#५मोठ्याबातम्या : 'मुकेश अंबानी भागवू शकतात 20 दिवस भारत सरकारचा खर्च'

फोटो स्रोत, Getty Images
आजच्या विविध वृत्तपत्रांमध्ये आणि संकेतस्थळांवर आलेल्या ५ मोठ्या बातम्या पुढीलप्रमाणे.
१. मुकेश अंबानी भारत सरकारचा खर्च वीस दिवस चालवू शकतात!
सरकारकडील पैसा काही कारणास्तव तात्पुरता संपला, तर श्रीमंत व्यक्तींची संपत्ती सरकारला दान केली तर किती काळ सरकार चालू शकेल, असा एक अंदाज घेण्यात आला आहे, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक अहवाल आणि नाणेनिधीचा सरकारी खर्चाचा अहवाल यांचा आधार घेऊन.
लोकसत्तामधल्या वृत्तानुसार, भारताचे श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती ४०.३ अब्ज डॉलर्स असून ते वीस दिवस भारत सरकारचा खर्च चालवू शकतात.
अमेरिकेचे अब्जाधीश जेफ बेझोस हे तेथील सरकारचा खर्च पाच दिवस चालवू शकतात. ब्रिटनचे ह्यू ग्रॉसव्हेनॉर आणि जर्मनीचे डाएटर श्वार्टझ हे साधारण तेवढाच काळ त्यांच्या संपत्तीवर सरकारचा खर्च चालवू शकतात.
जपान, पोलंड, अमेरिका आणि चीन या देशांचा खर्च जास्त आहे. चीनचे श्रीमंत आणि जगातील सोळाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले जॅक मा यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर्स आहे. ते चीनचे सरकार केवळ चार दिवस चालवू शकतात.
2. 'सोहराबुद्दीन खटल्यात न्यायाशी प्रतारणा'
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात अनेक अनियमितता आहेत. त्यामुळे या प्रकरणात न्यायाशीच प्रतारणा केली जात असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांनी व्यक्त केलं आहे.

इंडियन एक्स्प्रेस मध्ये आलेल्या वृत्तानुसार, ठिपसे म्हणाले की, "सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्याची हाताळणी ज्या प्रकारे केली जात आहे, आणि त्यात अनेक बड्या आरोपींना ज्याप्रकारे मुक्त केलं जात आहे, त्यावरून संशयाला जागा आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं स्वत: होऊन कृती करून या खटल्याच्या फेरविचाराची मागणी केली पाहिजे."
या अनियमिततांमुळे न्यायाशीच प्रतारणा सुरू आहे, असं मत त्यांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत मांडलं.
"या प्रकरणातील बऱ्याच आरोपींना अनेक वर्षांसाठी जामीन नाकारण्यात आला. मात्र काही वर्षांनी या आरोपींविरोधात प्राथमिकदृष्ट्या कोणताही तक्रार नसल्याचं कोर्टानंच म्हटलं. ही बाब काहीशी असामान्य वाटते. यात मोठ्या अधिकाऱ्यांना यातून सहसलामत सुटता आलं. मात्र, त्यांच्यासारखेच आरोप असणाऱ्या कनिष्ठ आरोपींची सुटका झाली नाही," असंही ठिपसे म्हणाल्याचं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं.
3. गारपीटग्रस्तांना आज मदत जाहीर होणार?
रविवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील सव्वा लाख हेक्टर शेती बाधित झाली असून गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामातील फळांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
गारपिटीमुळे तीन मृत्यूही झाले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचा निर्णय घेतला जाणार आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना ही माहिती दिली.

फोटो स्रोत, SANDIP SALAVE
दरम्यान, याच वृत्तापत्रातील दुसऱ्या एका बातमीनुसार, बीड जिल्ह्यांत २४ तासात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. दोन्ही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याचं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.
4. 40 टक्के शेतकऱ्यांचे ऋणमाफी अर्ज बाद
गेल्या वर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उग्र आंदोलन हाती घेतलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने बळीराजासाठी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती.
मात्र तांत्रिक अडचणी, तसेच शेतकऱ्यांनी सादर केलेली माहिती आणि सरकारकडील माहिती यांतील तफावत आदी कारणांमुळे अर्जदार शेतकऱ्यांपैकी सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांचे अर्ज आजवर बाद झाल्याचं आकडेवारीवरून उघड झालं आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.
5. 'पाकिस्तान नवी अण्वस्त्र निर्माण करत आहे'
टाइम्स ऑफ इंडियामधल्या वृत्तानुसार, पाकिस्तान नव्या प्रकारची अण्वस्त्र निर्माण करत असून त्याच्या जोडीला छोट्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचीही निर्मिती करत आहे. यामुळे दक्षिया आशियाई क्षेत्रात तणाव वाढण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे संचालक डॅन कोट्स म्हणाले की, "समुद्रातून मारा करू शकणारी, तसंच हवाई हल्ला करण्याची क्षमता असलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा यात समावेश आहे."
जगभरातील संभाव्य धोक्यांबाबत अमेरिकी सिनेटच्या गुप्तचर विषयक समितीच्या बैठकीत चर्चा करताना कोट्स यांनी ही माहिती दिली.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








