You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जर्मन बेकरी स्फोटात पाय मोडला तरी आम्रपालीने केलं शिखर सर
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
आज जर्मन बेकरी स्फोटाला 11 वर्षं पूर्ण झाली आहेत. पुण्याच्या विश्रांतवाडीत राहणाऱ्या आम्रपाली चव्हाण त्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉफी पिण्यासाठी जर्मन बेकरीत गेल्या, तेव्हा आपलं आयुष्य बदलून जाणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती.
नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलेल्या आम्रपाली तेव्हा नोकरी सोडून पुढच्या शिक्षणाची तयारी करत होत्या.
13 फेब्रुवारीच्या त्या संध्याकाळी त्या जर्मन बेकरीमध्ये आपल्या मित्र मैत्रिणींना भेटणार होत्या.
पण त्याच वेळी जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि एरवी शांत असणारं पुणे शहर हादरून गेलं.
त्या स्फोटात पाच परदेशी नागरिकांसह सतरा जणांचा जीव गेला तर 64 जण जखमी झाले होते, त्यात आम्रपालीचाही समावेश होता.
ती संध्याकाळ...
आठ वर्षांनंतरही आम्रपालीला ती संध्याकाळ अगदी स्पष्ट आठवते.
"व्हॅलेन्टाईन डेचा आदला दिवस असल्यानं तेव्हा जर्मन बेकरीत बरीच गर्दी होती. आत प्रवेश मिळण्यासाठी आणि जागा मिळण्यासाठीही वेळ लागला. माझा मित्र ऑर्डर देण्यासाठी किचन काऊंटरजवळ गेला होता. मी घड्याळात वेळ पाहात होते तेव्हाच मोठा स्फोट झाला," त्या सांगत होत्या.
स्फोटाच्या धक्क्यानं खुर्चीत बसलेल्या आम्रपाली कोसळल्या. "मी काही काळ बेशुद्ध होते. भानावर आले तेव्हाही कानात तो आवाज घुमत होता. सुरुवातीला मी कुठे आहे, काय झालंय हेच समजत नव्हतं," त्या म्हणाल्या.
त्यांना हळूहळू आवाज ऐकू येऊ लागले, तेव्हा आसपास भयाण चित्र दिसत होतं.
"मी ढिगाऱ्याखाली अडकले होते. माझ्या आसपासची माणसं मदतीसाठी हाका मारत होती. स्फोटानं छिन्नविछिन्न झालेली शरीरं, रक्त आणि मांसांचं थारोळं, पेट घेतल्यावर आकांत करणारी आणि प्राण सोडणारी माणसं.. मी हे सगळं पाहिलं आहे," त्या दिवसाची आठवणीनं त्यांचं मन आजही शहारतं.
आम्रपाली हे सगळं सांगतात तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. "स्फोट होण्याआधी काही वेळापूर्वी माझ्या शेजारी बसलेली एक मुलगी आगीनं वेढली होती. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि माझ्याकडे मदत मागणारा तिचा मित्र हे दृश्य आजही मी विसरू शकणार नाही. मला तेव्हा अगदी असहाय्य वाटलं होतं."
त्या परिस्थितीही आम्रपालीनी स्वतःला सावरलं.
"वैद्यकीय प्रशिक्षणादरम्यान आम्हाला सांगितलं होतं की अशा परिस्थितीत आपल्या मेंदूवर ताबा ठेवायचा. झोप येऊ द्यायची नाही, रक्त वगैरे पाहून घाबरून जायचं नाही. मी तेच केलं," त्या सांगतात.
आम्रपालींनी स्वतःला ढिगाऱ्यातून मोकळं करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पायाचं हाड मोडलं असल्याचं आम्रपालींच्या लक्षात आलं.
मनोधैर्याची परीक्षा
आम्रपाली सांगतात, "काही वेळानंतर लोक मदतीसाठी आले, तेव्हा मीच जवळ कुठलं हॉस्पिटल आहे हे सांगितलं. त्यांनी आम्हाला चार जणांना एकाच वेळी रिक्षातून हॉस्पिटलला नेलं."
आम्रपालीच्या डाव्या पायाला खूपच गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या डाव्या मांडीचं हाड पूर्णपणे नष्टच झालं होतं. आम्रपालीचा चेहरा आणि हातांचे तळवेही जळाले होते.
तब्बल दोन महिने आम्रपाली हॉस्पिटलमध्ये होत्या. वर्षभरात त्यांच्या पायावर पाच मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दरम्यान पायाला गँगरिनही झालं पण आम्रपालीनं हार मानली नाही.
"मी डॉक्टरांना विनंती केली. काही झालं तरी माझा पाय कापू नका, मी सगळं सहन करेन," त्या पुढे सांगत होत्या.
