मुलाने लिपस्टिक लावली तर काय बिघडतं?

फोटो स्रोत, Diksha Bijalani/Twitter
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
सोशल मीडियावर हा फोटो दीक्षा यांनी टाकला आणि चर्चेला उधाण आलं. तिची ट्विटरवरची पोस्ट व्हायरल झाली. त्याला कारण ठरला तिचा नऊ वर्षांचा चुलतभाऊ. 'लिटिल कझ'ला गुलाबी रंग आवडतो, स्वयंपाक घरात लुडबूड करायला आवडते आणि आईची लिपस्टिक घेऊन ट्राय करायलाही आवडते.
सगळीच लहान मुलं अशी असतात. त्यांना नवनवीन गोष्टी ट्राय करायच्या असतात, आणि 'पिंटू-चिंकी कित्ती हुशार' म्हणून त्यांचं कौतुकही होतं. पण म्हणून आपण लहान मुलांना सगळ्याच गोष्टी करू देतो का?
मुलांनी काय करायचं आणि मुलींनी काय करायचं याचे आडाखे पक्के असतात समाजाचे आणि त्याबाहेर जाऊन कोणी काही नवीन ट्राय करायचं म्हटलं तर ते कोणालाच मान्य होत नाही.
म्हणूनच एखादा लहान मुलगा रडायला जरी लागला तरी 'काय रडतोस मुळूमुळू मुलींसारखा' असं म्हणून त्याला हिणवलं जातं. एखादा नाजूक असला, किंवा शांत असला तर बायल्या या शब्दाचा अर्थही कळायच्या आत त्याला ते लेबल चिकटवलं जातं.
अलाहबादच्या 'लिटिल कझ'च्या बाबतीत काही वेगळं घडलं नाही. तो नेहमीच्या उत्सुकतेने नवीन गोष्टी ट्राय करत असताना कोणीतरी त्याच्यावर डाफरलं, 'छक्का आहेस का तू'?
त्यानंतर जे घडलं ते सहसा भारतीय घरांमध्ये घडत नाही. दीक्षा बिजलानी या त्याच्या चुलत बहिणीने सगळा किस्सा ट्विटरवर शेअर केला आहे.
"लिटिल कझबरोबर तेच होतं जे आपल्या कोणाच्याही घरात होईल. त्याला चिडवताच, रागवतात, त्याच्यावर सगळे हसतात, कोणी त्याला समजून घेत नाही. तेच ते नेहमीचं जे सगळ्या पुरुषसत्ताक घरांमध्ये घडतं. आपले पुरुष तरी या पितृसत्ताक दमनातून कुठे सुटलेत?" दीक्षा बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
"त्या दिवशीही तेच झालं. माझ्या छोट्या चुलतभावाची आई कुठेतरी बाहेर जात होती. आवरुन झाल्यावर तिने छानशी लिपस्टिक लावली. तिच्याकडची एक मिनी लिपस्टिक संपत आली होती. माझी काकू ती फेकणार तेवढ्यात लिटिल कझने ती मागितली. काकूने फारसा काही विचार न करता त्याला दिली", दीक्षा सांगत होत्या.

फोटो स्रोत, Diksha Bijalani/Twitter
"त्याने ती घेतली आणि आईसारखीच आरशासमोर उभं राहून लावली. ते पाहिल्यावर घरातून कोणीतरी जोरात ओरडलं, 'काय छक्का आहेस का असले धंदे करायला?' त्याला बिचाऱ्याला या शब्दाचा अर्थही माहीत नसेल."
"पण आपल्याला कोणीतरी खूप वाईट म्हणतं आहे एवढं त्याला कळलं. तो पलंगाखाली जाऊन लपला. आम्ही भावंड त्याची समजूत काढायला गेलो तर तो पडद्यामागे जाऊन लपला. जणू काही आपला लिपस्टिक लावलेला चेहरा सगळयांपासून लपवत होता."
मानसशास्त्राची विद्यार्थिनी असणाऱ्या दीक्षाला या सगळ्या वागण्याचा फार राग आला. पण घरातल्या मोठ्यांशी वाद घालून या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही हेही त्यांना माहीत होतं. त्यांनी एक अभिनव शक्कल लढवली.
"मी ठरवलं की आपण स्वतः लिपस्टिक लावायची आणि मुख्य म्हणजे माझ्या 21 वर्षांच्या भावालाही लावायला सांगायची. फक्त मी लावली असती तर काही फरक पडला नसता. कारण मुली तर लिपस्टिक लावतातच. पण मुलांनी लिपस्टिक लावली तरी काही बिघडत नाही हे मला लिटिल कझला दाखवून द्यायचं होतं."

