अर्जुन सचिन तेंडुलकरवर वडिलांचं नाव पुढे नेण्याचं दडपण आहे का?

फोटो स्रोत, ABC
अर्जुन तेंडुलकरसाठी क्रिकेटविश्वात नाव कमावणं एखाद्या बाउन्सर बॉलवर फटका लगावण्यासारखं असावं. कारण त्याला केवळ त्या बॉलवर आऊट न होण्याचंच नव्हे तर त्यावर रन काढण्याचंही दडपण असेल.
स्वतःच करिअर घडवण्यासाठी भारतातल्या एका प्रसिद्ध फलंदाजाच्या मुलासाठी कुठला मार्ग सर्वाधिक चांगला असेल?
गोलंदाज बनणं ही कदाचित योग्य सुरुवात असेल.
सचिन तेंडुलकर हा भारतातला सर्वाधिक आदरणीय खेळाडू आहे. त्याला क्रिकेटप्रेमी देवाची उपमा देतात. कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांमध्ये त्यानं सर्वाधिक धावा काढल्या आहेत, एकूण 34,357 आंतरराष्ट्रीय धावा त्याच्या नावावर आहेत.
जिथं कित्येक पिढ्यांपासून क्रिकेट हा धर्म मानला जातो, त्या देशात सचिनच्या प्रत्येक निर्णयाचं या देशानं कौतुक केलं.
मग 'सचिनचा मुलगा' म्हणून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट खेळणं त्याच्यासाठी एक मोठा सामनाच असणार आहे. आणि 18 वर्षांचा अर्जुन तेंडुलकर हा त्याच्या खास शैलीत हे सर्व प्रेशर हाताळत आहे.
सचिनच्या तुलनेत उंच आणि सडपातळ दिसणाऱ्या अर्जुनला वडिलांचं नावं पुढं नेण्याविषयी दडपण येतं का? "मी त्याचं दडपण घेत नाही," असं तो म्हणाला.
"जेव्हा मी गोलंदाजी करतो तेव्हा मी प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर टाकण्याचा विचार करतो. जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा मी फक्त माझे उत्तम शॉट्स खेळतो आणि कुठल्या बॉलचा सामना करायचा किंवा नाही हे ठरवतो", अर्जुन बीबीसीशी बोलताना म्हणाला.

फोटो स्रोत, Getty Images
वडिलांची ओळख ही सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्यानं गोलंदाज होण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतलेला नव्हता, असंही ज्युनियर तेंडुलकर याने 'बीबीसी स्टम्पड'शी बोलताना सांगितलं.
"मी उंचीनं वाढलो," असं तो स्पष्ट करतो, "आणि लहानपणी मला वेगवान गोलंदाजी आवडायची. म्हणून मी ठरवलं की वेगवान गोलंदाज व्हायचं. कारण भारतात त्यांची संख्या कमी आहे."
तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाजही आहे. त्यामुळं वडिलांच्या उच्चप्रतीच्या कव्हर ड्राइव्हशी तुलना करण्यापेक्षा क्रिकेट चाहत्यांना त्याच्यात मिशेल जॉन्सन आणि मिशेल स्टार्कची झलक दिसेल. कारण ते अर्जुनच्या आदर्श खेळांडूंपैकी आहेत.
या दोन डावखुऱ्या वेगवान ऑस्ट्रेलियन गोलदांजांच्या देशात ज्युनिअर तेंडुलकर हा क्रिकेट क्लब ऑफ इंडिया इलेव्हन संघासाठी जागतिक ट्वेंटी-20 मालिकेअंतर्गत खेळत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
श्रेष्ठत्वाची परंपरा अविरत ठेवण्यासाठी तो ऑस्ट्रेलियातले महान क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या नावानं असलेल्या मैदानावर खेळला.
साऊथ वेल्सच्या ब्रॅडमन ओवल इथं चार ओव्हरमध्ये चार विकेट घेणाऱ्या जुनियर तेंडुलकरनं मग 27 बॉलमध्ये 47 रन काढत त्याची उत्तम बॅटिंगही सिद्ध केली.
"मी लहान असताना फुटबॉल, स्विमिंग, रनिंग, तायक्वांदो यासारखे खेळ खेळायचो," तो रहस्य उघड करतो" आणि नंतर जसजसा क्रिकेटमध्ये रस वाढत गेला तसतसे इतर खेळ मागे पडत गेले."
त्याच्या या निर्णयावर वडिलांचा प्रभाव होता का? तो सांगतो, "त्यांनी मला खूप मदत केली, पण कधीही त्यांनी निर्णयासाठी दबाव आणला नाही."
पण भविष्यात त्याला क्रिकेटमध्येच करिअर करायचं आहे का? असं विचारल्यावर त्याने पुन्हा, आपल्या वडिलांनी 100 आंतरराष्ट्रीय शतकांदरम्यान दाखविलेल्या त्याच तल्लखपणानं उत्तर दिलं, "होय, मी कसोशीनं त्यासाठी प्रयत्न करतोय. तेच माझं अंतिम स्वप्न आहे."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








