You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'महाभारतातलं इंटरनेट म्हणजे कठुआवरून लक्ष विचलित करण्यासाठी खटाटोप'
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी एका भाषणात महाभारात काळापासून इंटरनेट होतं, असा दावा केला आणि त्यानंतर यावरून सोशल मीडियावर कालचा दिवस महाभारतच सुरू होतं.
एका वृत्तानुसार, राजधानी आगरतळामध्ये एका कार्यक्रमात बोलताना बिप्लब देव म्हणाले, "महाभारत काळात आणखी बऱ्याच तांत्रिक सोयीसुद्धा उपलब्ध होत्या. महाभारतात जे युद्ध झालं ते संजयने धृतराष्ट्राला सांगितलं. संजय हे युद्ध दूरवरून पाहू शकले. कारण तेव्हा इंटरनेट उपलब्ध होतं."
देव यांच्यावर टीका झाली तसं त्याचं म्हणणं उचलून धरणारी मंडळीही सोशल मीडियातून व्यक्त झाली. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांनीही त्यांची याबाबतची मतं मांडली.
वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहोत.
आशिष महाले विचारतात, "कठुआ, उन्नावचं काय झालं? ATMमध्ये पैसे का नाहीत?"
देवेंद्र धोंडे पण अशीच खोचक प्रतिक्रिया देतात. "त्यावेळी वीज कनेक्शन होतं का? असेल तर टाटाची वीज होती का रिलायन्सची?"
"ही भाजपची मोडस ओपेरेंडी आहे. कठुआ, उन्नाव प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा खटाटोप. याकडे फारसं लक्ष दिलं नाही पाहिजे," अशी प्रतिक्रिया दिली आहे मिलिंद कांबळे यांनी.
रोहित बामणे म्हणतात, "जग कुठल्या कुठे चाललंय आणि आपले सत्ताधारी अजून पौराणिक, काल्पनिक चमत्कारात गुंतलेत."
"हो, तेव्हा पण 2 GB नेट मिळायचं," अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे सचिन कांबळे यांनी.
राजेश कणेरी यांना मात्र असं वाटतं नाही. ते म्हणतात, "रामायण काळात विमानं होती याचे पुरावे अजूनही श्रीलंकेत आहेत. रामसेतूचा जिथे उल्लेख आहे, तिथे तो अजूनही आहे. महर्षी भारद्वाज यांनी विमान बनवण्याचे 500 सिद्धांत दिले होते. ग्रंथात लिहिलेलं सगळंच असत्य असतं असं नाही."
प्रसाद चव्हाण लिहितात, "मग नासाचे शास्त्रज्ञ का भारतीय पुरातन साहित्य वाचतात? सूर्यमंदिर आजही इतकं अचूक आहे का आहे? राजस्थान मधील जंतर मंतर मधील घड्याळ हे आधुनिक घड्याळापेक्षा जास्त अचूक आहे."
विशाल पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "ज्यांना ह्या भाकडकथा खऱ्या वाटतात त्यांना जर्मनी, जपान अशा प्रगत तंत्रज्ञान असलेल्या देशात नेऊन सोडलं पाहिजे. तिथले लोक हसून हसून मरतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)