दृष्टिकोन : '...म्हणून अलीगढ विद्यापीठांनं जिन्नांचा सन्मान करणं योग्यच आहे'

    • Author, शीला रेड्डी
    • Role, 'मिस्टर अँड मिसेस जिन्ना' पुस्तकाच्या लेखिका

एखाद्या संस्थेच्या स्थापनेसाठी ज्या व्यक्तीनं आर्थिक मदत दिली असेल त्या व्यक्तीचा सन्मान करण्यात काय चूक आहे. याच कारणामुळे अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या भिंतीवर जिन्नांचा फोटो लावणं हे तार्किकदृष्ट्या योग्यच आहे.

या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग त्यासाठी दान करणारे मोहम्मद अली जिन्ना त्याकाळातले एकमेव नेते होते.

अलीगढ विद्यापीठाला दान केली संपत्ती

स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या श्रीमंत लोकांपैकी एक आणि तरीही कंजूस म्हणून जिन्ना प्रसिद्ध होते. पण, त्यांनी जवळपास त्यांची सगळी संपत्ती अलीगढ विद्यापीठ तसंच पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या इस्लामिया कॉलेज आणि कराचीमधल्या सिंध मदरेसातुल यांना दान केली होती.

शालेय विद्यार्थी असताना फार थोडा काळ सिंध मदरेसातुल इथं ते शिकायला होते. या शाळेव्यतिरिक्त वर उल्लेखलेल्या कोणत्याही शिक्षणसंस्थेत शिकायला नसतानाही त्यांनी आपली संपत्ती त्यांना दान केली.

तसंच, या शिक्षणसंस्थांना संपत्ती देण्याचा निर्णय त्यांनी पाकिस्तानची निर्मिती होण्याच्या 8 वर्षं आधी म्हणजे 30 मे 1939 लाच घेतला होता.

जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानची त्यांची मागणी वाढत गेली तेव्हा भारतातल्या अलीगढ मुस्लीम विद्यापीठाला आपली संपत्ती देण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला नाही.

ब्रिटीश राज्याचे कट्टर विरोधक

जिन्नाची संपत्ती हीच केवळ भारतासाठी भेट नव्हती. ते खूप लाजाळू आणि आदर्शवादी व्यक्ती होते आणि आपल्या उच्च राहणीमानासह बॅरीस्टरच्या रुपात मुंबईत आल्यानंतर ते एक प्रेरणादायी नेते बनले असं सरोजिनी नायडू यांनी त्यांच्याबद्दल म्हटलं होतं.

ते आपल्या योग्यतेनं आणि मेहनीतनं वकिलीच्या पेशात शीर्षस्थानी पोहोचले होते. अशावेळी दारू पिऊन आपला वेळ व्यतित करण्याऐवजी सार्वजनिक जीवनात त्यांना आपला वेळ घालयावयचा होता.

संसद किंवा संसदेबाहेर "ब्रिटीश राज्याचे कट्टर विरोधक" या रुपातच जिन्ना वावरत असत. त्यामुळे ते कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर शेकडो तरुणांना राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला देत असत.

तत्कालीन कायदे तज्ज्ञ एमसी चगला त्यांना बाँबेचे 'अनभिषिक्त सम्राट' म्हणत असत.

जिन्ना यांना 'मुस्लीम गोखले' व्हायचं होतं

उदारमतवादी गोपाळ कृष्ण गोखले यांनी अनेकांना वैभवसंपन्न आयुष्य सोडून राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं होतं. गोखले यांना जिन्ना यांच्या खरेपणाबद्दल तसंच ते सर्व संप्रदायांबद्दल पूर्वग्रह बाळगणार नाहीत, याची खात्री होती.

गोखले यांच्या सल्ल्यानेच जिन्ना मुस्लीम लीगमध्ये सहभागी झाले होते. पण, मुस्लीम लीग आणि मुस्लिमांबद्दल निष्ठा दाखवताना ती राष्ट्राच्या आड येणार नाही ही अट मात्र त्यांना गोखले यांनी घातली होती. जिन्नांचं मुस्लीम गोखले बनण्याचं स्वप्न होतं.

जेव्हा 1916 मध्ये काँग्रेस आणि मुस्लीम लीगला त्यांनी स्वराज्याची मागणी करण्यासाठी एकत्र येण्यासाठी सक्षम केलं तेव्हा त्यांचं हे स्वप्न पूर्ण होईल असं वाटतही होतं.

पण चार वर्षांतच त्यांचं हे स्वप्न तुटलं. कारण, उतावीळपणा करत महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाला सुरुवात केली आणि जिन्नांनी त्याचा विरोध केला. कारण, यातून अराजकता आणि हिंसा पसरेल अशी जिन्नांना भीती होती. मात्र, या विरोधानंतर त्यांना काँग्रेसमधून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला.

हिंदू-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते

काँग्रेस सोडण्यासाठी भाग पाडल्यानंतर सुद्धा हिंदू-मुस्लीम एकतेची आशा त्यांनी सोडली नाही. त्यांनी मुस्लीम धर्मांध लोकांबरोबर हातमिळवणी करण्यासाठी नकार दिला.

