सोशल : 'इंजिनिअरिंगच्या सबमिशनच्या विरोधात आंदोलन करणार'

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आजपासून दिल्लीत पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. या वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपाल हे दोन प्रमुख विषय असल्याचं अण्णांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"2011मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देश जागा झाला कारण त्यावेळी भ्रष्टाचार खूपच वाढलेला होता. महागाईचाही प्रश्न होता. हे सगळे लोकांच्या मनातले मुद्दे होते म्हणून सगळे रस्त्यावर उतरले," असं अण्णा हजारेंनी म्हटलं.

लोकपाल, शेतकरी आणि निवडणूक सुधारणा या मुद्द्यांवर मी सरकारकडे 10 मागण्या केल्या आहेत. लोकपाल कायद्यानुसार, लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नेमणुका व्हाव्यात ही त्यांची मुख्य मागणी आहे.

"शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी कृषिमूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्या, असं मी म्हटलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल यासारख्या तरतुदी मी सरकारला सुचवल्या आहेत," अण्णांनी सांगितलं.

सध्या राजधानी दिल्लीमध्ये आंदोलनांचा माहौल आहे. त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना विचारलं होतं की अण्णा तर आंदोलन करत आहेत. तुम्ही अण्णांच्या जागी असता तर कशासाठी आंदोलन केलं असतं. वाचकांच्या काही गंभीर तर काही गमतीशीर कमेंट आल्या. त्यातल्याच प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहोत.

"मी इंजिनिअरिंग सबमिशनच्या विरोधात आंदोलन केलं असतं. नुसतं लिहून घेतात, काही उपयोग नसतो. गाणी लिहिली तरी कोणालाच काही कळत नाही," असं म्हटलंय रोहन कुलकर्णी यांनी.

कृष्णा आयरे यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आंदोलन केलं असतं असं म्हटलं आहे. ते लिहितात, 'ग्रामपंचायतीच्या आठमुठ्या धोरणामुळे तसंच गावगुंडांच्या त्रासामुळे मी माझं गावाकडचं घर बांधू शकत नाही. मी अण्णांसारखं आंदोलन करू का?'

विलास झड यांनी आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलन केलं असतं असं म्हटलं आहे.

भूषण लोहार तर "अण्णा हजारेंनी आंदोलन करू नये म्हणून आंदोलन केलं असतं," अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहेत.

अनिकेत ठाकूर म्हणतात की, "समान नागरी कायदा आणण्यासाठी आंदोलन केलं असतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)