मोदी यांच्या हत्येचा माओवाद्यांचा कट : पुणे पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची माहिती

    • Author, संजय रमाकांत तिवारी
    • Role, नागपूरहून बीबीसी हिंदी डॉट कॉमसाठी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही हत्या करण्याचा माओवाद्यांचा डाव असल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात विशेष न्यायालयासमोर एक पत्र सादर केलं. या पत्रात माओवाद्यांच्या कटाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

जानेवारीत भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पाच लोकांना अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे असं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणातील एक संशयित रोना जेकब विल्सनच्या दिल्लीतील मुनीरका येथील घरातून हे पत्र हस्तगत करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

कॉम्रेड प्रकाश यांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलं आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतरही भाजपला अन्य 15 राज्यातील निवडणुकांमध्ये मिळवलेला विजय चिंताजनक असल्याचं या पत्रात म्हटल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

या माहितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दुजोरा दिला आहे. "विविध स्वरूपाची कागदपत्रं, अंतर्गत कम्युनिकेशन, हार्ड डिस्क अशा गोष्टी पोलिसांना सापडल्या आहेत. हे सगळं न्यायालयासमोर सादर करण्यात येतील. याप्रकरणाचा अन्य घडामोडींशी संबंध आहे आहे का, यासंदर्भात तपास सुरू आहे. याप्रकरणी आणखी काही बोलणं योग्य नाही," असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना या संदर्भात विचारल्यावर सांगितलं.

पत्रात नेमकं आहे काय?

'या गतीने घडामोडी घडत असतील तर पक्षासमोरच्या अडचणी वाढतील. मोदीराज संपुष्टात आणण्यासाठी कॉम्रेड किशन यांच्यासह वरिष्ठ कॉम्रेड्सनी कठोर पावलं उचलण्यासाठी मार्ग सांगितला आहे. राजीव गांधींची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याच धर्तीवर आम्ही विचार करत आहोत,' असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेची शहानिशा

"पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेची कसून शहानिशा करण्यात येईल," असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात आम्ही नेहमीच अतिशय गांभीर्याने विचार करतो. माओवादी हरलेली लढाई खेळत आहेत. माओवाद्यांचा प्रभाव ओसरला आहे. देशातल्या 135 जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांचं वर्चस्व होतं. आता हे प्रमाण कमी होऊन 90वर आलं आहे. माओवाद्यांचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व असलेले 10 जिल्हे शिल्लक राहिले आहेत, असं राजनाथ यांनी जम्मू काश्मीर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्रात म्हटलं आहे की, "हे आत्मघातकी पाऊल असू शकतं. हा प्रयत्न अयशस्वीही होईल. पोलिट ब्युरोने यावर चर्चा करण आवश्यक आहे. मोदी यांच्या रोडशोजना लक्ष्य करणं निर्णायक ठरू शकतं."

पत्रावर 18 एप्रिल 2017 अशी तारीख आहे. या पत्रात कॉम्रेड साईबाबा आणि अन्य काही नावांचा उल्लेख आहे.

देशभरात छापे

दरम्यान नक्षलवाद्यांच्या हालचालींविषयी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले आहेत असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या माहितीनुसार देशभरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले असून काही लोकांना अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार म्हणजे भाजपद्वारे पसरवण्यात येतं असलेली खोटी बातमी असण्याची शक्यता असू शकते, असं काँग्रेसचे नेते संयज निरुपम यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, "देशाच्या पंतप्रधानांची हत्या करण्याचा डाव असेल तर त्याची चौकशी होणं अत्यावश्यक आहे. पोलिसांनी जरूर चौकशी करावी. परंतु प्रसारमाध्यमांना यासंदर्भात कोणतीही माहिती मिळता कामा नये. मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटते तेव्हा भाजपला असं काहीतरी करावं लागतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)