स्फोटात भाजल्यामुळं त्वचेला झालेल्या जखमांवर त्यांना 200हून अधिकवेळा नॉनसर्जिकल ट्रीटमेंट घ्यावी लागली. हे उपचार आणि आम्रपालींचा संघर्ष अजूनही संपलेला नाही.
न संपलेला संघर्ष
शरीरावरच्या जखमा आणि मनाला झालेल्या वेदनांपेक्षा समाजाकडून मिळालेली वागणूक आम्रपालीसाठी जास्त क्लेशदायक होती.
"पोलिसांनी त्या दिवशी बेकरीमध्ये आलेल्या प्रत्येकाची चौकशी केली, फोन रेकॉर्ड्स तपासले. त्या काळात आम्हीच काही गुन्हा केला आहे, अशा नजरेनं लोक पाहायचे. माझ्या कुटुंबीयांनाही बरंच सहन करावं लागलं," त्या सांगतात.
"उपचारांसाठी बराच खर्च होत होता. राजकारणी मंडळींनी पुढे येऊन मदतीची आश्वासनं तर दिली, पण हाती फार काही पडलं नाही. सरकारनं जाहीर केलेली मदत मिळवण्यासाठीही खेटे घालावे लागले," त्या पुढे म्हणाल्या.
"पैशाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी एक माणूस म्हणून मला मिळालेली वागणूक विसरता येणार नाही. मला साथ देण्याऐवजी, आता या मुलीचं पुढे काय होणार, तिच्याशी कोण लग्न करणार असे प्रश्न कळत नकळत विचारले जात होते," त्या म्हणाल्या.
स्फोटातील जखमांमुळं आम्रपालीला अपंगत्व आलं, पण त्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. एका नव्या ध्येयानं आम्रपालीचं आयुष्य उजळून निघालं.
"त्या दिवशी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असतानाच मी प्रार्थना केली होती. यातून जगले वाचले तर पुढचं आयुष्य समाजासाठी खर्च करणार," त्या म्हणाल्या.
नवा ध्यास
आम्रपाली यांनी वचन खरं करण्याचा ध्यास घेतला. नेहरू युवा केंद्राच्या यशवंत वानखेडकर यांनी त्यांच्या प्रयत्नांना नवी दिशा दिली.
आम्रपालीनं आज Peace Association ही स्वतःची एनजीओ काढली आहे. ग्रामीण भागात विशेषतः महिलां आणि तरुणांना जगण्याची उमेद देण्यासाठी त्या काम करतात आहे.
"गावागावांतील शाळा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधतो. त्यांना केवळ प्रेरणा देऊनच थांबत नाही, तर शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देतो, समुपदेशन आणि उदरनिर्वाहाचं साधन मिळवून देण्याचाही प्रयत्न करतो."
"महिला आणि बालकल्याण विभागासोबत आम्ही अंगणवाडीच्या महिलांसाठीही काम करतो आहोत," त्या सांगतात.
फक्त बोलण्यापेक्षा आम्रपालीनं काही करून दाखवण्याचाही निर्धार केला आणि त्या गिर्यारोहणाकडे वळल्या. 2015ला त्यांनी लेह लडाखचा दौरा केला. इथलं स्टोक कांगरी हे शिखर 20,187 फूट (6,153 मीटर) उंचीचं आहे. या शिखरावर तिनं 16000 फूट इतक्या उंचीपर्यंत चढाई केली.
"स्फोट घडवणाऱ्यांना हेच माझं उत्तर आहे. त्यांनी काही केलं, पण आम्ही हरणाऱ्यांपैकी नाही. आम्हीही लढू शकतो," त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आशावाद
इतकी वर्षं झाली तरी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील बळींचे कुटुंबीय आणि त्यातून बचावलेल्या व्यक्तींची लढाईही अजून संपलेली नाही.
"अशी घटना घडल्यावर कुणालाही वाटतंच की आमच्यासोबत ज्यांनी हे सारं केलं त्यांना तशीच शिक्षा व्हायला हवी. पण एखाद्या अतिरेक्याला फाशी देऊन त्यांची शरीरं फक्त आपण नष्ट करतो. त्यांच्या विचारांचं काय?"
"प्रत्येक लढाई तलवारींनी किंवा बंदूकांनी लढली जात नाही. मलाला युसूफजाई एकदा म्हणाली होती, बंदूकीची गोळी दहशतवाद्यांना मारू शकते, पण शिक्षणानं दहशतवादच नष्ट करता येतो."
"माझ्या मनात कुणाविषयी कुठलाही राग नाही, पण मी शांतही बसणार नाही. माझी लढाई सुरूच राहील."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)