदनगरच्या केडगावमध्ये आंदोलकांनी टायर जाळून रास्तारोको केला.

सकाळी 11.30 - औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त बंद

औरंगाबादमध्ये बंदचा परिणाम दिसून येत आहे. शहरातली इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसंच शहरातल्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळी 11.17 - पुण्यात ठिय्या आंदोलन

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, खेड, शिरुर, दौंड, जुन्नर, मावळ, आणि भोर तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

सकाळी 11.05 - कोल्हापुरात इंटरनेट बंद

कोल्हापुरात मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दसरा चौकात गावागावातून आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोक येत आहेत. तसंच कर्नाटकातून येणारी वाहतूक बंद आहे. सांगली आणि परिसरात सुद्धा बंदचा परिणाम दिसून येत आहे.

सकाळी 11.02 - पंढपूरमध्ये इंटरनेट बंद

सोलापूर शहरात बंदचा परिणाम फारसा दिसून येत नाही. पण जिल्ह्यातील करमाळा, बार्शी आणि पंढरपूर हे तालुके बंद आहेत. या ठिकाणी इंटनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बससेवा देखील बंद करण्यात आली आहे.

सकाळी 10.55 - वाशिममध्ये एसटी सेवा बंद

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

सकाळी 10.46 - लातूरमध्ये बंदला प्रतिसाद

लातूर शहर आणि जिल्ह्यात सर्व शाळाआणि महाविद्यालयं बंद आहेत. एसटी आणि बस सेवा पूर्णपणे बंद आहे. ठिकठिकाणी पोलिसाचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सकाळी 10.31 - अकोल्यात रास्तारोको

अकोल्यात अखिल भारतीय छावा संघटनेनं अकोला मूर्तिजापूर मार्ग रोखून धरला आहे. तर अकोल्यातल्या सांगळूद रस्त्यावर टायर जाळून रस्तारोको सुरू आहे.

सकाळी 10.20 - अमरावतीमध्ये शाळांना सुट्टी

अमरावतीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत असल्याचं पत्रक जारी केलं आहे.

अमरावती शहरासह जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. शांततेने बंद पाळावा असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे.

सकाळी 10.12 - रत्नागिरीत व्यापाऱ्यांचा बंदला विरोध

रत्नागिरी शहरात मात्र बंदचा परिणाम फारसा दिसून येत नाही. व्यापारी संघटनेनं बंदला विरोध केला आहे. पण शहरातली एस. टी. आणि बससेवा मात्र बंद आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला आहे.

सकाळी 10.08 - नागपूरमध्ये टायर जाळले

नागपूरच्या अशोक चौकात टायर जाळण्याची घटना घडली आहे. बीबीसीसाठी काम करणाऱ्या सुरभी शिरपूरकर यांनी ही दृश्य आमच्यापर्यंत पाठवली आहेत.

सकाळी 10 - मुंबईतील दादर परिसरात बंद

मुंबईच्या दादर परिसरातली दुकानं व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्याचं दिसून येत आहे. बीबीसी मराठीच्या शरद बढे यांनी ही दृष्य शूट केली आहेत.

सकाळी 9 - कोल्हापुरात कडकडीत बंद

कोल्हापूर शहरात बंदचा परिणाम दिसून येत आहे. सर्वं दुकानं आणि बाजारपेठा बंद आहेत. एसटी सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून महाराष्ट्रात याआधी 58 मोर्चे काढण्यात आले. दोन वर्षांपूर्वी 2016मध्ये 9 ऑगस्टला औरंगाबाद येथून मराठा क्रांती मोर्चाची सुरूवात झाली होती.

राज्य सरकारनं अद्यापही आरक्षण न दिल्यानं मराठा समाजातर्फे आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयकांची एक बैठक बुधवारी औरंगाबादेत झाली. त्यात शांततापूर्ण वातावरणात बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई, ठाणे वगळता बंद पुकारण्यात आला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनांनी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तणावात्मक परिस्थितीमुळे नवी मुंबईमध्ये बंद पाळायचा किंवा नाही याचा निर्णय घेतला जाईल.

औरंगाबादेतील राज्य बैठकीत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरांना महाराष्ट्र बंद मधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिवहन महामंडळानं 17 हजार एसटी बस रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे, औरंगाबादसह, बीड, नांदेड जालनासह अनेक शहरांमध्ये आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही जिल्हा प्रशासनांनी महाराष्ट्र बंद आंदोलनाची परिस्थिती पाहता शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंदीचे आदेशही प्रशासनातर्फे काढण्यात आले आहेत.

महाराष्ट्र बंददरम्यान एसटी बस, वैद्यकीय सुविधा, अ‍ॅम्बुलन्स, शाळेची बस, अशा अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येणार नाहीत. रस्ता अडवू नये तसेच जाळपोळ करू नये असे आवाहनही राज्य समन्वयकांतर्फे औरंगाबादच्या बैठकीत करण्यात आले.

महाराष्ट्र बंद नंतर...

आजच्या महाराष्ट्र बंद नंतर 10 ऑगस्टला साखळी उपोषणाला सुरूवात केली जाईल. 15 ऑगस्टला आत्मक्लेश म्हणून चुलबंद आंदोलन केलं जाईल. समाजातील तरुणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 10 ते 12 संवाद यात्रा काढण्यात येतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)