प्रसून जोशी - मोदींचे खास अॅडमेकर कसे आले पत्रकाराच्या रूपात?

प्रसून जोशी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष असताना प्रसून जोशी यांनी लंडनला जाऊन मोदींची मुलाखत घेणं अनेकांना लांगूलचालन वाटलं.
    • Author, विकास त्रिवेदी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

लंडनमध्ये पंतप्रधान मोदींची मुलाखत घेणारे प्रसून जोशी हे एक लोकप्रिय गीतकार, एक प्रसिद्ध अॅडमेकर आणि अनेक पुरस्कृत सिनेमांचे लेखक आहेत. पण दोन दिवसांपूर्वी लंडनमध्ये पंतप्रधान मोदींसोबतच्या बातचीतनंतर ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. चित्रपटांच्या सेट्सवरचं क्रिएटीव्ही माइंड ते मोदींच्या राजदरबारातील राजकवी, अशा त्यांच्या प्रवासावर टाकलेला दृष्टिक्षेप.

25 नोव्हेंबर 2017

मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियावर 26/11च्या शहिदांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. मंचावर प्रसून जोशी 'मुमकिन है' या कवितेचं वाचन करत होते. तेव्हा तिथे उभे असलेल्या कार्यक्रमाच्या संचालकांनी थोडं नाराजीनंच प्रसून ला सांगितलं, "दर्द लाओ प्रसून... दर्द."

हे ऐकून स्टेजच्या खाली उभा असलेला मी आणि वर बसलेले प्रसून जोशी थोडं उदास झालो. त्या दिवशी प्रसून जोशी आपल्या डायरेक्टरला प्रभावित करू शकले नाही, पण पाच महिन्यानंतर कवीच्या रूपातून पत्रकाराची वस्त्र पांघरलेल्या प्रसून जोशींनी यावेळी डायरेक्टर असलेल्या पंतप्रधान मोदींना मात्र चांगलंच प्रभावित केलं.

लंडनमध्ये 18 एप्रिलला झालेल्या 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसून जोशींनी केलं. हा कार्यक्रम नीट बघितला तर प्रसून जोशींच्या तीन भूमिका प्रामुख्याने समोर येतात.

पहिली- सामान्य लोकांचे स्तुतीने भारलेले प्रश्न विचारणं

दुसरी- स्वत:चे स्तुतीने भारलेलेच प्रश्न विचारणं

तिसरी- भारत आणि मोदी यांची स्तुती करणाऱ्या कवितांचं वाचन

या भूमिकांचं एक उदाहरण एका छोट्या प्रश्नातून कळू शकेल.

"मोदीजी, तुम्ही कधी अस्वस्थ होता का? बुलेट ट्रेनच्या गतीने कामं होत नाहीत, या विचाराने कधी निराशा होत नाही का?"

हा प्रश्न ऐकून आनंदित झालेले मोदी म्हणतात, "एका कवीत पण पत्रकार दडलाय, हे मला माहिती नव्हतं."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

लंडनस्थित पत्रकार परवेज आलम या कार्यक्रमावर लिहितात, "या कार्यक्रमात प्रत्येक गोष्ट आधीपासूनच ठरली होती. मोदींची मुलाखत घेणारे प्रसून जोशी कमालीचा अभिनय करत होते. असे प्रश्न विचारले की मोदी गहिवरून गेले."

पण गहिवरून गेलेले मोदी आणि कविराज जोशी इथेच थांबले नाही. दोन तास 20 मिनिटांत अनेक गोष्टी बदलल्या पण मूळ भावना तीच होती. म्हणून आता जरा आपण भाषणाच्या आधीच्या काळात जाऊया आणि प्रसून जोशींची कहाणी ऐकूया.

संगीतकलेचा वारसा घरातच

प्रसून जोशी यांची 'कुछ कर गुजरने की' सुरुवात पर्वतरांगातून झाली. उत्तराखंडमधील अल्मोडा गावात 1971 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते आणि आई शास्त्रीय गायिका होती.

