ग्राउंड रिपोर्ट : अहमदनगर दुहेरी खून प्रकरण; केडगाव अजूनही का आहे दहशतीखाली?

मृत संजय कोतकर यांचे आई-वडील आणि पत्नी

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, मृत संजय कोतकर यांचे आई-वडील आणि पत्नी
    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

अहमदनगरच्या ज्या केडगाव भागात शनिवारी सायंकाळी 2 शिवसैनिकांचा खून झाला ते केडगाव अजूनही दहशतीखाली असल्याचं जाणवलं. याच केडगावचा हा ग्राऊंड रिपोर्ट.

केडगाव - पुण्याकडून येताना अहमदनगर शहराचा सर्वप्रथम दिसणारा हा भाग. केडगाव तसं अलीकडेच अहमदनगर महापालिकेत समाविष्ट झालं. याच केडगावमध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांची हत्या झाली. या घटनेची दहशत आजही इथे जाणवत होती.

माध्यम प्रतिनिधी म्हणून जेव्हा केडगाव कमानीजवळ त्या दिवशीच्या घटनास्थळाचा पत्ता विचारला तेव्हा दोघे जण काहीही उत्तर न देता निघून गेले.

नंतर आलेल्या दोन युवकांना याबाबत विचारलं तर त्यांनी उलट चौकशीच सुरू केली. कुठून आलात, बाहेरचे दिसता, कोणत्या प्रेसचे आहात? इथला परिसर कुणाचा आहे माहीत नाही का? असे अनेक प्रश्न त्यांच्याकडून आले. पण तोपर्यंत बंदोबस्तावरील पोलीस तिथे आले आणि युवकांनी काढता पाय घेतला.

केडगाव

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, केडगाव आजही दहशतीखाली आहे.

केडगावमधील 32 ब वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत यावेळी काँग्रेस आणि शिवसेनेतील मतांमधलं अंतर अगदी कमी होतं. जवळपास 1,133 वरून ते 434वर आले. विजय मिळाला तरी कोतकर यांच्या वर्चस्वाला मिळालेली टक्कर आणि मागील वाद हे या हत्याकांडाला कारणीभूत ठरले का? हा प्रश्न आहे.

ज्या ठिकाणी हे हत्याकांड घडलं त्या भागातील लोक आता बाहेरगावी गेले आहेत. दरवाजांवर लागलेली कुलपं आणि ओसरीत पडलेली वृत्तपत्रं हे सांगण्यास पुरशी आहेत. रहिवासी अद्यापही दहशतीखाली असल्याचं पावलोपावली जाणवत होतं. जी घरं उघडी होती त्यातले लोक या घटनेवषयी काहीही बोलण्यास तयार नव्हते.

बंद दरवाजे बरंच काही सांगून जातात.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, बंद दरवाजे बरंच काही सांगून जातात.

मृत संजय कोतकर हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचं काम करत होते. केडगाव भागात शिवसेनेची पाळंमुळं रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असं इथल्या स्थानिकांकडून सांगण्यात आलं.

वडिलांचा फोन आला आणि...

संजय यांचा मुलगा संग्राम कोतकर यांना आम्ही भेटलो. "मला त्या दिवशी वडिलांचा फोन आला, त्यांनी आरोपींची नावं घेत सांगितलं की मला गोळ्या घातल्यात. माझं सर्व संपलं आणि अचानक फोन कट झाला. मी धावतच घटनास्थळी गेलो."

संग्राम कोतकर

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, संग्राम कोतकर

"तिथं काही शिवसैनिक पोहोचले होते. शिवसैनिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. अर्धा तासाने पोलीस आले. पण रुग्णवाहिका आली नव्हती. लोकांनी घराचे दरवाजे लावून घेतले होते. दिवे बंद केलेले होते. अचानक महापालिकेचे स्ट्रीट लाईटही बंद झाले."

"समोर वडिलांचा मृतदेह होता. पण मी घरी कळवलं नाही. आईला मेंदूचा आजार आहे आणि तिला अधून मधून चक्कर येते. माझे वडील हे आजी-आजोबांचे एकुलते एक अपत्य होते," संग्राम सांगत होते.

मृत संजय यांच्या वडिलांचं वय 94 वर्षं तर आईचं वय 82 वर्षं आहे. त्यामुळेच मुलगा संग्राम यांनी त्या दिवसापासून घरातला टीव्ही बंद ठेवायला सांगितला. वृत्तपत्रं पण बंद होतं, असं ते सांगतात.

संजय कोतकर आणि वसंत ठुबे

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, संजय कोतकर आणि वसंत ठुबे

शेवटी पोस्टमार्टेमनंतर रविवारी औरंगाबाद इथून मृतदेह अहमदनगरला आले तेव्हा संग्राम यांनी त्यांच्या मामांना सांगून वडिलांच्या मृत्यूची बातमी घरी कळवली.

