शिवजयंतीबद्दल अपशब्द : छिंदम प्रकरणात काय काय घडलं?

अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद शुक्रवारपासून महाराष्ट्रात उमटत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलं ते पाहू या.

शुक्रवारी सकाळी :

श्रीपाद छिंदम यांनी महापालिका कर्मचारी अशोक बिडवे यांना प्रभागातील कामासंदर्भात फोन लावला. या फोनवरचं कथित संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. (या संभाषणाची सत्यता आम्ही पडताळू शकत नाही.) यात छिंदम यांनी बिडवेंकडे माणसं न पाठवल्याबद्दल विचारणा केली. त्यावर बिडवे म्हणाले की, शिवजयंतीनंतर माणसं पाठवता येतील. त्यानंतर छिंदम यांनी रागात शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले.

बिडवे यांनी या संभाषणाची तक्रार कामगार युनियनकडे करत त्यांना संभाषण ऐकवलं. महापालिकेच्या इमारतीला टाळं ठोकत कर्मचारी संघटनेनं बंद पाळला.

शुक्रवारी दुपारी :

त्यानंतर काही वेळातच ही संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. लगेच तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली.

अहमदनगर शहरात तणाव निर्माण झाला. नगरसह महाराष्ट्रातील इतर शहरांमधून छिंदम यांचा निषेध सुरू झाला.

छत्रपती प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या खाजगी कार्यालयाची आणि घराची तोडफोड केली.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी छिंदम यांच्या विरोधात मोर्चे काढले. शिवसेनेने माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला. मनसेने छिंदम यांच्या पुतळ्याचं दहन केलं.

जमावाने छिंदम यांच्या महापालिकेतील दालनाला चपलांचा हार घातला. पालिकेतील सर्व नामफलक तोडून टाकले.

शुक्रवारी संध्याकाळी :

छिंदम हे भाजपचे नेते आहेत. या वादाल राजकीय वळण लागताच भाजपचे स्थानिक खासदार दिलीप गांधी, त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहून छिंदम भूमिगत झाले. त्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियासाठी एक व्हीडिओ मेसेज तयार केला होता. त्यात त्यांनी म्हटलं, "फोनवर माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले. मी सर्व महाराष्ट्राची माफी मागतो. सर्व समाजबांधव माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जो काही आक्रोष असेल तो सोसण्यास मी तयार आहे. कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली."

छिंदम यांच्या माफीने वातावरण शांत झालं नाही. खासदार गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. "शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याचा भाजप तीव्र निषेध करत आहे. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीबद्दल छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. तसंच उपमहापौरपदाचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त करण्यात आलं आहे," असं प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

अहमदनगर बार असोसिएशनने प्रसिद्धिपत्रक काढून छिंदम यांचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय जाहीर केला.

शुक्रवारी रात्री :

औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला.

छिंदम यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चार पथकं तयार केली होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोलापूर रोडवर शिराढोण परिसरात छिंदम यांना अटक करण्यात आली.

शनिवारी सकाळी :

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी छिंदम यांना सकाळी ८ वाजता न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने १ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. छिंदम यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे व धार्मिक भावना दुखावणे असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. यावेळी छिंदम यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी कोणी वकील नव्हता, असं लोकमतच्या वृत्तात म्हटलं आहे.

श्रीपाद छिंदम यांच्या नावाचे सिद्धी बागेतील बाकडे शिवसैनिकांनी तोडले. महापालिकेतील छिंदम यांचे नाव असलेले फलक फाडले.

शनिवारी दुपारी :

नगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही या घटनेचे पडसाद उमटत आहेत. काही बंद पाळून आणि मोर्चे काढून निषेध केला जात आहे.

या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे, असं पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलं आहे.

अहमदनगरचे पत्रकार सुधीर लंके यांनी याविषयी बोलताना सांगितलं की, "शिवाजी महाराजांविषयी अत्यंत अश्लील आणि गंभीर असं वक्तव्य केल्यानं लोक चिडले आहेत. त्याचीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटली. सर्वच राजकीय पक्षांनी विविध पातळीवरून आणि विविध मार्गांनी याचा निषेध नोंदवला आहे."

(संकलन - निरंजन छानवाल)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)