#U19WorldCup : द्रविड गुरुजींनी असे घडवले चॅम्पियन्स!

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
मुंबईच्या पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा (19 वर्षांखालील) संघानं ICC U19 विश्वचषकावर नाव कोरलं. विश्वविजेते होण्याचा हा प्रवास अवघड होता. या पंधरा शिलेदारांना चॅम्पियन्स घडवण्यात अनेकांनी योगदान दिलं. या एकत्रित प्रयत्नांचा घेतलेला वेध.
न्यूझीलंडहून परतलेल्या या विजयी संघाचं मुंबईत जोरदार स्वागत झालं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रशिक्षक राहुल द्रविडनं सुयोग्य नियोजन आणि नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष मैदानावर झालेली व्यूहरचना याला विजयाचं क्रेडिट दिलं आहे.
द्रविड गुरुजी
भारताचा माजी कर्णधार आणि तंत्रशुद्ध कौशल्यासह फलंदाजीतला 'द वॉल' अर्थात राहुल द्रविड भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक. क्रिकेटला 'जंटलमन्स गेम' म्हटलं जातं. जंटलमन्स बिरुदावली जगणारा क्रिकेटचा सच्चा निष्ठावान सेवक.
क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही वर्तन कसं असावं याचा वस्तुपाठ द्रविडच्या उदाहरणानेच दिला जातो. खेळातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर द्रविडसमोर असंख्य पर्याय होते.
कॉमेंटेटर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. खेळाचे बारकावे जाणणाऱ्या द्रविडकडून कॉमेंट्री ऐकणं हा आशयघन अनुभव असे. मात्र यात द्रविडचं मन रमेना. क्रिकेटमधल्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी काहीतरी करायला हवं अशी साद मन घालत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
द्रविडचा अनुभव आणि कार्यपद्धती यांचा उपयोग युवा खेळाडूंना होऊ शकतो हे लक्षात घेऊन बीसीसीआयने द्रविडची भारतीय युवा (19 वर्षांखालील) आणि भारतीय 'अ' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.
क्रिकेट धमन्यांमध्येच असल्यानं द्रविडला हे काम आवडणारं होतं. असंख्य मॅचेस, फुटेज पाहून भारताचं प्रतिनिधित्व करू शकतील असे संभाव्य खेळाडू द्रविडने निवडले.
त्यांना एकत्र केल्यावर क्रिकेटची कौशल्यं घोटीव करणं आणि फिटनेस यावर काम सुरू झालं. आपल्या व्यक्तिमत्वाचं मुलांवर दडपण येऊ नये यासाठी द्रविडने विशेष काळजी घेतली.
क्रिकेटपुरतं मर्यादित न राहता तो त्यांचा लाइफ कोच झाला. हे काम सुरू असतानाच द्रविड इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचं प्रशिक्षकपदही सांभाळत होता.
युवा संघाचं प्रशिक्षकपद आणि आयपीएल संघाचं प्रशिक्षकपद अशा दुहेरी भूमिकेत असलेला द्रविड 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट'च्या वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. त्याच्यावर तसे आरोपही झाले.

