#5मोठ्याबातम्या : संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्याची क्लीन चीट

फोटो स्रोत, Raju Sanadi and Twitter
आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :
1. संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी दिली क्लीन चिट
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. या संदर्भातील वृत्त लोकसत्तामध्ये देण्यात आलं आहे. संभाजी भिडे यांना दंगल घडवताना पाहिलं, अशी तक्रार एका महिलेनं पोलिसात दिली, पण पोलीस चौकशीत कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
'भीमा कोरेगावा'च्या घटनेला 200 वर्षं पूर्ण झाल्यानं आयोजित कार्यक्रमात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. एकबोटे यांना अटक करण्यात आली असून भिडे यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी मुंबईत सोमवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.
2. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग?
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. यासाठी विरोधकांची मंगळवारी बैठक झाली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रयत्नांना पाठिंबा दिल्यानं विरोधकांना बळ मिळाल्याचं या बातमीत म्हटलं आहे. महाअभियोगाचा मसुदा हा यापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी केलेल्या आरोपांवर आधारीत असेल, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
3. कर्नाटकमध्ये अमित शहांचा सेल्फ गोल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका पत्रकार परिषदेत चुकून त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांचा उल्लेख कर्नाटकातील सर्वांत भ्रष्ट असा केला. यावेळी येडियुरप्पा त्यांच्या शेजारीच बसले होते. नंतर त्यांनी चूक दुरुस्त करून 'सर्वांत भ्रष्ट सरकारसाठी स्पर्धा ठेवली तर त्यात सिद्धरामय्या सरकार प्रथम क्रमांक मिळवेल,' अशी टीका केली.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/NURPHOTO
टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी देण्यात आली आहे. शहा यांचा हा व्हीडिओ काँग्रेसने शेअर केला, असंही यात म्हटलं आहे.
तत्पूर्वी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी होईल.
4. 'केंब्रिज अॅनालिटिकाची ग्राहक काँग्रेस'
फेसबुकवरील डेटा लीक प्रकरणात वादग्रस्त ठरलेली डेटा अॅनालिस कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाच्या ग्राहकांच्या यादीत काँग्रेसचंही नाव असल्याचा खुलासा व्हिसल ब्लोअर क्रिस्तोफर वाईली यांनी केला आहे. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. या खुलाशानंतर भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे. क्रिस्तोफर वाईली यांनी ब्रिटिश संसदेच्या समितीसमोर हा खुलासा केला.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.
5. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग ताशी 80 किलोमीटर
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहिल्या लेनमध्ये कमी वेगानं वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली आहे. ही बातमी लोकसत्तामध्ये देण्यात आली आहे. या लेनमध्ये 80 किलोमीटर वेगानं वाहन चालवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








