'हिजडा, छक्का म्हणणारे आज सरपंच माऊली म्हणून हाक मारतात'

ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कांबळे

फोटो स्रोत, Mauli Kamble

फोटो कॅप्शन, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कांबळे
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कांबळे हे राज्यातील पहिले तृतीयपंथीय सरपंच आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या तरंगफळ गावचे ते सरपंच आहेत.

2018मध्ये सरपंचपदी निवड झाल्यानंतर बीबीसी मराठीनं त्यांच्या प्रवासावर बातमी केली होती. ती पुन्हा शेयर करत आहोत.

2018चा ऑक्टोबर महिना. राज्यात सगळीकडे ग्रामपंचायत निकालांचं वारं वाहू लागलं होतं. त्यातही लक्ष होतं ते सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या तरंगफळ ग्रामपंचायतीच्या निकालावर.

दुपारी निकाल आला आणि विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. ज्ञानेश्वर कांबळे या उमेदवारानं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना 167 मतांनी पराभूत केलं होतं.

"माउली तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है"च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

विजयी तर ज्ञानेश्वर झाले होते, पण लोक माऊलींच्या नावानं का घोषणा देत होते? लोकांचं काही चुकत होतं का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वर यांच्या आयुष्यात डोकवावं लागेल.

ज्ञानेश्वरपासून माऊलीपर्यंत

शंकर मुकुंदा कांबळे हे तरंगफळचे रहिवासी. पत्नी, 5 मुलं आणि 1 मुलगी असं त्यांचं शेतकरी कुटुंब. घरी 10 एकर शेती पण तीही कोरडवाहू. मुलांनी शिकून मोठं व्हावं असं शंकर यांचं स्वप्न. त्यामुळे मग त्यांनी थोरला मुलगा ज्ञानेश्वरला गावातल्या शाळेत टाकलं.

पण ज्ञानेश्वर यांचं शाळेत लक्ष लागत नव्हतं. त्यांचं संपूर्ण लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या आत्यानं. पारूबाई कांबळे यांनी.

माउली कांबळे या 167 मतांनी विजयी झाल्या.

फोटो स्रोत, Mauli Kamble/Facebook

फोटो कॅप्शन, माउली कांबळे या 167 मतांनी विजयी झाल्या होत्या.

"आमच्या घरात रेणुकामातेच्या भक्तीचं वातावरण पहिल्यापासून होतं. त्यामुळे मला देवाच्या भक्तीची आवड लागली. आमची आत्या पारूबाई हिनं रेणुकामातेशी लग्न केलं होतं. ती देवदासी झाली होती. त्यामुळे मग मलाही आत्याप्रमाणेच लग्नाचा, संसाराचा विचार न करता देवीशी लग्न करून तिची सेवा करावी असं वाटलं.

"शिवाय पुरुषासारखी भावना कधीच माझ्या मनात आली नाही. एखाद्या मुलीवर प्रेम करावं, असंही मला कधी वाटलं नाही. त्यामुळे मग मी साडी नेसायचा निर्णय घेतला," याच्या 13व्या वर्षी मनात सुरू असलेल्या अस्वस्थतेबद्दल ज्ञानेश्वर सांगतात.

पण ज्ञानेश्वर यांच्यासाठी हे सोपं काम नव्हतं. घरच्यांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांचाच विरोध होता. शेवटी त्यांनी घर सोडायचा निर्णय घेतला आणि थेट कर्नाटक गाठलं. कर्नाटकातल्या सौंदत्तीला जाऊन रेणुकामातेशी लग्न केलं.

वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वर यांनी रेणुकादेवीशी लग्न केलं.

फोटो स्रोत, Mauli Kamble/Facbook

फोटो कॅप्शन, वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वर यांनी रेणुकादेवीशी लग्न केलं.

"11 मे 1993ला कर्नाटकातल्या सौंदत्तीला जाऊन मी रेणुकामातेशी लग्न केलं. नाचगाणं, हळदी-कुंकू असा 1 रात्र आणि 1 दिवस तो विवाह सोहळा चालला. त्यानंतर अंगावर साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात पांढऱ्या रंगांची मोत्यांची माळ आणि डोक्यावर यल्लमाचा जग घेत मी देवदासी झाले, माउली माय झाले," ज्ञानेश्वर ते माऊलीच्या प्रवासाबद्दल ते सांगतात.

माऊली माय... देवदासी!

लग्नानंतर माऊली गावी आले. पण गावानं त्यांना स्वीकारलं नाही. 1995ला त्यांना गाव सोडावं लागलं.

