You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दलितांचे धर्मांतरण : 'धर्म कोणताही असो, सन्मानाने जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच'
गुजरातच्या ऊना मारहाण प्रकरणातल्या पीडितांनी रविवारी हिंदू धर्माचा त्याग केला. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2016साली याच गावात दलितांना कथित गोरक्षकांनी मारहाण केली होती.
या घटनेमुळे नाराज झालेल्या जवळपास 300 दलितांनी रविवारी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हिंदू धर्मात आदर मिळत नाही, असं म्हणत सरवैया कुटुंबीयांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा घेतल्या.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तुषार व्हेंकटे यांनी याला बरोबर म्हटलं आहे. "हिंदू धर्मात उच्चवर्णीय लोकांना उच्च स्थान दिलं आहे. दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्याचे त्यांना हक्क दिले आहेत. अस्पृश्य समाजाला त्यात गुलामाची भूमिका दिली आहे. इतकंच नाही तर त्या गुलामगिरीतून सुटका होऊ नये अशी व्यवस्था त्या धर्मात केली आहे. हिंदू धर्माने लादलेल्या मानसिक गुलामीचा उच्चवर्णीय लोकांच्या सुखावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही," असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
"काही जण धर्म परिवर्तन केला म्हणून परिवर्तन करणाऱ्या लोकांवर टीका करत आहेत. पण जेव्हा त्यांच्यावर अन्याय होत होता, तेव्हा अन्याय करणाऱ्या लोकांवर किती टीका केल्या तुम्ही? पीडितांच्या बाजूने किती खंबीरपणे उभे राहिला," असा प्रश्न प्रफुल सोरते यांनी उपस्थित केला आहे.
तर निखील देशमुख म्हणतात, "धर्म बुद्ध असो वा, हिंदू किंवा अजून कोणता, सन्मानाने जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे."
"दलित कितीही गुणवान असला तरी जातीच्या चष्म्यातून बघितलं जातं. अशा धर्माचा त्याग करण्यात हित आहे," अशी प्रतिक्रिया दादाराव तायडे यांनी व्यक्त केलं आहे.
तर राजीव मेश्राम यांनी, "धर्म हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असून इतरांनी यावर टीका करू नये," असं म्हटलं आहे.
"संपूर्ण भारत बौद्धमय झाला तरच चीन-जपान सारखा विकास करू शकेल अथवा आहेच आपले बुवा, बापू, महाराज यांच्या चमत्काराची गोष्टी एकमेकांना सांगत बसणार," असं मत भालचंद्र खुंटे यांनी व्यक्त केलं आहे.
"अनादराकडून आदराकडे, इथेच बुद्ध महान ठरतो, खूप जवळचा वाटतो, परंतु अजूनही 85% लोक अपमानित होऊन जगत आहेत. त्यांनाही लवकरच सद्बुद्धी लाभो," अशी प्रतिक्रिया अभिषेक मोरे यांनी दिली आहे.
तर, "ज्यांना अशा प्रकारे जातीभेद करून छळलं जातं त्यांनी सर्वांनी धम्म स्वीकारावा," असं मत प्रवीण गजारे यांनी व्यक्त केलं आहे.
"दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्याऐवजी आपल्या समाजातील धर्मातील तळागाळातील लोकांचा कसा विकास करू शकतो, त्यांना कसं पुढे आणू शकतो, याचा विचार केला पाहिजे," असं जीतू कोळेकर लिहितात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)