आई आणि वडील दोघांनाही शास्त्रीय संगीतात रस होता. 'द इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, "वडील सरकारी अधिकारी असल्यामुळे ग्रंथालय बराच वेळ उघडं असायचं आणि आई शास्त्रीय गायिका असल्यामुळे तिच्या स्वरांनीच मला जाग यायची."

पण प्रसून मात्र गायक होण्याऐवजी गीतकार झाले. 17 वर्षांचे असताना त्यांनी 'मै और वो' हे पुस्तक लिहिलं. प्रसून यांनी आतापर्यंत पाच पुस्तकं लिहिली आहेत.

'तारे आसमां नहीं जमीन पर खो जाते हैं' सारखी गीतं लिहून विज्ञानाच्या नियमांना तडा देणाऱ्या प्रसून यांनी भौतिकशास्त्रात पद्व्युत्तर शिक्षण आणि MBA केलंय.

पण प्रसून यांनी लवकरच वेगळा मार्ग चोखाळला.

जाहिरात क्षेत्रातली मुशाफिरी

MBA केल्यानंतर प्रसून जोशी यांनी करिअरची सुरुवात 'ओगल्वी अँड मँथर' या कंपनीत ज्युनिअर कॉपीराईटर म्हणून सुरू केली. या कंपनीनेच 2014 साली नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारासाठी 'अब की बार मोदी सरकार' हे घोषवाक्य दिलं होतं, हे विशेष.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, PMO INDIA

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी

या कंपनीत त्यांना नोकरी मिळण्याचा किस्सा सुद्धा फारच रंजक आहे. 'बिझनेस स्टँडर्ड'च्या श्यामल मजूमदारला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला.

"'ओगल्वी अँड मँथर'च्या प्रमुखांनी एका टाईलचा फोटो मला देत म्हणाले की याबद्दल एक विस्तृत कॉपी दोन तासांत लिहून दे. मी दहा मिनिटात कॉपी लिहून दिली. काही सेकंदात बॉस म्हणाले, तुमची नोकरी पक्की!"

प्रसूनने या कॉपीत लिहिलं होतं, "या टाईल बसवण्यासाठी तुम्हाला फार श्रीमंत व्हावं लागेल. श्रीमंत... आपल्या कल्पनांनी."

2002 साली प्रसून 'मॅकएन' या एका दुसऱ्या कंपनीत जॉईन झाले. या कंपनीत असताना त्यांनी अनेक पंचलाईन लिहिल्या. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर

  • 'अबे फ्लावर पॉट, ठंडा मतलब कोका कोला'
  • 'सैय्या मोरे गप्पी देते नहीं पप्पी. लोग क्लोरमिंट क्यों खाते हैं? दोबारा मत पूछना!'
  • 'ठंडे का तड़का... यारा का टशन'
  • 'अतिथि देवो भव:'
  • 'उम्मीदों वाली धूप, सनसाइन वाली आशा. रोने के बहाने कम हैं, हँसने के ज़्यादा.'

प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या ओळींची फक्त स्तुतीच झाली असंही नाही. 'उम्मीदों वाली धूप' या कँपेनमध्ये त्यांच्यावर टीका झाली. समाजाचं वास्तव न बघता फक्त बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन या ओळी लिहिल्याची टीका त्यांच्यावर झाली.

प्रसून यांना 2003 साली कोका कोलाच्या जाहिरातीसाठी प्रतिष्ठित 'कान लॉयन' पुरस्कार मिळाला. 1992 पासून जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसून यांची आता कुठे ओळख निर्माण होऊ लागली होती.

नरेंद्र मोदी आणि प्रसून जोशी यांचं नातं जुनं आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा स्वर्णिम गुजरात अभियानाचं संपूर्ण लेखन प्रसून जोशींनीच केलं होतं.

प्रसून यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली तेव्हा एका गाण्याचं त्यांना 1,500 रुपये मिळायचे. पण आता ते एका गाण्याचे चार ते सहा लाख रुपये घेतात, असं चित्रपटसृष्टीतील एका गीतकारानं सांगितलं.