फोटो स्रोत, Getty Images
कॉमेंट्री आणि आयपीएल प्रशिक्षकपद या दोन्ही प्रचंड पैसा मिळवून देणाऱ्या गोष्टींचा त्याग करत द्रविडने नवी पिढी घडवण्याच्या कामाला प्राधान्य दिलं. युवा संघाच्या विश्वविजेतेपदाचा पाया द्रविडच्या त्या निर्णयानं घातला गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
न्यूझीलंडला वेळेआधी प्रयाण; द्रविडचा मास्टरस्ट्रोक
प्रचंड थंडी, बोचरे वारे, वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्या अशा वातावरणासाठी न्यूझीलंड ओळखलं जातं. न्यूझीलंडमध्ये खेळताना भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडते.
विश्वचषकात चांगलं प्रदर्शन करण्यासाठी वातावरणाशी जुळवून घेणं अत्यावश्यक होतं. यासाठी निर्धारित वेळेच्या दोन आठवडे आधीच न्यूझीलंडमध्ये पोहोचणं योग्य ठरेल असं द्रविडला वाटलं. त्याने बीसीसीआयपुढे म्हणणं मांडलं. त्यांनीही होकार दिला आणि बाकी संघांच्या तुलनेत भारतीय संघ दोन आठवडे आधीच न्यूझीलंडला रवाना झाला.
घरच्या मैदानावर खेळावं त्या सहजतेनं भारतीय खेळाडू न्यूझीलंडमध्ये खेळताना दिसले. न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा अनुभव द्रविडकडे होता. या अनुभवातूनच न्यूझीलंडला लवकर जाण्य़ाची सूचना त्याने केली होती. द्रविडचा हा मास्टरस्ट्रोक निर्णायक ठरला.
बीसीसीआयचं शिस्तबद्ध नियोजन
युवा विश्वचषकासाठी बीसीसीआयनं काटेकोर आखणी केली होती. द्रविडच्या बरोबरीनं एक मोठ्ठा सपोर्ट स्टाफ खेळाडूंसाठी कार्यरत होता. वरिष्ठ संघ चांगला होण्यासाठी बेंचस्ट्रेंथ अर्थात राखीव खेळाडूंची फळी मोठी असणं आवश्यक आहे.
हे जाणून बीसीसीआयने U19 वर्ल्डकपसाठी नियोजन केलं होतं. वेंकटेश प्रसादच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया ज्युनियर नॅशनल कमिटीनं देशभरातल्या गुणवंतांना हेरण्याचं काम केलं.

फोटो स्रोत, Getty Images
डब्ल्यू.एस.रामन आणि पारस म्हांब्रे या द्रविडच्या सहकाऱ्यांनी मुलांना योग्य दिशा दाखवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. फिल्डिंग कोच अभय शर्मा, फिजिओ, ट्रेनर यांनीही आपल्या जबाबदारीला न्याय दिला.
विश्वचषकापूर्वी बीसीसीआयने भारतात 19 वर्षांखालील चॅलेंजर स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमुळे सगळ्या खेळाडूंना एकत्रित खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला. या सगळ्या घटकांच्या परिश्रमाचं फळ म्हणजे विश्वविजेतेपद आहे.
'आयपीएल दरवर्षी होतं, विश्वचषकाची संधी एकदाच मिळते'
विश्वचषकादरम्यान इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या अकराव्या हंगामासाठी लिलाव झाला. दोन दिवसांच्या लिलावावेळी भारतीय संघासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं.
लिलावात U19 संघाचा भाग असलेल्या खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावली. ही कोटीच्या कोटी उड्डाणं, प्रतिक्रियांसाठी फोनकॉल्स या सगळ्याने खेळाडू विचलित होण्याची शक्यता होती.
लिलावाच्या पूर्वसंध्येला द्रविडनं मुलांना कानमंत्र दिला- 'आयपीएलचा लिलाव दरवर्षी होतो, होत राहील. मात्र विश्वचषकात देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दुर्मीळतेनं मिळते. कदाचित पुन्हा ही संधी मिळणारही नाही'. द्रविडच्या शब्दांनी अपेक्षित परिणाम झाला आणि संघानं पाकिस्तानविरुद्धचा सामना पूर्ण गांभीर्याने खेळला.
गोलंदाजीचा गड
फलंदाजी हे भारतीय संघाचं बलस्थान असतं. या विश्वचषकातही भारतीय फलंदाजांनी सुरेख प्रदर्शन केलं. मात्र त्यांच्या बरोबरीने गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना नाकी दम आणला.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना वेगवान गोलंदाजीचा सामना करण्याची सवय असते. मात्र कमलेश नागरकोटीचा सामना करणं अवघड असल्याचं प्रतिस्पर्धी फलंदाजांनी मान्य केलं.