फोटो स्रोत, Diksha Bijlani/Twitter
अर्थात दीक्षाच्या तरुण भावाला लिपस्टिक लावण्यासाठी पटवणं फार कठीण होतं. त्याला या प्रकारची सवय नव्हती. पण तोही प्लॅनमध्ये सामील झाला.
"आम्ही तिघं तीच लिपस्टिक लावून लिटिल कझ समोर गेलो तेव्हा त्याला आधी धक्का बसला. का, तर त्याच्या मोठ्या भावानेही लिपस्टिक लावली होती आणि आता तो एकटा नव्हता."
"आम्ही हौसेने फोटो काढत होतो ते पाहून त्याचाही मूड चांगला झाला आणि त्याने स्वतःहून सांगितलं की, आता मी पण परत लिपस्टिक लावतो, माझे पण फोटो काढा."
हा सगळा किस्सा दीक्षाने तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. आणि आपले फोटोही टाकले आहेत. बघता बघता तिची पोस्ट व्हायरल झाली आहे.
"खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट आल्या. सगळेच काही आम्हाला सपोर्ट करत नव्हते. कोणी कोणी तर हेही म्हणालं की, तुम्हाला वेड लागलं आहे. तुमच्या धाकट्या भावाला मनोविकार तज्ज्ञाकडून तपासून घ्या."
"पण माझा उद्देश ही पोस्ट व्हायरल व्हावी किंवा लोकांना आवडावी असा नव्हताच. हेतू हा होता की जेंडर स्टीरिओटाईपवर चर्चा व्हावी. आमचं पाहून निदान दोघांना जरी वाटलं तरी की मुलांनी हे करावं किंवा मुलींनी तसं वागावं अशा बंधनांमध्ये आपल्या मुलांना अडकवू नये तरी मला खूप आहे."

फोटो स्रोत, Getty Images
इंटरनेटवरच कशाला, दीक्षाच्या घरातही या पोस्टनंतर बदल घडून आला. लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि मीडियामध्ये आलेल्या बातम्या पाहून तिच्या घरच्यांनाही वाटलं की पोरांना अगदीच काही वेड लागलेलं नाही.
"माझी आई आणि आजी पहिल्यांदा या विषयावर बोलल्या. त्यांनाही स्वप्नात कधी वाटलं नसेल की अशा विषयावर त्या कधी बोलतील."
"लिटिल कझचा आत्मविश्वास तर इतका वाढला आहे की त्याला आता कोणी चिडवलं तरी सरळ सांगत. हे मुलगा-मुलगी सगळं मनात असतं. आपण कोण आणि आपल्याला काय करायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे."
"नुकताच त्याने मला व्हीडिओ कॉल करून सांगितलं की त्याच्या आईच्या सगळ्या लिपस्टिक त्याने ट्राय करून पाहिल्या आहेत. मरून लिपस्टिक आणि निळं नेलपेंट त्याला फार आवडतं. आणि आता सध्यातरी त्याला कोणी चिडवत नाहीये."
मेक-अप करणारी मुलं
हौसेने स्वयंपाक करणाऱ्या मुलांनाही 'बायकी कामांमध्ये रस घेतो' असं म्हटलं जातं. मग मेक-अप करणाऱ्या मुलांची काय अवस्था असेल?
"अरे तो बघ, कसा लाल लिपस्टिक लावून फिरतोय. हा नक्कीच पुरुष नसणार. अशा कमेंटस मी इतक्या वेळा ऐकल्या आहेत की त्याची गणनाच नाही," भरतनाट्यम नर्तक असणारे उन्नत रतनराजू सांगतात.
"अगदी शाळेत असल्यापासून मी नृत्य करतो आहे. आणि जेव्हा जेव्हा शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमात मी नृत्य सादर करायचो तेव्हा मला माझे शाळासोबती खूप चिडवायचे. काहीही बोलायचे.
गंमत बघा, एवढ्या लहान वयातही पुरुषत्वाची संकल्पना त्यांच्या मनात ठाम रुजली होती."
आपल्या मेक-अप करण्यावरून उन्नत यांनी आजवर नाही नाही ते ऐकलं आहे. कर्नाटकमधल्या हसनमध्ये मोठ्या झालेल्या उन्नत छोट्या शहरात असणाऱ्या संकुचित मनोवृत्तीचाही खूप त्रास झाला.