चित्रपट क्षेत्राचा प्रवास

2001 साली प्रदर्शित झालेल्या राजकुमार संतोषीच्या 'लज्जा' चित्रपटासाठी त्यांनी एक गाणं लिहिलं - 'ना कोई धरती है तेरी ना कोई गगन, शाख से पत्ते को जैसे ले चले पवन, कौन डगर कौन शहर' अशा त्या गाण्याच्या ओळी होत्या.

हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यामुळे आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना आणखी वाट पहावी लागली.

प्रसून जोशी

फोटो स्रोत, PMO

मग 2006 साली रंग दे बसंती आला - 'रूबरू...', 'खलबली है खलबली...', 'कुछ कर गुज़रने को खून चला...', 'मस्ती की पाठशाला...', 'लुका छिपी...', 'तू बिन बताए मुझे ले चल कहीं...' सारखी त्यांची गाणी ओठांवर खेळू लागली.

या गाण्यांचा परिणाम 2011 साली अण्णां हजारेंचं आंदोलन आणि 2012 साली दिल्लीतल्या निर्भया बलात्कार-खून प्रकरणानंतर अनेक तरुण रस्त्यांवर उतरले तेव्हा दिसला. व्यवस्थेविरुद्ध राग असणारी ती लोक होती आणि त्यांच्या मनात 'कुछ कर गुज़रने को खून चला' ही भावना होती.

2007 साली आलेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटातील 'देखो इन्हें ये हैं ओस की बूंदें...', 'दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो...', 'खोलो खोलो दरवाजे, पर्दे करो किनारे...', 'तुझे सब है पता, है ना मां....', या गाण्यांनीसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

त्यानंतर 'दिल्ली 6', 'आरक्षण', 'लंडन ड्रीम्स', 'ब्लॅक', 'नीरजा', 'हम तुम', 'गजनी', 'फना' अशा अनेक चित्रपटांची गाणी प्रसून यांनी लिहिली. मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाची पटकथासुद्धा प्रसून जोशी यांनी लिहिली होती.

2018 मध्ये येणाऱ्या कंगना राणावतच्या 'मणिकर्णिका- द क्वीन्स ऑफ झांसी' चित्रपटाची गीतं प्रसून जोशींनी लिहिली होती.

मुख्य पुरस्कार

  • 2002- जाहिरात क्षेत्रातला ABBY पुरस्कार
  • 2003- कान्स लॉयन पुरस्कार
  • 2005- 'हम तुम'च्या 'सांसो को सांसो से...' गाण्यासाठी स्क्रीन अवॉर्ड
  • 2007- 'फना'च्या 'चांद सिफारिश...' गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड
  • 2008- 'तारे जमीन पर'मधल्या 'मां' गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर
  • 2013- 'चितगाँग' चित्रपटातील 'बोलो ना...' गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार
  • 2014- 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातील 'जिंदा...' गाण्यासाठी फिल्मफेअर
  • 2015- 'भाग मिल्खा भाग' साठी बेस्ट स्टोरी अवॉर्ड
  • 2015- पद्मश्री पुरस्कार
  • 2017- वादग्रस्त पहलाज निहलानी यांना सेंसॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवल्यावर प्रसून जोशी यांची चेअरमनपदी निवड

राष्ट्रीय मुद्द्यांवर कायम चर्चेत

'पद्मावत' चित्रपटाच्या वेळीसुद्धा विरोधाची ठिणगी प्रसून जोशींपर्यंत पोहोचली होती. 'पद्मावत'च्या वेळी प्रसून जोशी यांनी अंधारात ठेवल्याचा आरोप मेवाड राजघराण्याचे प्रमुख महेंद्र सिंह मेवाड यांनी केला होता.

सिंह यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींना याबाबत एक पत्र लिहिलं होतं. सेंसॉर बोर्डाने चित्रपटाला परवानगी देण्याची घाई केली, त्यामुळे बोर्डाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

या विरोधामुळेच ते 2018 च्या 'जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल'ला जाऊ शकले नाही.

