You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#5मोठ्याबातम्या : मंत्रालयात मारले सात दिवसांत तीन लाख उंदीर!
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :
1. मंत्रालयात मारले सात दिवसात तीन लाख उंदीर
महाराष्ट्राच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात उंदरांनी उच्छाद मांडला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील उंदीर मारण्याची महामोहीम हाती घेतली. त्याची सुरस कथा विधानसभेत ऐकवत राज्याचे माजी मंत्री आणि भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी या मोहिमेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाच, पण राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरेही विधानसभेच्या वेशीवर टांगल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने महत्त्वाच्या फायली खराब होतात, अशा तक्रारी आल्यानंतर 2016 साली उंदीर मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. उंदरांची मोजणी करण्यात आली, तेव्हा एकट्या मंत्रालयातच तीन लाख 16 हजार 400 उंदीर असल्याचे आढळले. यात काही उंदीर काळे, काही पांढरे, काही गलेलठ्ठ, काही म्हातारे, काही नुकतेच जन्मलेलेही होते.
त्यांचं निर्मूलन करण्याचं ठरलं आणि निविदा जारी करण्यात आली. अगोदर या कामासाठी सहा महिन्यांचं कंत्राट देण्याचं ठरलं होतं. पण या काळात पुन्हा नवे उंदीर जन्माला येतील आणि त्यांची संख्या वाढेल, असं लक्षात आल्यावर कंत्राटाचा कालावधी कमी करत करत उंदीर निर्मूलनाचं काम सात दिवसांत पूर्ण करण्याचं ठरलं, असं सांगत खडसे यांनी या मोहिमेची झाडाझडतीच सभागृहात घेतली.
खडसे म्हणाले, ''उंदीर निर्मूलनासाठी निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सात दिवसांत मंत्रालयातील तीन लाख 19 हजार 400 उंदीर मारण्यात आले. याचा अर्थ, प्रत्येक दिवसाला 45 हजार 628.57 उंदीर मारण्यात आले. म्हणजे प्रत्येक मिनिटाला 31.64 उंदरांचा खात्मा करण्यात आला. प्रत्येक दिवशी मारण्यात आलेल्या उंदरांचे वजन 9125.71 किलो एवढे, म्हणजे, एक ट्रक भरेल एवढे उंदीर एका दिवसाला मारण्यात आले.
2. फेसबुकसोबतच्या उपक्रमाचा फेरआढावा
डेटाच्या गैरवापराच्या घोळाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकसोबत सुरू असलेल्या उपक्रमाचा फेरआढावा घेणार असल्याची माहिती भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिली.
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, युवा मतदारांची नोंदणी करण्यासाठी फेसबुकची मदत घेण्यात येत आहे. या उपक्रमाबद्दल आयोगाच्या आगामी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. निवडणूक किंवा मतदान यांच्याशी निगडित सध्या सुरू असलेली चर्चा ही निश्चितच गंभीर गोष्ट आहे, असंही रावत म्हणाले.
दरम्यान, द हिंदूमधल्या वृत्तानुसार, आधारसाठी 1 जुलैपासून 'फेस आयडी'चा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती UIDAIनं सुप्रीम कोर्टात दिली आहे. ज्यांच्या बायोमॅट्रीक ओळखीचा प्रश्न निर्माण होतो, त्यांच्यासाठी हा पर्याय उपयोगी ठरणार आहे.
3. मोहम्मद शामीला BCCI कडून क्लीन चीट
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहानने गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल BCCI नेही घेतली आणि शामीला करारातूनही वगळलं होतं. पण आता भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर BCCI ने शामीला क्लीन चीट दिली आहे. त्याचबरोबर त्यावर करण्यात आलेले मॅच फिक्सिंगचे आरोपही फेटाळले आहेत. त्यामुळे आता शामीचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमतच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे, BCCI च्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीची तीन तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल BCCI ला सादर केला होता. या अहवालावर BCCIने शुक्रवारी आपला निर्णय जाहीर करणार आहे.
4. रामदेव बाबा राष्ट्रीय पुरुष -गिरीश बापट
योगगुरू रामदेव बाबा हे राष्ट्रीय पुरुष आहेत, असं विधान भाजप नेते आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे. काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी विधानपरिषदेत रामदेव बाबांवर टीका केल्यामुळे गिरीश बापट यांचा तिळपापड झाला.
एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.
विधानपरिषदेमध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार संजय दत्त यांनी रामदेव बाबा यांची 'पतंजली'ची उत्पादनं विकण्याच्या सरकारी निर्णयाचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा मांडताना दत्त यांनी रामदेव बाबांवर टीका करायला सुरुवात केली. ही टीका सहन न झाल्यामुळे गिरीश बापट बोलायला उभे राहिले आणि त्यांनी रामदेव बाबा यांच्या कर्तृत्वाचा गौरव करायला सुरुवात केली. "रामदेव बाबा यांनी योग प्रचाराचं मोठं कार्य केलं आहे. त्यांना त्यांच्या उद्योगासाठी मिळालेली जागा ही नियमाने देण्यात आली आहे," असं सांगताना रामदेव बाबा हे "राष्ट्रीय पुरुष" असल्याचं बापट सभागृहात म्हणाले.
5. वर्सोवा किनारी कासवांची पावलं...
वर्सोवा स्वच्छता मोहिमेचे खरे फळ मुंबईला गुरुवारी अवचितच मिळाले. या किनाऱ्याच्या वाळूमध्ये तब्बल वीस वर्षांनी चिमुकली पावले उमटली. ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने या वाळूवर विश्वास ठेवून इथे अंडी घातली आणि त्यातून 80 पिल्ले पाण्याकडे रवाना झाली.
महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीनुसार, ज्या किनाऱ्यावरील वाळू सतत स्थिती बदलत असते, त्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले अंडी घालतात. वर्सोव्याचा किनाराही अशाच किनाऱ्यांपैकी एक आहे. मात्र या किनाऱ्यावर कचऱ्यामुळे गेल्या २० वर्षांमध्ये ऑलिव्ह रिडले येऊ शकले नव्हते.
ऑलिव्ह रिडलेने या किनाऱ्यावर घर केल्याने हा किनारा हळूहळू पुन्हा नैसर्गिक रूप परत मिळवत असल्याची आशा निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया कासव अभ्यासक आणि पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी दिली.
गेल्या 127 आठवड्यांच्या मेहनतीनंतर ऑलिव्ह रिडलेनेही या स्वच्छतेवर विश्वास ठेवून इथे आपलं घरटं तयार केलं आणि गुरुवारी सकाळी या वाळूतील घरांमधून अचानक हालचाल दिसून आली. हा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करणे अशक्य आहे, असं मत वर्सोवा स्वच्छता मोहिमेचे संस्थापक आफरोज शाह यांनी नोंदवलं.
हे वाचलंत का?
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)