मुंबईत माहूलला BPCLच्या प्लांटमध्ये स्फोट; 2 गंभीर जखमी

मुंबईत चेंबूरजवळच्या माहूल येथील BPCLच्या (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड) रिफायनरीमध्ये स्फोट झाला आहे. स्फोटामुळे आग लागली असून, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात 2 जण जखमी झाले आहेत.

अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्लांटमधील हायड्रोक्रॅकर टँकमध्ये स्फोट होऊन आग लागल्याचं मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितलं.

अग्निशमन विभागाला दुपारी 2.55 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती BPCLचे जनसंपर्क अधिकारी सुंदरराजन यांनी दिली आहे.

स्फोट झाल्यानंतर धक्के जाणवल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं. आगीचे लोळ परिसरात दिसू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

आगीने निर्माण झालेला धूर आणि आगीचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर स्थानिकांनी अपलोड केले आहेत.

बीपीसीएलचा हा प्लांट भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर आहे.

''या स्फोटात 43 जण जखमी झाले. कंपनीतील आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार झाले. 22 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाकी लोकांना सुश्रुत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. स्फोटाचं नेमकं कारण तांत्रिक आहे. कंपनीच्या अंतर्गत चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल'', असं पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितलं.

(बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांनी दिलेल्या माहितीसह)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)