फोटो स्रोत, Getty Images
कमलेशला शिवम मावी, अनुकूल रॉय, शिवा सिंग, इशान पोरेल यांनी तोलामोलाची साथ दिली. धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्या त्यांनी चोख सांभाळत प्रतिस्पर्ध्यांवर दडपण कायम राखलं.
जिंकण्यातलं सातत्य
जिंकण्यातलं सातत्य ही कुठल्याही मोठ्या संघाची ओळख असते. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
मोठी धावसंख्या उभारून तिचा यशस्वी बचाव करणं असो किंवा मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणं असो- वेगवेगळ्या परिस्थितीत, भिन्न समीकरणं अंगीकारत भारतीय संघाने विजयी सातत्य कायम राखलं. मुख्य म्हणजे भारतीय संघ कुणा एका खेळाडूवर अवलंबून होता.
शुभमनची भरारी
पंजाबमधल्या छोट्याशा गावातला शुभमन गिलने अख्ख्या स्पर्धेत सूत्रधाराची भूमिका निभावली. प्रत्येक सामन्यात धावांची टांकसाळ उघडत त्याने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
'मॅन ऑफ द सीरिज'चा मिळालेला पुरस्कार त्याच्या अविरत कष्टांचं द्योतक आहे. क्रिकेटसाठी गाव सोडून मोहाली, चंदीगढ इथं येऊन स्थायिक झालेल्या शुभमनची प्रत्येक टप्प्यावरची मेहनत सार्थकी लागली आहे. शुभमनचा फॉर्म भारतीय संघासाठी शुभ ठरला कारण अडचणीच्या वेळी त्यानं तारलं.
पृथ्वीचं नेतृत्व
स्वत:च्या कामगिरीबरोबरंच कर्णधारावर अंतिम संघ निवडणं, क्षेत्ररक्षण सजवणं-योग्य वेळी आवश्यक बदल करणं, गोलंदाजीत करायचे बदल, मीडिया कमिटमेंट्स अशा जबाबदाऱ्या असतात.

फोटो स्रोत, Getty Images
देशाच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंची एकत्र मोट बांधण्याची अवघड जबाबदारी पृथ्वीच्या खांद्यांवर होती. त्याने या बहुविध जबाबदाऱ्यांना न्याय देतानाच फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघावर त्याची पकड आहे असं स्पष्ट जाणवत होतं.
एकीचं बळ
संघातले बहुतांश खेळाडू छोट्या गावांचं, शहरांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. भारतीय युवा संघाचा टप्पा गाठण्यापर्यंतचा त्यांचा विलक्षण प्रेरणादायी आहे.
काहींच्या कुटुंबीयांनी स्वत:चं करिअर बाजूला ठेवलं आहे. काहींच्या पालकांनी केवळ मुलाच्या प्रगतीसाठी परक्या शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेकांच्या पालकांनी पोटाला चिमटा काढून आपल्या मुलाची क्रिकेटची आवड जोपासली आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या विविध भागातून आलेली ही मुलं एकमेकांच्या खेळाचा आनंद घेताना दिसत होती.

फोटो स्रोत, Getty Images
सहकाऱ्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाची त्यांना जाणीव आहे हे उमगत होतं. काही दिवसांतच ते एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. कदाचित संघातल्या एका जागेसाठी ते दावेदारही असू शकतात. पण आता सहकाऱ्याचं कौतुक करण्यात कोणतीही खळखळ दिसत नव्हती.
भारतीय संघ
पृथ्वी शॉ (कर्णधार)
शुभमन गिल
हार्विक देसाई
आर्यन जुयाल
मनजोत कालरा
शिवम मावी
कमलेश नागरकोटी
रियान पराग
इशान पोरेल
हिमांशु राणा
अनुकूल रॉय
अभिषेक शर्मा
अर्शदीप सिंग
शिवा सिंग
आदित्य ठाकरे
पंकज यादव
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