फोटो स्रोत, Unnath RajatRaju/Facebook
"ते सगळंच खूप डिप्रेसिंग होतं. मला लोक वाट्टेल ते बोलायचे. हिजडा म्हणायचे. मला नॉर्मल आयुष्य असू शकत हे त्यांना मान्यच नव्हत."
"मला कोणी मित्र नव्हते, कोणी त्यांच्यात बोलवायचे नाहीत. आणि हे सगळं का, तर माझ्या कामाचा भाग म्हणून मला माझ्या परफॉर्मन्सच्या वेळेस दोन-तीन तास मेक-अप करावा लागायचा."
मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय?
"सगळ्यांत अवघड पण सगळ्यात परिणामकारक रस्ता म्हणजे सरळ दुर्लक्ष करणे. लोक तुम्हाला हसतील, तुमच्यावर संशय घेतील, तुम्हाला कमी लेखतील पण तुम्ही विचलित व्हायचं नाही," उन्नत हसत सांगतात.
"माझ्या आईने एक गोष्ट शिकवली होती की, तुला जे आवडतं ते मनापासून कर. ही गोष्ट सगळ्यांना लागू होते, मुलींना आणि मुलांनाही. तुम्हाला जे मनापासून करावसं वाटतं ते जरूर करा. अगदी लिपस्टिक लावावीशी वाटली तरी."
पुरुषांच्या मेक-अपचं वाढतं फॅड
भारतात मेक-अप करणाऱ्या, अगदी गंमत म्हणून एखादं ब्युटी प्रोडक्ट वापरणाऱ्या पुरुषांकडे कुत्सित नजरेने पाहात असले तरी साऊथ कोरियामधल्या काही तरुण पुरुषांनी तर महिलांच्या बरोबरीने मेक-अप करण्याची सवय लावून घेतली आहे.
त्यातल्या काहींनी तर पुरुषांना मेक-अप कसा करायचा याचे धडे देणारे ट्युटोरिअल्सच यू-ट्युबवर सूरु केले आहेत.

"मेक-अप केल्यावर मी अधिक आत्मविश्वासाने वावरू शकतो. लोक शपथेवर सांगतात की मी गे आहे. पण तसं काही नाहीये. त्यांचं हेच मत मला माझ्या व्हीडिओजमधून बदलायचं आहे," 16 वर्षांचा मेक-अप व्हीडिओ ब्लॉगर किम सेयुंग हॉनने बीबीसीला सांगितलं.
इथले कोरिअन पॉप स्टार्स मेक-अप करतात त्यामुळे इथल्या तरुणांमध्ये मेक-अप करण्याची क्रेझ वाढली आहे.
भारतात असं काही नसलं तरी निदान जे पुरुष मेक-अप करतात, कधी परफॉर्मन्ससाठी, कधी हौस म्हणून तर कधी नुसतीच गंमत म्हणून त्यांना कमी लेखलं जाणार नाही अशी अपेक्षा तर आपण नक्कीच करू शकतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








