भर मुंबईत बिघाड झालेल्या विमानाची का घेण्यात आली चाचणी?

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जण मृत्युमुखी पडले. या अपघातानंतर अनेक प्रश्न अनुत्तरित आहे.

  • पायलट मारिय झुबेरी यांचे पती पी. कुठारिया यांनी आरोप केला आहे खराब हवामानामुळे विमान उडवणं कठीण होतं. तरीही कंपनीने हे विमान उडवायला लावलं. हे खरं आहे का?
  • UY एव्हिएशन या कंपनीचे मॅनेजर अनिल चौहान यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कबूल केलं आहे की या विमानाकडे उडण्यासाठी आवश्यक असलेलं 'सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस' नव्हतं. मग या विमानाला का उडवण्यात आलं?
  • हे विमान 26 वर्षं जुनं होतं आणि गेली 6 वर्षं पडून होतं. त्याची दुरुस्ती अनेक महिन्यांपासून सुरू होती. एवढ्या जुन्या आणि अनेक भाग बदललेल्या विमानाची चाचणी करण्यासाठी हे हवामान योग्य होतं का, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.
  • बिघाड झालेल्या विमानाची चाचणी करण्यासाठी मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराची निवड का करण्यात आली?
  • 2008 साली या विमानाचा अपघात झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने हे विमान विकायचं ठरवलं. जेव्हा या विमानाचा लिलाव केला, तेव्हा ते उडण्याच्या स्थितीत नव्हतं, असं NDTVने कागदपत्रांच्या आधाराने म्हटलं आहे. त्यावेळी विमानाची नेमकी स्थिती काय होती?

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

UY एव्हिएशन या कंपनीचं हे चार्टर्ड फ्लाईट होतं. या कंपनीचे हेड ऑफ ऑपरेशन्स अनिल चौहान म्हणाले, "पायलट आणि कोपायलट आमच्या कंपनीचे कर्मचारी होते. वैमानिकाचा 5000 तासांपेक्षा जास्त त्यांनी फ्लाइंगचा अनुभव होता. आम्ही आमची टीम घटनास्थळावर पाठवली आहे. डीजसीए आणि पोलिसांना आम्ही सहकार्य करत आहोत."

"अपघातग्रस्त विमान आम्ही नुकतंच खरेदी केलं होतं. ते 22 वर्षं सेवेत होतं. Indamer या कंपनीकडे या विमानाच्या मेंटेनन्सचं काम होतं आणि आम्ही आज ते टेस्ट फ्लाईटसाठी उडवत होतो. फ्लाईट जवळपास तासभर हवेत होतं आणि जुहूच्या विमानतळावर उतरवण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात झाला."

या अपघाताच्या वृत्तात काल काय घडलं त्याचे अपडेट्स -

संध्याकाळी 5.30 - चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली. अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, "भर वस्तीत विमान पडल्यानं ही धक्कादायक घटना आहे. कन्स्ट्रक्शन साइटवर पडल्याने जास्त जीविहानी झाली नाही. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल."

संध्याकाळी 4.40 - नेमकं काय घडलं? घटनास्थळावरून LIVE

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी घटनास्थळावरून घेतलेला परिस्थितीचा आढावा.

दुपारी 4.15 - लेडी पायलटची होती टेस्ट ड्राईव्ह?

घटनास्थळावर असणाऱ्या मुक्त पत्रकार अमित शाह यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, महिला वैमानिक टेस्ट ड्राईवह करत होती. विमानाची चाचणी सुरू होती. उड्डाणापूर्वी वैमानिक पूजा करतानाचा हा एक फोटो शाह यांनी बीबीसीला शेअर केला आहे.

दुपारी 4.00 - अपघाताच्या चौकशीचे आदेश - सुरेश प्रभू

नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या घटनेबद्दल ट्वीट करताना याविषयी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताची चौकशी करायचे आदेश DGCA ला दिल्याचं त्यांनी म्हटलंय.

दुपारी 15.40 'मी माणूस जळताना पाहिलं'

अचानक स्फोटासारखा आवाज आला. जवळ जायची भीती वाटत होती. आरडा ओरडा ऐकला. एक माणूस जळत असताना पाहिलं आणि कळलं की प्लेन क्रॅश झालंय, असं या घटनेचे प्रत्यक्षदर्शी प्रदीप चारण यांनी बीबीसीला सांगितलं.

दोन मिनिटांच्या अंतरावर असताना मी आवाज ऐकला. लगेच जवळपासचे 100- 150 लोक जमले. 10- 15 मिनिटात पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान दाखल झाले, अशी माहिती आणखी एक प्रत्यक्षदर्शी जयंतीलाल सोळंकी यांनी बीबीसीला दिली.

दुपारी 15.35 - नागरिकांचा मदतीसाठी पुढाकार

विमान अपघात झाल्या त्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी भर पावसातही बचाव पथकातील पोलिसांना आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना मदतीची तयारी दाखवली. अपघात झाला त्याच्या समोरच्या इमारतीत राहणाऱ्या ज्योती, कुसूम, तरुणा आणि विनिता पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आवाज ऐकून त्या घाबरल्या आणि बाहेर आल्या. "हा भाग खूप गजबजलेला आहे. इथे मोठ्या जीवितहानीची शक्यता होती. आमची इमारत फक्त 20 फुटांवर आहे. नशिबानं या अपघातातून बचावलो."

अपघातस्थळी बचावकार्य करणाऱ्या पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना या चौघीजणी पाणी देत आहेत.

दुपारी 3.10 - पावसामुळे मदत कार्यात अडथळा

मुंबईच्या घाटकोपर भागात मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे विमान अपघाताच्या ठिकाणी मदत कार्यात अडथळा येत आहे. सुरुवातीला मोठा आवाज आला तो कसला ते कळत नव्हतं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी जान्हवी मुळे आणि राहुल रणसुभे यांनी घटनास्थळाजवळ प्रथमेश लोखंडे या तरुणाशी बोलून घेतलेला आढावा.

2. 45 - नागरिकांची उस्फूर्त मदत

प्रथमेश लोखंडे हे अपघाताच्या वेळी जवळच्या रस्त्यावरून जात होते. मोटारसायकलवरून जाताना त्यांनी मोठा आवाज ऐकला. तो आवाज प्लेन क्रॅशचा आहे हे लक्षात येताच ते मदतीला धावले. "फायर ब्रिगेडच्या मदतीने आम्ही पाच जणांना उचलून जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं", अशी माहिती त्यांनी दिली.

दुपारी 2.30 - 5 जणांचा मृत्यू

पाच जणांचा मृत्यू झाल्याचं अग्निशामन विभागानं स्पष्ट केलं आहे. मृतांमध्ये 1 पायलट, 2 पुरुष, 1 महिला आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे.

अग्निशामन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. या विमानातून 4 जण प्रवास करत होते त्यात एका पायलटचाही समावेश आहे. आग विझवणारे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ हे विमान पडलं आहे.

विमान यूपी सरकारचे नाही

अपघात झालेलं हे विमान आधी उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचं होतं. पण त्यांनी ते मुंबईतल्या UY एव्हिएशनला विकलं होतं. या विमानाला या आधी अलाहाबादमध्ये अपघात झाला होता, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी त्यातून त्यावेळी प्रवास करत होते. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)