वॉरन बफे : जगातला तिसरा सगळ्यांत धनाढ्य माणूस भारतात गुंतवणूक का करत नाही?

वॉरन बफे

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, वॉरन बफे
    • Author, दिनेश उप्रेती
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रिटेल क्षेत्रात जगभरातली अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वॉलमार्ट'नेही अखेर भारतात आपली एन्ट्री पक्की केली आहे. आणि केवळ पक्की न करता घट्टही केली, ते म्हणजे बुधवारी केलेल्या घोषणेतून.

वॉलमार्टने 'फ्लिपकार्ट' या आघाडीच्या ई-रिटेल कंपनीत 77 टक्के शेअर्स तब्बल 16 अब्ज डॉलर्सना विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. ही नक्कीच भारतात आजवर झालेल्या सर्वांत मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक असावी. अर्थातच याने स्पष्ट होतं की भारतावर अनेक परदेशी कंपन्यांचा डोळा आहे, आणि गुंतवणुकीसाठी त्यांना हा उत्तम पर्यायही वाटावा.

अशाच मोठमोठ्या गुंतवणुकींसाठी एक माणूस प्रसिद्ध आहे, तो म्हणजे वॉरन बफे. 'फोर्ब्स' मासिकाच्या श्रीमंताच्या यादीनुसार ते जगातले तिसरे श्रीमंत आहेत.

त्यांची एकूण संपत्ती 87 अब्ज 70 कोटी डॉलर इतकी आहे, ज्यात अब्जावधी रुपयांचे शेअर्स आहेत. तसंच, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार 'बर्कशायर हॅथवे' या बफे यांच्या होल्डिंग कंपनीकडे 116 अब्ज डॉलर, म्हणजे 7.65 लाख कोटी रुपये आहेत.

एक तुलना करावी तर, भारतातल्या बँकांचं सध्या 9 लाख कोटींचं कर्ज बुडालं आहे. तसंच भारतात सगळ्यांत जास्त गुंतवणूक असलेल्या TCS या टेक कंपनीलाही ते विकत घेऊ शकतात, इतका पैसा त्यांच्याकडे आहे. TCS ची बाजारातील गुंतवणूक नुकतीच 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली होती. या गटात सामील होणारी ही पहिलीच भारतीय कंपनी आहे.

'बर्कशायर हॅथवे'ने 31 डिसेंबर 2017 रोजी घोषित केलेल्या पोर्टफोलिओनुसार बफे यांची अमेरिकन एअरलाईन्समध्ये 10 टक्के भागीदारी आहे. त्यांनी नुकतंच अॅपलमध्ये पाच टक्के शेअर्स विकत घेतले, तर अमेरिकन एक्सप्रेसमध्ये त्यांची साडे सतरा टक्के भागीदारी आहे, आणि 'एक्सालटा कोटिंग सिस्टिम'चे त्यांच्याकडे साडे नऊ टक्के शेअर्स आहेत.

मग प्रश्न पडतो - त्यांनी आजवर भारतात गुंतवणूक का केली नाही? जगातल्या सर्वांत तेजीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या भारतात त्यांना रस नाही का? की ही त्यांची स्मार्ट गुंतवणूक चाल आहे, ज्यासाठी ते जगभर जाणले जातात?

वॉरन बफे कोण आहेत?

वॉरन बफे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 मध्ये अमेरिकेच्या ओमाहामधील नेब्रास्का भागात झाला. ओमाहा त्यांचं मूळ स्थान असल्याने त्यांना 'ओरॅकल ऑफ ओमाहा' असं म्हटलं जातं.

त्यांची अॅपलमध्ये गुंतवणूक आहे तरी त्यांच्याकडे iPhone नाही. इतकंच काय त्यांच्याकडे स्मार्टफोनसुद्धा नाही. ते जुनाच फ्लिपफोन वापरतात!

2013 साली एका टेलिव्हिजन चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "जोवर मी एखादी वस्तू 20-25 वर्षं वापरत नाही, तोवर मी ती फेकत नाही."

नंतर त्यांनी आपला फोन दाखवला आणि विनोदाने म्हणाले, "हा अलेक्झांडर ग्रॅहम बेलने मला दिला होता."

वॉरन बफे

फोटो स्रोत, AFP

बफे यांनी 11 वर्षांचे असताना पहिल्यांदा शेअर्स खरेदी केले होते. त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांनी पहिल्यांदा टॅक्स भरला होता.

वॉरन बफे व्यापार क्षेत्रातले भीष्मपितामह आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातले बादशाह म्हणून ओळखले जातात. पण याच बफेंना हार्वर्ड बिझनेस स्कूलने प्रवेश नाकारला होता. त्यानंतर बफे यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

बिझनेस मॅगझीन 'फोर्ब्स'च्या मते बफे यांनी आपलं 3BHK घर 1958 मध्ये 31 हजार 500 डॉलर्समध्ये खरेदी केलं होतं. आजही ते याच घरात राहतात.

