जळगाव, सांगली महापालिकेत भाजप स्वबळावर, निकालाचा अर्थ काय?

प्रस्थापित बालेकिल्ल्यांना तडा देत जळगाव आणि सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

जळगाव महानगरपालिकेवर अनेक वर्षं शिवसेनेचे सुरेश जैन यांची एकहाती सत्ता होती. तिथे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपची निर्विवाद सत्ता आणण्यात यश मिळवलं आहे.

अनेक वर्षांपासून सांगली महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. यावेळेस राष्ट्रावादी सोबत आघाडी करत काँग्रेसने निवडणूक लढवली. शिवसेना आणि भाजप मात्र स्वतंत्र्यरीत्या निवडणुकीत उतरले होते. इथे भाजपने मुसंडी मारत एकहाती सत्ता काबीज केली आहे.

जळगाव आणि सांगली महानगरपालिकेतील भाजपच्या विजयाबद्दल 'काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले तरी भाजप वरचढ ठरतंय का?' असा प्रश्न बीबीसी मराठीच्या वाचकांना 'होऊ द्या चर्चा'मध्ये विचारला होता. त्यावर वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया इथं दिल्या आहेत.

राजेंद्र साळुंके म्हणतात, "विरोधी पक्षांतील आयात उमेदवारांमुळे भाजप वरचढ ठरते आहे, पण हा फुगा लवकरच फुटणार आहे."

श्रीराम अजब म्हणतात, "यात दोन्ही बाबी आहेत. जे आजपर्यंत सत्तेत होते त्यानी केलेले समाजाकडे दुर्लक्ष त्यांना भोवले आहे आणि बाकी भाजपकडे EVM जिंदाबाद."

राजेंद्र उतेकर म्हणतात, 'भाजपाकडे स्वतःचे उमेदवार उभे करून निवडून आणण्याची ताकद नाही. दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आयात करून निवडणूक जिंकायची.'

सानद पवार म्हणतात, "सांगलीबद्दल बोलायचं झालं तर, खोबरं तिकडं चांगभलं या न्यायानं काँग्रेस राष्ट्रवादीचे कित्येक उमेदवार भाजपकडून उभे राहिले आणि जिंकले. मदन पाटील, पतंगरावांच्या मृत्यबूने सांगलीतील काँग्रेस नेतृत्वहीन आणि गटातटात विभागली होती.

जयंत पाटलांनी पाडापाडीचं राजकारण करता करता स्वत:ची अवस्था कमकुवत करून घेतली. याच्या उलट स्थिती भाजपची होती. परंतु हा स्थानिक निकाल आहे. यावरून सबंध महाराष्ट्रासाठी सरसकटपणे भाजप हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीपेक्षा वरचढ ठरत आहे असे म्हणता येत नाही."

"भाजपमध्ये संघठन कौशल्य इतर पक्षांपेक्षा खूप मजबूत आहे", असं शाहू जवंजाळ यांना वाटतं. "EVM घालवा मग समजेल", असं तुषार व्हनकाटे म्हणतात.

निकालाची वैशिष्ट्य

जळगाव महापालिकेत सुरेश जैन यांचा सर्वांत मोठा आणि दारुण पराभव झाला आहे. गेल्या ३५ वर्षापासून सुरेश जैन यांनी कधी शिवसेना तर कधी खानदेश विकास आघाडी मार्फत जळगाव महानगरपालिकेवर आपली सत्ता राखली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विकासाचा मुद्दा पुढे करत अनेक पक्षातील उमेदवार भाजपमध्ये आणले.

मागील निवडणुकीत मोठा प्रभाव असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह सर्व उमेदवार भाजपमध्ये आणत महाजनांनी मनसेला निवडणुकीआधीच गारद केलं. राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांचा प्रभावही जाणवला नाही.

अंतिम आकडेवारी अशी -

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना दणका देत सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेवरही भाजपने 78 पैकी 41 जागा जिंकल्या. या महापालिका क्षेत्रात अनेक काळ राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं.

एकेकाळी मंत्र्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील महापालिका निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी होती. एकूण 78 जागासाठी ही निवडणूक पार पडली यात भाजपला 41 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 35 जागा मिळाल्या.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांची तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.

सेना, MIMनं खातही नाही उघडलं

या निवडणुकीत भाजपने सर्व 78 जागा स्वबळावर लढवल्या. शिवसेना आणि एमआयएम या पक्षांना खातंही उघडता आलं नाही. तर दूध दरवाढ आंदोलन करणाऱ्या खासदार शेट्टी यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागलेराज्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनामुळे सांगली दौरा रद्द करण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर ओढवली होती. तीच कसर भरून काढण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख यांनी प्रयत्न केले ज्याला यश आलेलं दिसतंय.

सांगलीचे दिवंगत नेते पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या निधनानंतर सांगलीत काँग्रेसची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे तर शहरातल्या नागरी समस्या सोडवण्यात अपयश आल्याने नागरिकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मतपेटीतून नाराजी व्यक्त केल्याचं बोलले जातंय.

एकूणच राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीत भाजपचा विजय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी नामुष्की ओढवणारा ठरलाय.

या दोन्ही महापालिकांच्या निकालामुळे आता काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आले तरी भाजप वरचढ ठरणार का याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

(सांगलीहून स्वाती पाटील राजगोळकर आणि जळगावहून प्रवीण ठाकरे यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)