#5मोठ्याबातम्या : 'त्यावेळी' मी पद्मावत पाहत होतो - एकनाथ खडसे

पाहूयात आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. 'त्यावेळी' मी पद्मावत पाहत होतो- एकनाथ खडसे

भाजप नेते एकनाथ खडसे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असा दावा 'सामना'नं केला होता. त्यावेळी आपण पद्मावत पाहत होतो असं खडसे म्हणाल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विमानतळावर भेट झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे. आम्ही एकाच विमानाने जात होतो. जळगाव विमानतळावर वेटिंग रुममध्ये माझी आणि काँग्रेस नेते चव्हाण यांची भेट झाली असं ते म्हणाले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं त्यांनी म्हटलं.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, "सामना शोधपत्रकारितेत कमी पडत आहे, राहुल गांधींसोबत मी भेट घेतल्याच्या बातम्या आल्या, त्यावेळी मी दिल्लीत कुटुंबासोबत 'पद्मावत' पाहत होतो," असं एकनाथ खडसे म्हणाले.

2. देशात आणीबाणी सदृश्य स्थिती - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत आहे पण हे बहुमत त्यांनी वाया घालवलं. तसेच, देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असं मत राज ठाकरे यांनी सातारा येथे झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात व्यक्त केलं आहे.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे थापाडय़ांचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दररोज नवनव्या थापा मारत असतात, असंही ते म्हणाले.

राजीव गांधींना १९८४ ला बहुमत मिळाले होते यानंतर तीस वर्षांनी नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले. मात्र त्यांनी थापा मारण्याची मर्दुमकी दाखवत आणि सर्वसामान्यांचंच जगण असहाय्य करून देशात आणीबाणी सदृश परिस्थिती आणली आहे, असं मत ठाकरे यांनी मांडलं.

3. सुप्रीम कोर्टाचे रोस्टर सार्वजनिक

20 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत घेऊन रोस्टरमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर कार्यप्रणालीत बदल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाचं रोस्टर हे सार्वजनिक करण्यात येणार आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

कोणत्या खंडपीठावर कुणाची नियुक्ती होणार ही माहिती सर्वांसाठी खुली राहणार आहे.

रोस्टरची निर्मिती करताना सरन्यायाधीश आपल्या मर्जीप्रमाणे वागत आहेत असा आरोप न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा बदल झाला आहे.

4. शिष्यांचे निर्बिजीकरण: राम रहीमवर चार्जशीट दाखल

बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्यावर सीबीआयने शिष्यांच्या निर्बिजीकरणाप्रकरणी चार्जशीट दाखल केलं आहे. त्यांच्याबरोबर डॉ. पंकज गर्ग आणि डॉ. एम. पी. सिंग यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिष्यांचं निर्बिजीकरण करणे, घातक हत्यारांचा वापर, कट रचणे तसंच फसवणूक करणं आदी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

5. संघात उच्चपदावर महिलांना का स्थान नाही?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करत नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठ्या पदावर स्त्रिया का नाहीत असा प्रश्न त्यांनी विचारला, असं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

ईशान्य भारतीय राज्यांमध्ये भाजप आणि संघ परिवार स्थानिकांची संस्कृती, भाषा आणि राहणीमान यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

तुम्ही संघामध्ये महिलांना कधी उच्च पदावर पाहिले आहे का? महात्मा गांधी यांची प्रतिमा पाहिल्यास तुम्हाला त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला महिला दिसतील; पण सरसंघचालक मोहन भागवत हे एकटे तरी असतात किंवा त्यांच्याभोवती पुरुषांचा तरी गराडा असतो, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे एका कार्यक्रमात बोलताना केली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)