काँग्रेस सोडल्यानंतर बराच काळ राष्ट्रीय नेते म्हणून त्यांचा सन्मान होत होता. आपल्या समाजाला देशहिताच्या आधी ठेवणं त्यांना मान्य नसायचं.

महमूदाबादचे राजे आठवण सांगतात, "जेव्हा मी फक्त 12 वर्षांचा होतो तेव्हा मला त्यांनी विचारलं होतं की तू आधी मुस्लीम आहेस की भारतीय? तेव्हा विद्यर्थीदशेतल्या त्या मुलानं उत्तर दिलं की मी एक मुस्लीम आहे, मग एक भारतीय आहे तेव्हा जिन्ना रागावून म्हणाले, तू आधी एक भारतीय आहेस, मग एक मुस्लीम."

काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी आपली सगळी शक्ती ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध लढवण्यात घालवली. त्यांनी अपक्षांना घेऊनच एक पक्ष स्थापन केला. तसंच ज्यांनी गांधीचा आदेश न मानण्याचं ठरवलं होतं त्यांना हाताशी धरलं आणि स्वराज पार्टीच्या माध्यमातून संसदेत प्रवेश केला. त्यादरम्यान ते नेहमीचा काँग्रेसमध्ये सामील होण्याची संधी शोधत होते.

रॉलेट कायद्याविरुद्ध लढण्यात सगळ्यांत आघाडीवर

जिन्ना जितका काळ संसदेत होते तेवढ्या काळाता त्यांनी सरकारचे कट्टर विरोधक म्हणून काम केलं. त्यांनी असे मुद्दे उपस्थित केले ज्यामुळे भारताच्या भविष्याला आकार मिळाला. त्यात प्राथमिक शिक्षण, लष्कराचं भारतीयीकरण, नागरी सेवा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यांचा त्यात समावेश होता.

रॉलेट कायद्याविरुद्ध लढण्यात ते आघाडीवर होते. जेव्हा हा कायदा संमत झाला तेव्हा त्याविरोधात राजीनामा देणारे ते पहिले सदस्य होते.

सायमन कमिशनला विरोध करणारे ते पहिले होते. सायमन कमिशनविरुद्ध सार्वजनिकरीत्या आवाज उठवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे मुस्लीम लीगमध्ये फूट पडली. पण ही किंमत चुकवण्यासाठी ते राजी झाले.

मोहम्मद शफींच्या नेतृत्वाखाली मुस्लीम लीगच्या एका गटानं लीग सोडून दिली आणि सायमन कमिशनला मदत करण्यासाठी हिंदू महासभेची साथ देत एका वेगळ्या पक्षाची स्थापना केली.

जेव्हा हिंदू-मुस्लीम एकतेला झटका बसला

एका सर्वपक्षीय संमेलनात हिंदू महासभेच्या सदस्यांनी मुस्लीम लीग आणि काँग्रेसला जवळ आणण्याचे प्रयत्न हाणून पाडले आणि हिंदू-मुस्लीम एकत्रीकरण्याच्या आकांक्षांना ग्रहण लागलं.

हे संमेलन सोडताना ते रडले. या घटनेला काँग्रेसपासून वेगळं होण्याची उपमा त्यांनी दिली. खरंतर आठ वर्षांआधी त्यांना काँग्रेसनं काढून टाकलं होतं.

तरीसुद्धा मनाने ते राष्ट्रवादीच होते. त्यांनी इकबाल यांच्या पाकिस्तानाच्या विचाराला एका कवीचं स्वप्न असं संबोधलं. वास्तविक पाहता ते 1936 पर्यंत भूमिगत होते. पुन्हा मुख्य प्रवाहात आल्यावर ते संसदेत निवडून गेले. त्यानंतरही ते देशभक्त आणि उदारमतवादी, राष्ट्रवादी मुस्लीम गटाला बरोबर घेऊन जाण्याबाबत आशावादी होते.

जिन्ना फाळणीसाठी जबाबदार होते?

अनेक समकालीन लोक फाळणीसाठी काँग्रेसला जबाबदार मानतात, पण जिन्नांना नाही. जिन्नांचे जवळचे मित्र कांजी द्वारकादास यांनी 'Ten years to freedom' या पुस्तकात 28 ऑगस्ट 1942 ला जिन्ना यांच्याबरोबर 90 मिनिटं झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे. त्यानंतर पाकिस्तान कधी अस्तित्वात येईल अशी जिन्नांनी कल्पना सुद्धा केली नव्हती, असं त्यांनी लिहिलं आहे.

जेव्हा कांजी यानी जिन्नांना त्यांच्या पाकिस्तान विषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, "कांजी एक इशारा, मी फक्त एका मैत्रीपूर्ण इशाऱ्याची वाट पाहतोय आणि तो काँग्रेसकडून मिळत नाहीये. जर काँग्रेस असा इशारा देत असेल तर पूर्ण समस्या सोडवणं अजिबात कठीण नाही." पण या बदल्यात काँग्रेसनं त्यांचं नाव आपल्या पद्धतीनं वापरण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)