इशा अंबानी म्हणते 'होणार सून मी या घरची...'

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिचं लग्न पिरामल समूहाचे प्रमुख अजय पिरामल यांचे पुत्र आनंद पिरामल याच्यासोबत होणार आहे.

देशातल्या सर्व प्रमुख माध्यमांमध्ये ही बातमी झळकली आहे. तेव्हापासून सर्वांनाच आनंद पिरामल कोण आहेत याची उत्सुकता लागली आहे.

महाबळेश्वरच्या मंदिरात अंबानी यांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा झाला. याच कार्यक्रमात आनंद पिरामलनं इशाला 'प्रपोज' केलं, त्यानंतर त्यांचं लग्न ठरल्याची घोषणा अंबानी कुटुंबीयांतर्फे करण्यात आली असं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.

पिरामल आणि अंबानी कुटुंबीयांचे संबंध गेल्या चार दशकांचे आहेत. इशा आणि आनंद यांची गेल्या अनेक वर्षांपासून मैत्री असल्याचं अंबांनी कुटुंबीयांनी कार्यक्रमावेळी म्हटलं.

गुगल आणि ट्विटरवर देखील इशा अंबानी आणि आनंद पिरामल ट्रेंड होत आहेत.

आनंद पिरामल हा पिरामल समूहाचा कार्यकारी संचालक आहे. त्यानं युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्विनिया येथून पदवी आणि हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून एमबीए केलं आहे, अशी माहिती पिरामल समूहाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

इशा अंबानी या सध्या येल विद्यापीठात एमबीए करत आहे आणि ती रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या संचालकपदी सुद्धा कार्यरत आहे.

पिरामल समूहाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आनंदनं Piramal eSwasthya नावाचं स्टार्ट अप सुरू केलं. 'जास्तीत जास्त लोकांना आरोग्यसेवा मिळावी या हेतूनं हे स्टार्ट अप काम करतं,' असं पिरामल समूहाचं म्हणणं आहे.

'आनंद पिरामलनं वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायाच्या संधी शोधण्याचा प्रयत्न केला,' असं पिरामल समूहाच्या वेबसाइटवर म्हटलं आहे. आनंदनं 2012मध्ये पिरामल रिअॅल्टीची स्थापना केली.

आनंद पिरामलचे वडील अजय पिरामल यांची एकूण संपत्ती 4.6 अब्ज डॉलर आहे असं फोर्ब्स मासिकाचं म्हणणं आहे. पिरामल कुटुंबीय हे आधी टेक्सटाइल व्यवसायात होते. अजय पिरामल यांच्याकडे कौटुंबिक व्यवसायाची सूत्रं आल्यावर त्यांनी औषध व्यवसायात पदार्पण केलं आणि पिरामल फार्मा सोल्यूशन ही कंपनी स्थापन केली.

अजय पिरामल हे भारतातील 26 व्या क्रमाकांचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत असं फोर्ब्सनं म्हटलं आहे.

पिरामल समूहाचं एकूण मूल्य 10 अब्ज डॉलर आहे, असा दावा पिरामल समूहाच्या वेबसाइटवर करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)