प्रेस रिव्ह्यू : आगे कुटुंबाचं पुनर्वसन राज्य सरकारकडून

फोटो स्रोत, SUDHARAK OLWE
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील आगे कुटुंबाचं पुनर्वसन राज्य सरकारकडून केलं जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, आगे कुटुंबातील एका व्यक्तीस सामाजिक न्याय विभागात नोकरी देण्यासह कुटुंबासाठी घर आणि शेतजमीन दिली जाणार आहे.
कुटुंबाचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असून नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवलं आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगे कुटुंबाच्या पोलिस संरक्षणात वाढ केली जाणार आहे. दोन पोलिस कर्मचारी संरक्षणासाठी दिले जाणार आहेत. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना गृह विभागास दिल्याचे मंत्री बडोले यांनी सांगितले.
'२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप दोन आकड्यावर येईल'

फोटो स्रोत, Getty Images
जात-धर्म बाजूला ठेवून देशाची जनता कामगार, शेतकरी आणि युवा म्हणून मतदान करेल तेव्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप दोन आकड्यावर येईल, असं मत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केलं.
लोकसत्ताच्या वृत्तानुसार, पुण्यात भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानानिमित्त आयोजित एल्गार परिषदेत मेवाणी बोलत होते.
"गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची दीडशे जागांची घमेंड आम्ही ९९ जागांवर आणून ठेवली", असं मेवाणी म्हणाले.
"अंबानी आणि अदानी ही देशातील सर्वात मोठी ब्राह्मणवादी ताकद आहे", असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
चार वर्षं विकासाच्या गप्पा मारणारे मोदी निवडणुकीच्या वेळी 'राम विरुद्ध हज'ची भाषा बोलतात. 'हज' म्हणजे हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश. संसदेत आणि विधानसभेत नाही तर रस्त्यांवरील जनआंदोलनांतूनच क्रांती होणार आहे.
१४ एप्रिल रोजी नागपूरला येऊन मी 'संघ समाप्ती'ची घोषणा करेन, असेही मेवाणी यांनी सांगितले.
संसद कँटीन स्टाफला उच्च दर्जाचं प्रशिक्षण
नामांकित हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 101 नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय पहिल्यांदाच रेल्वेनं घेतला आहे. हे कर्मचारी पुढील वर्षात संसदेच्या कँटीनमध्ये सेवा देतील.

फोटो स्रोत, Getty Images
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, नवीन धोरणात्मक निर्यणानुसार, संसदेतील केटरींग स्टाफ हा प्रशिक्षित असला पाहिजे. रेल्वेनं यासाठी हॉटेल मॅनेजमेंटमधील डिप्लोमाधारक स्टाफची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनापासून संसदेच्या कँटीनमध्ये नवीन बदल दिसून येतील. संसद केटरींग स्टाफपैकी 100 जागा रिक्त असून या रिक्त जागांवर आता प्रशिक्षित स्टाफ भरला जाणार आहे.
संसदेत चहा 3 रुपये, डाळ 5 रुपये आणि संपूर्ण शाकाहारी भोजन 50 रुपयांपेक्षा कमी दरात मिळतं.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