संजय कोतकर यांचे वृद्ध वडील - केशव कोतकर निवृत्त पोलीस हवालदार आहेत. लग्नाच्या 18 वर्षानंतर संजय यांच्या रूपाने मुलगा झाला होता, असं ते सांगतात.

संजय यांच्या आई वत्सला म्हणतात, "आम्ही आता लंगडे झालोय. आमचा हिमती मुलगा सोडून गेला. आमच्या नातवाकडे तुम्हीच लक्ष ठेवा आता."

माजी आमदार अनिल राठोड यांच्यासमवेत कोतकर कुटुंबिय

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासमवेत कोतकर कुटुंबीय

या प्रकरणात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ यासह इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

संग्राम जगताप यांचे सासरे आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या इतर 22 लोकांना अटक झाली असून एकूण 52 नावं तोडफोड प्रकरणी निष्पन्न झाली आहेत.

पोलिसांची पाच पथकं सध्या तपासकामात लावण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस संचालक बिपीन बिहारी आणि नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक विनय चौबे स्वतः तळ ठोकून बसले आहेत.

CBIने याचा तपास करावा

36 वर्षांचे वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांची मैत्री गेली अनेक वर्षं होती. ठुबे यांना दोन मुलं आहेत. एक दोन वर्षांचा आणि एक पाच वर्षांचा. ठुबे शेती करायचे. तीन भावंडांमधील ते सर्वांत लहान.

चंद्रकांत ठुबे

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, चंद्रकांत ठुबे

त्यांचे भाऊ सांगतात की, याआधी पण त्यांना धमक्या आलेल्या म्हणून या पोटनिवडणुकीत आम्ही त्याला प्रचाराला जाऊ दिले नाही. आम्ही स्वतः प्रचारात होतो. निवडणुकीच्या निकालानंतर दुपारी एक वाजता वसंत नगरला जातो असं म्हणून जो गेला तो परत आलाच नाही.

वसंत यांचे चुलत भाऊ चंद्रकांत ठुबे सांगतात, "इथं राजकारणी तीन पक्षातले जरी असले तर ते एकमेकांच्या नात्यागोत्यात येतात. आपापसात त्यांची सोयरीक आहे. त्यामुळे त्यांना राजकीय विरोध नाही. इतर वेळी ते राजकारण करत असले तरी निवडणुकीत ते एकमेकांना जिंकून आणतात."

मृत वसंत ठुबे यांच कुटुंबिय

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, मृत वसंत ठुबे यांच कुटुंबिय

"15- 15 गुन्हे दाखल असलेली ही मंडळी त्यांना होणारा विरोध मोडूनच काढतात. ते धमकी देणार. व्यवसाय करू नाही देणार. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या वाटेला जात नाही," चंद्रकांत माहिती देत होते.

मृत वसंत यांची पत्नी अनिता या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांची स्पष्ट मागणी आहे की, याचा तपास CBIने करावा. तसंच या केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम हेच असावेत. असंही त्या म्हणतात.

का दहशतीखाली आहे अहमदनगर?

इथल्या दहशतीची तुलना अगदी चित्रपटातल्या सारखीच असल्याचं नागरिक म्हणतात.

पत्रकार शिवाजी शिर्के या परिस्थितीचं विश्लेषण करताना म्हणतात, "300 लोकांची गर्दी येते आणि संशयित आरोपी आमदारांना सहजपणे पोलीसांच्या ताब्यातून घेऊन जाते. आता पोलीस अधीक्षकांची ही अवस्था असेल तर सामान्यांचं काय?"

घटनेच्या दोन दिवसानंतरही या भागात व्यापार-व्यवसाय बंद आहे.

फोटो स्रोत, PRAVIN THAKARE/BBC

फोटो कॅप्शन, घटनेच्या दोन दिवसानंतरही या भागात व्यापार-व्यवसाय बंद आहे.

"इथलं राजकारण फक्त तीन कुटुंबांच्या ताब्यात आहे. त्यातील अनेकांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत. इथे प्रत्येक जण आपल्या राजकीय पक्षाचा आपापल्या नातेवाईकांना कसा फायदा करून घेता येईल हे बघतो. केडगावमध्ये याविषयी कुणीही उघडपणे बोलणार नाही. 5 ते 7 वर्षांपूर्वी लोक थोडेफार बोलायचे. पण कालच्या हत्याकांडानंतर पुढील दहा वर्षं कुणीच बोलणार नाही. एवढी जरब आहे," असं निरीक्षण शिर्के नोंदवतात.

या सर्व परिस्थितीचा आढावा गृहराज्यमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. पत्रकार परिषद घेत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांचं तत्काळ निलंबन केल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच पोलीस उपअधीक्षक अक्षय शिंदे आणि पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या चौकशीचे आदेश आपण दिल्याची माहिती केसरकरांनी दिली.

आतापर्यंत पोलिसांना सहा वेळा संपर्क साधण्यात येऊनही पोलिसांनी वरिष्ठांचं नाव पुढे करत माध्यमांना प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितलं. पोलिसांमध्येच दहशत असेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)