राष्ट्रपतींना जगन्नाथ मंदिरात चुकीची वागणूक; नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, SARAT MAMA/BBC
- Author, संदीप साहू
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भुवनेश्वर
पुरीच्या जगन्नाथ मंदिरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वागणुकीला 3 महिने उटल्यानंतरही कोणावरही कारवाई झालेली नाही. या प्रकरणात सरकार सेवेकऱ्यांना पाठिशी तरी घालत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रपती भवनानं पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीला देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ही घटना 18 मार्चला घडली. राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नी जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी ही घटना घडली.
पण हा प्रकार 20 मार्चला झालेल्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांच्या पुढे आला.
बैठकीच्या इतिवृत्तात म्हटलं आहे की, "भारताचे राष्ट्रपती जेव्हा रत्न सिंहासनावर (प्रभू जगन्नाथांच सिंहासन) डोकं ठेवण्यासाठी जात होते त्यावेळी तिथं उपस्थित सेवेकऱ्यांनी त्यांचा मार्ग अडवला. काही सेवेकरी राष्ट्रपतींना खेटून उभे होते. इतकंच नाही तर काही सेवेकरी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता यांच्याही समोर उभे राहिले होते. या बद्दल राष्ट्रपती भवनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे."
दक्षिणेवरून तक्रार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींनी पुरी सोडण्यापूर्वीच जिल्हाधिकारी अरविंद अग्रवाल यांच्याकडे या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपती तेथून गेल्यानंतर सेवेकरी दामोदर महासुआर यांनी माध्यमांकडे तक्रार केली की राष्ट्रपतींनी त्यांना 1 रुपयाचीही दक्षिणा दिली नाही.
या बद्दल या बैठकीच्या इतिवृत्तात म्हटलं आहे की, "राष्ट्रपती परत गेल्यानंतर सेवेकऱ्यानं माध्यमांत जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल राष्ट्रपती भवनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कौलिक पांडा या सेवेकऱ्याच्या रजिस्टरमध्ये राष्ट्रपती सही करणार नाहीत, हे सांगितलं होतं."

फोटो स्रोत, SARAT MAMA/BBC
राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीला मंदिरात मिळालेली वाईट वागणूक आश्चर्यकारक आहेत. पण यापेक्षाही चकित करणारी बाब म्हणजे राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त करूनही आणि मंदिराच्या व्यवस्थापन समितीमध्ये चर्चा होऊन 3 महिने झाल्यानंतरही या संदर्भात प्रशासनानं या संवेदनशील प्रकरणात कोणावरही कारवाई केलेली नाही.
3 महिन्यात मंदिर प्रशासनानं जर काही केल असेल तर ते म्हणजे फक्त हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांच्याशी संपर्क साधला असता यावर कोणत्याही अधिकाऱ्यानं बोलण्याची तयारी दाखवली नाही.
प्रकरण पुढे आल्यानंतर जिल्हा आणि मंदिर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.
सेवेकऱ्यांना दुखवायचं नाही?
14 जुलैला होणारी रथयात्रा लक्षात घेता मंदिर प्रशासन आणि राज्य सरकार सेवेकऱ्यांना दुखवू इच्छित नाही. कारण जर त्यांना नाराज केलं तर रथयात्रेतली प्रथा परंपरांमध्ये अडचणी येतील.

फोटो स्रोत, Getty Images
मंदिरातील दैतापती नियोगाचे सचिव विनायक दासमहापात्र यांनी या घटनेला जिल्हा आणि मंदिर प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.
ते म्हणतात, "जर एखाद्या सेवेकऱ्यानं राष्ट्रपतींशी गैरवर्तणूक केली असेल तर त्याला ताबडतोब तिथंच निलंबित करायला हवं होतं. पण तसं का झालं नाही?"
जगन्नाथ मंदिराच्या संस्कृतीची महिती असणारे प्रफुल्ल रथ म्हणाले, "या घटनांना सेवेकऱ्यांना दक्षिणा देण्याची पद्धत जबाबदार आहे."
ते म्हणाले, "जोपर्यंत मंदिरात दान आणि दक्षिणा गुप्तपणे देण्याची व्यवस्था सुरू राहणार तोवर अशा घटना होतच राहतील. सेवेकऱ्यांना त्यांची कायदेशीर दक्षिणा मिळालया हवी पण जी दक्षिणा प्रभू जगन्नाथांना दान म्हणून येते ती जग्गनाथांच्या खजिन्यात गेली पाहिजे."
रत्नभंडारची किल्ली गायब झाल्यानं मंदिर प्रशासन आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची डोकेदुखी वाढलेली आहेच. यामध्ये आता राष्ट्रपतींना दिलेल्या वागणुकीची भर पडली आहे.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)