"देवदासी होऊन गावी आले तेव्हा पाहुणे-रावळे माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघायचे. माझ्याकडे पाहून हसायचे. हिजडा झालाय, छक्का झालाय असं लोक म्हणायचे. शेवटी कंटाळून 1995साली मला गाव सोडावं लागलं. गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मगराच्या लिमगावला मी गेले. तिथल्या लोकांनी मात्र मला सहकार्य केलं," माउली पुढच्या प्रवासाबद्दल सांगतात.

माउली कांबळे

फोटो स्रोत, Mauli Kamble/Facebook

फोटो कॅप्शन, माऊली कांबळे

त्यानंतर यलम्माचा जग डोक्यावर घेत माउली आपल्या दोन-तीन तृतीयपंथीय सहकाऱ्यांसोबत गावोगावी जोगवा मागत फिरू लागल्या. माळशिरस, बारामती, इंदापूर, फलटण तालुक्यातली गावं त्यांनी पायाखाली घातली. 12 वर्षं घरापासून दूर राहिल्यानंतर मात्र त्यांनी गावी परतायचा निर्णय घेतला.

"12 वर्षांनंतर मी घरी परत आले. घरच्यांनीही मला स्वीकारलं. गावातल्या लोकांच्याही नजरा एव्हाना बदलल्या होत्या. ते मला माउली माय म्हणून मानायला लागले. मला तृतीयपंथीयांचं गुरुपद मिळायला लागलं आणि मग घरातच देवीचा दरबार भरू लागला. शिष्य आणि भाविकांकडून दान-दक्षिणा मिळू लागली. त्यातून मग अंगावरचं सोनं वाढत गेलं," अंगावरच्या दागिन्यांबद्दल माउली सांगतात.

राजकारणात प्रवेश

रेणुकामातेची सेवा सुरू असतानाच माउलींनी गावात समाजकार्य करायला सुरुवात केली. गावातली भांडणं मिटवणं, आजारी महिलांना पदरचे पैसे देऊन दवाखान्यात पाठवणं, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, अशी कामं त्या करू लागल्या.

पण राजकारणात यायची प्रेरणा त्यांना गौरी सावंत यांच्याकडून मिळाली.

माउली कांबळे

फोटो स्रोत, Mauli Kamble

फोटो कॅप्शन, माउली कांबळे

"गौरी सावंत यांचा जन्म मुलगा म्हणून झाला होता. वय वाढत गेलं तशी त्यांना आपण मुलगी आहोत याची जाणीव झाली. त्या घरातून पळून गेल्या. आज त्याच गौरी सावंत तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांचं धाडस बघून मी भारावून गेले. त्यांचे टीव्हीवरले कार्यक्रम पाहून मला आमच्या हक्कांची जाणीव झाली आणि मी लागलीच निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रांची जमवाजमव केली," राजकारण प्रवेशाविषयी माऊली सांगतात.

2017मध्ये तरंगफळ गावचं सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होतं. माउलींनी त्यासाठी अर्ज भरला. तशी विरोधकांनी माउलींच्या तृतीयपंथीय असल्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

''यांनी काय हिजडाच उभा केलाय, यांना दुसरं कोणी सापडलं नाही का?' अशी टीका माझ्यावर विरोधकांनी केली. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष दिलं. 'ना आगे, ना पीछे' हे घोषवाक्य तयार करून आम्ही ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याची ग्वाही दिली," प्रचाराच्या दिवसांबद्दल माऊली सांगतात.

सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण नंतर भाजपनं त्यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला.

'सरपंच माऊली'

निवडणुकीचा निकाल आला तेव्हा गावातल्या लोकांनी माऊली यांना पाठिंबा दिला होता, हे स्पष्ट झालं.

"तृतीयपंथीय उमेदवार उभा असल्याची बातमी आसपासच्या गावांत पोहोचली होती. निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. शेवटी निकाल आला आणि मी 167 मतांनी विजयी झाले. मी तृतीयपंथीय असले तरी कधीच कुणावर अन्याय केला नव्हता. टाळी वाजवून कुणाला त्रास दिला नव्हता. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता," निकालाच्या दिवसाचं माऊली वर्णन करतात.

माउली कांबळे

फोटो स्रोत, Mauli Kamble

"निवडून आल्यानंतर तर सगळंच बदललं. पहिले लोक लग्न वगैरे कार्यक्रमांसाठी बोलवायचे नाही. पण सरपंच झाल्यानंतर मात्र कार्यक्रमांची आमंत्रणं यायला लागली. मला हिजडा, छक्का म्हणणारी माणसं सरपंच माऊली म्हणायला लागली. पूर्वी कुणाशी ओळख करून देताना नातेवाईक हा आमच्या गावचा आहे असं सांगायचे, आता मात्र सगळेच लोक मला आपला आहे असं म्हणतात," माऊली बदललेल्या दिवसांबद्दल सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)