कर्नाटक निवडणूक : 'मतमोजणीआधी मी साडे 7 तास झोपलो'

झोप

फोटो स्रोत, stockillustration

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर आली आहे. अनेक महिने प्रचारासाठी उन्हातान्हात हिंडणारे उमेदवार आता काय करत असतील, असा प्रश्न आम्हाला पडला. म्हणून आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या काही उमेदवार, आमदार आणि खासदारांना विचारलं की मतदान आणि मतमोजणीदरम्यान ते नेमकं काय काय करतात.

'साडे सात तासांची झोप आणि मुलींशी भेट'

कर्नाटक विधानसभेसाठी मतदान पार पडलं 12 मेला आणि लगेच तीन दिवसांत मतमोजणी होते आहे. पण हे तीन दिवसही उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहेत.

निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर दैनंदिन आयुष्यात काही बदल झाला का, असा प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मनोहर किणेकर दिलखुलास हसले.

"प्रचार सुरू होता तेव्हा सलग चार तास झोप नशिबात नव्हती. मतदानाच्या दिवशी साडे सात तास झोपलो," असं त्यांनी हसत हसत सांगितलं.

"कुटुंबापासून मधल्या काळात दूरच गेलो होतो. माझ्या मुली बाहेर असतात. मतदान झालेल्या दिवशी त्या बेळगावात आल्या. इतर नातेवाईकही घरी आले आहेत. सकाळी त्यांच्याबरोबर वेळ घालवतो, जे गेल्या काही दिवसांत शक्य झालं नव्हतं."

KARNATAKA ELECTION

फोटो स्रोत, RAJU SHINDOLKAR/BBC

फोटो कॅप्शन, मतदानानंतर मतमोजणी पर्यंत उमेदवार काय करतात?

पण मतदान झालं असलं तरी राजकारण संपत नाही. "रोज दीड-दोनशे कार्यकर्त्यांना भेटतो आहे. त्यांच्याकडून निवडणुकीदरम्यानच्या काळातला आढावा घेतला. निवडणुकीतल्या सगळ्या शक्यतांवर त्यांच्याशी चर्चा केली."

प्रणिती शिंदे : निकालाच्या आदल्या दिवशी झोप उडाली

सोलापूरच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना निवडणूक निकाल दहावी बोर्डाच्या परीक्षेसारखा वाटतो.

"मी दोनदा आमदार झाले तेव्हा दिवाळीचा मोसम होता. पण माझं कशातही लक्ष नव्हतं. निकालाच्या दिवशी तर झोप उडाली होती," प्रणिती शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

KARNATAKA ELECTION

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, प्रणिती शिंदे यांना निकालाच्या आधी झोप लागत नाही

"मी स्वत: काउंटिंग बूथवर जात नाही. पण दर तासाला फोन येतो. पहिल्या निवडणुकीत स्थिती दोलायमान होती. सहाव्या फेरीनंतर मग निकाल स्पष्ट होत गेला. मला हे ठळकपणे आठवतं."

प्रणिती यांना मतमोजणी पूर्ण होईपर्यंत काहीही दुसरं सूचत नाही. त्यांच्या मते दिवसभराची काम कार्यकर्त्यांच्या भेटी हे सुरूच राहतं. पण, त्याला मनातल्या 'टेन्शन'ची किनार असते.

पूनम महाजन : मॉर्निंग वॉक पुन्हा सुरू

भाजपच्या मुंबईतल्या खासदार पूनम महाजनही सांगतात 2014ची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी खास होती.

"2009मध्ये मी निवडणूक हरले होते. त्यामुळे 14ची खास तयारी केली. कार्यकर्त्यांशी भेटीगाठी वाढवल्या. राष्ट्रीय पक्ष संघटनेच्या बरोबरीने प्रचारात भाग घेतला."

2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी मतदान आणि मतमोजणी यामध्ये तब्बल एक महिना महाजन यांना मिळाला. "पण पक्ष जबाबदारी म्हणून मधल्या काळात इतर उमेदवारांचा प्रचार करायचा होता. माझ्या मतदारसंघात मतदान झालं म्हणून काम थांबलं नाही. राज्यभर दौरे सुरूच होते."

POONAM MAHAJAN, KARNATAKA ELECTION

फोटो स्रोत, NARINDER NANU

फोटो कॅप्शन, पूनम महाजन व्यायामाची काळजी घेतात

"शिवाय प्रचाराच्या तोफा थंडावल्या तरी मतदान किती झालं, विजयाची शक्यता किती आहे, मतदान करताना मतदारांनी कुठल्या मुद्यांचा विचार केला याचा आढावा घेण्याचं काम अव्याहत सुरू होतं."

खाजगी आयुष्यात मात्र पूनम यांना वेगळीच चिंता सतावत होती. "प्रचाराच्या काळात भरपूर चालणं झाल्यामुळे आपोआप व्यायाम होत होता. तोच स्टॅमिना आणि ताकद टिकवायची होती. म्हणून मग चौपाटीवर दोन ऐवजी चार फेऱ्या मारायला सुरुवात केली."

राहुल शेवाळे : आघाडीच्या बोलणीचा काळ

शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी 2014मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यांनाही मतदान आणि मतमोजणी दरम्यान महिनाभराची सुटी मिळाली होती. ते महत्त्व देतात कार्यकर्त्यांबरोबर वेळ घालवण्याला.

"कोणता उमेदवार जिंकू शकतो, उमेदवार का जिंकतो किंवा हरतो याची मीमांसा करण्याचा हा काळ आहे. निवडणुकीनंतर आघाडी करण्याची वेळ आली तर त्याची बोलणीही याच काळात सुरू होतात. तसंच कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे आभार मानतो. कारण ते आपल्यासाठी राबत असतात."

शशिकांत शिंदे : निकालाची रुखरुख

शशिकांत शिंदे

फोटो स्रोत, Twitter/Shashikant Shinde

राष्ट्रवादी पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदामंत्री म्हणून काम केलं आहे. ते सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

"एकदा मतदान झालं की थोडा आराम मिळतो. पहिल्या दिवशी तरी झोपायला संधी असते. नंतर मात्र पुन्हा काम सुरू," असं म्हणत शिंदे यांनी मतदानानंतरच्या जुळवाजुळवीकडे लक्ष वेधलं.

"मतमोजणीचा दिवस लांबला तर रुखरुखही वाढते. मतदान कसं झालं, मतदारसंघात काय वातावरण आहे याचा आढावा घेऊन पुढचे आखाडे बांधायचे असतात. आणि ही गणितं जुळवता जुळवता कधीकधी काही सुचेनासं होतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)