प्रसून जोशी

फोटो स्रोत, FACEBOOK/PRASOON JOSHI

अयोध्या मुद्द्यावर 2010 मध्ये त्यांनी केलेली ही कविता चर्चेत होती -

'किसी ने कुछ बनाया था. किसी ने कुछ बनाया है...

ना जाने किसका मंदीर है, ना जाने किसकी मस्जिद है...

अगर हिंदू में आंधी है, अगर तूफान मुसलमां है...

तो आओ आंधी तूफान यार बनके कुछ नया करते हैं.'

निर्भया प्रकरणानंतर प्रसून जोशी रस्त्यावर आपली 'बाबुल मोरा जिया घबराए' ही कविता सादर करताना दिसले.

मागच्या वर्षी गुडगावच्या रायन इंटरनॅशन स्कूलमध्ये प्रद्युम्न नावाच्या एका लहान मुलाच्या हत्येनंतर जोशींनी लिहिलेली कविता व्हायरल झाली होती.

प्रसून जोशींची आवडनिवड

प्रसून जोशींना गुलजार अतिशय आवडतात. ते नेहमी म्हणतात, "मुंबईला मी अनेक गोष्टींसाठी माफ करतो कारण तिथे गुलजार राहतात."

प्रसून जोशी

फोटो स्रोत, AFP

शंकर एहसान लॉय हे त्यांचे आवडते संगीतकार आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्याचंही ते अनेक कार्यक्रमांतून सांगतात. आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'चं टायटल साँग प्रसून यांनीच लिहिलं होतं.

प्रसून यांची पत्नी अपर्णा त्यांच्या संघर्षाच्या काळात आर्थिक सहाय्य करायची.

निष्ठा, श्रद्धा

सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष असताना प्रसून जोशी यांनी लंडनला जाऊन मोदींची मुलाखत घेणं अनेकांना आवडलं नाही.

ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन म्हणाले, "लंडनमध्ये प्रसून जोशी जे करत आहेत ती लांगुलचालनाची परिसीमा आहे. लंडनमध्ये पंतप्रधानांना गैरसोयीचं प्रश्न न विचारणं यावरूनच कळतं की प्रश्न तर विचारा पण स्तुतीने भारलेलेच."

मुलाखतीत प्रसून यांनी प्रश्न विचारला, "तुमच्यात एक प्रकारची फकिरी आहे. कुठून आली आहे ही फकिरी?" म्हणूनच की काय ट्वीटमध्ये फकिरीचा उल्लेख आला होता.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

एका कवीने विचारलेल्या या प्रश्नामुळे मोदींचं कविमन जागृत झालं. स्वत:ची कविता तर ते ऐकवू शकले नाहीत म्हणून राजा रंति देव यांची 'न मुझे राज्य का कामना है. न मुझे मोक्ष, न मुझे पुनर्जन्म की कामना है....'' ही कविता ऐकवली.

प्रसून जोशी

फोटो स्रोत, FACEBOOK/PRASOON JOSHI

मोदींचं भाषण ऐकून 'राज्य की कामना' ही ओळ विरोधाभासी वाटली असावी. पण कवितेने काही हो न हो, एका नवीन कवितेला नक्कीच जन्म मिळतो.

'एक आसमां कम पड़ता है/ और आसमां मंगवा दो

हैं बेसब्र उड़ानें मेरी/ पंख ये नीले रंगवा दो

स्वप्न करोड़ों सत्य हो रहे/ अब उनका सत्कार करो

निकल पड़ा है भारत मेरा/ अब तुम जय जयकार करो

मोदींशी झालेल्या स्तुतीपूर्ण चर्चेनंतर प्रसून जोशी यांनी याच ओळींनी कार्यक्रमाचा समारोप केला.

हे पाहून असं लक्षात येतं की कवी, अॅडगुरू, सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि आता पत्रकार प्रसून जोशी 'जिंदा है तो प्याला पुरा भर ले' या स्वत:च्याच ओळी जगत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)