भिडे समर्थक म्हणतात प्रकाश आंबेडकर सरकारचे जावई

भिडे

फोटो स्रोत, Swati Rajgolkar/BBC

भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांच्या समर्थनासाठी राज्यभरात विविध ठिकाणी सन्मान मोर्चे काढण्यात आले. भिडे यांच मुख्य कार्यक्षेत्र असलेल्या सांगलीसह मुंबई, पुणे, नाशिक याठिकाणी त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले.

सांगलीत सकाळी बाराच्या सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून मोर्चा सुरू झाला. राम मंदिर चौक, काँग्रेस भवन, आझाद चौकमार्गे मोर्चा स्टेशन चौकात धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चकऱ्यांकडून निवेदन देण्यात आलं.

पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आंदोलकांनी नदीपात्रात ठिय्या मांडून निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

संभाजी भिडे, भीमा कोरेगाव
फोटो कॅप्शन, भिडे गुरुजींच्या सांगली शहरात सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सन्मान मोर्चात मांडण्यात आलेल्या मागण्या

1. भीमा कोरेगाव दंगलीवेळी वडगाव बुद्रुक इथं फलक लावणाऱ्या संबंधितांना अटक करावी.

2. संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे सरकारने तात्काळ मागे घ्यावेत.

3. मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी.

4. पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर आणि संयोजकांवर कारवाई करावी.

5. भीमा कोरेगाव हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा.

6. महाराष्ट्र बंद 3 जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. बंददरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई बंद पुकारणाऱ्यांकडून करावी.

7. हिंसाचारामागे नक्षली हात आहे का? याची चौकशी करावी.

दरम्यान भीमा कोरेगावप्रकरणात संभाजी भिडेंचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. ज्या महिलेनं त्यांच्याविरोधात तक्रार केली होती तिनंच भिडे गुरूजींना ओळखत नसल्याची साक्ष दिली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.

संभाजी भिडे, भीमा कोरेगाव
फोटो कॅप्शन, संभाजी भिडे यांच्या पाठिंब्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं

"प्रकाश आंबेडकर सरकारचे जावई आहेत का? जातीयवादी दंगल घडवण्याचं कटकारस्थान उघड झालं पाहिजे. प्रकाश आंबेडकर हे डॉ. आंबेडकरांचे वारस आहेत. त्यांनी वारसदाराप्रमाणे वागावे. संभाजी भिडे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसावर त्यांनी आरोप करू नयेत. यापुढे पुन्हा आरोप केले तर जशास तसे उत्तर दिले जाईल," असं शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी सांगितलं.

भीमा कोरेगावमध्ये मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे यांच्या आई या सन्मान मोर्चात सहभागी झाल्या होत्या. "भीमा कोरेगावमध्ये माझ्या मुलाची हत्या होऊन तीन महिन्याचा कालावधी झाला. मात्र त्याचे आरोपी सापडले नाहीत. ही निषेधार्थ बाब आहे," अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)