2014 पर्यंत ते आपली जुनीच कार वापरत होते. त्यानंतर जनरल मोटर्सच्या CEOनी त्यांना नवीन मॉडल घेण्यासाठी राजी केलं. त्यांच्याकडे खासगी जेटही आहे, जे ते बिझनेस मिटिंग्ससाठी वापरतात.

बफे यांनी आयुष्यभर भरपूर पैसा कमावला. पण ते या पैशात फार गुंतून राहिले नाही. आपल्या कमाईचा 99 टक्के भाग त्यांनी दान केला आहे.

त्यासाठी त्यांनी आपल्या नावाचं कोणताही ट्रस्ट किंवा फाउंडेशन बनवलेलं नाही. उलट ती संपत्ती त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला दान केली.

मग भारतात गुंतवणूक का नाही?

मग इतकं सगळं असूनसुद्धा भारतात काहीच गुंतवणूक का करत नाहीत, हा प्रश्न उरतोच.

बाजारातील तज्ञांच्या मते, बफे जास्त धोकादायक गुंतवणूक करत नाही आणि त्यांचा दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास आहे.

विवेक मित्तल यांच्या मते, बफे भारतात गुंतवणूक करू इच्छित नाही, असं नाही. त्यांच्या 'बर्कशायर हॅथवे' कंपनीने 2011च्या सुमारास भारतात विमा क्षेत्रात येण्याचा प्रयत्न केला होता.

भारताने विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली होती. पण एक-दोन वर्षं हात पाय मारल्यानंतर त्यांनी माघार घेतली.

वॉरन बफे

फोटो स्रोत, AFP

मित्तल यांच्या मते अजूनही लालफीतशाही अजूनही अस्तित्वात आहे. बफे अमेरिका, जपान अशा अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करतात. इथे कागदपत्रांची पूर्तता करणंच त्यांना संकट वाटत असावं.

अर्थतज्ञ सुनील शास्त्री यांच्या मते, "भारत आणि चीन या देशांच्या अर्थव्यवस्था तेजीने वाढत असल्या तरीही, धोरणं आणि प्रशासकीय गुंतागुंतीवर बरंच काही अवलंबून असतं. तिथे सगळ्या गोष्टी राजकीय परिस्थितींवर अवलंबून असतात. सरकारने एखादं धोरण तयार केलं तर निवडणुकांमध्ये तोच मुद्दा पुढे करून ते धोरण रद्द करण्यात येतं. अशा परिस्थितीत मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणं, हे एक मोठं आव्हान आहे."

आसिफ इक्बाल एका ब्रोकरेज फर्ममध्ये रिसर्च हेड आहेत. त्यांच्या मते, वॉरन बफे यांचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे. "जगात सगळ्यांत उत्तम व्यवस्थापन असलेल्या कंपनीवर डोळा ते ठेवून असतात. त्याच बरोबर ज्या कंपनीत गुंतवणूक करतील त्या कंपनीतून त्यांना चांगला परतावा मिळायला हवा अशी त्यांची प्राथमिक अट असते."

इकबाल पुढे सांगतात, "भारत आणि चीन या महासत्तांचा त्यांना अंदाज नाही, अशातला भाग नाही. पण ते भारत आणि चीनमधल्या कंपनीत सरळ गुंतवणूक न करता त्याच क्षेत्रातील इतर देशांतील कंपनीवर दावा सांगतात. म्हणूनच बफे यांची गुंतवणूक तेल गॅस क्षेत्रातील कंपनी 'एक्झॉन'मध्ये आहे. ती जगातली सगळ्यांत मोठी तेल कंपनी आहे. या 'एक्झॉन' कंपनीनेच भारत किंवा चीनच्या कंपनीत भागीदारी करावी, अशी त्यांची योजना असेल."

वॉरन बफे

फोटो स्रोत, AFP

सुनील सिन्हा मानतात की बफे अमेरिकन कंपनीची नस पूर्णपणे ओळखून आहे. "विनिमय दर ही आणखी एक अडचण आहे. तो देशाच्या राजकारणावर आणि अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो. कॉर्पोरेट गव्हर्नंस हा एक मोठा मुद्दा आहे. भारत आणि चीनच्या कंपनीत तो तितका उच्च दर्जाचा नाही. किंगफिशर आणि जेपी ग्रुपचंच उदाहरण घ्या ना. त्यांनी बँकाचे हजारो कोटी रुपये बुडवलेत."

नियमन हा देखील एक मुद्दा असल्याचं सुनील सिन्हांना वाटतं.

"अमेरिकेसारख्या विकसित देशात कायद्यांबद्दल कोणतंही नरमाईचं धोरण अवलंबलं जात नाही. मग तो पर्यावरणाशी निगडीत मंजुऱ्या असो किंवा मग नियमनाबद्दल. भारतात अजूनही त्याबद्दल सुस्पष्टता नाही."

हे तुम्ही पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : ELSSमधून म्युच्युअल फंडाचा परतावा आणि कर बचतही

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)