You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सप्तखंजिरी वाजवून गाडगेबाबांचा संदेश पोहोचवणारे विदर्भातले सत्यपाल
- Author, अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठीसाठी
ग्रामस्वच्छतेचा गाडगेबाबांचा विचार पुढे नेण्याचं काम अकोला जिल्ह्यातले सत्यपाल चिंचोलीकर करत आहेत आणि तेही सप्तखंजिरीच्या माध्यमातून.
खंजिरी हे चर्मवाद्य राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज वाजवत असत. त्याच वाद्यांच्या साथीत गाडगेबाबांची भजनं सादर करून सत्यपाल चिंचोलीकर ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. या परिसरात लोक त्यांना सत्यपाल महाराज म्हणून ओळखतात.
आज स्वच्छतेचं अभियान राबवून केंद्र पातळीवरून हा विषय प्राधान्यक्रमावर घेतला गेला आहे. हे काम संत गाडगेबाबा यांनी ग्रामीण भागात शतकापूर्वी करुन दाखवलं होते. आता गाडगे महारांजा हाच संदेश सत्यपाल चिंचोलीकर विदर्भातल्या गावागावांत सप्तखंजिरीच्या साथीने पोहोचवत आहेत.
तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित झालेले चिंचोलीकर हातात कधी झाडू तर कधी खंजिरी घेऊन समाज प्रबोधन करतात.
अकोला जिल्ह्यातील अकोट गावात सत्यपाल चिंचोलीकर राहतात. आजपर्यंत 14000हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तन करुन स्वच्छता, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, जातिभेद, अंधश्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, हगणदारी मुक्त गाव, स्त्री भ्रूण हत्या या विषयी जागरुकता पसरवली आहे, असा त्यांचा दावा आहे.
अस्वच्छता दिसेल तिथे सत्यपाल महाराज स्वतःच हातात झाड़ू घेतात. कधी गावच्या पारावर तर कधी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी महाराज आपल्या हातातील खंजिरी वाजवून लोकांना जमा करतात आणि प्रबोधनपर कीर्तन सुरू करतात, असं परिसरातले लोक सांगतात.
"सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असं सत्यापाल चिंचोलीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. ग्रामीण आदिवासी भागातील अशिक्षित जनतेला संगीत आणि कलेची जोड देत मनोरंजनातून प्रबोधन करायचा मानस असल्याचं ते म्हणाले.
1952 साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात चिंचोलीकरांचा जन्म झाला. सततच्या गरिबीला तोंड देण्यासाठी वडील कपडे शिवण्याचा व्यवसाय करत.
"लहानपणीच मला भजनांची गोडी लागली. मग कधी तुकडोजी महाराजांची तर कधी गाडगे बाबांची कीर्तनं ऐकत मी मोठा झालो. वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली," ते सांगतात.
मग भजनातून सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडायचे. यातच त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील छोट्याशा चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच 7 खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली.
भजनाला गर्दी जमायला लागली आणि गाडगे बाबांचा संदेश घराघरात पोहोचायला लागला. आतापर्यंत देशभरात 14000 कीर्तनाचे कार्यक्रम घेतले असून ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जागरुकता पसरवली आहे, असं ते पुढं म्हणाले.
"परिसर स्वच्छ करूनच माझा दिवस सुरू होतो. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावागावात जाऊन कीर्तनं करतो. आज गेली 52 वर्षं असं करत आहे," असंही त्यांनी सांगितलं.
त्यांना महाराष्ट्र शासनाचा 'दलित मित्र' आणि 'समाजप्रबोधनकार' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)