जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहक म्हणून मिळालेले हे 6 हक्क तुम्हाला माहीत आहेत?

फोटो स्रोत, REBECCA CONWAY/getty
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
आज ( 24 डिसेंबर) जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. त्यानिमित्तानं ही बातमी पुन्हा शेअर करत आहोत.

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना काय असतात तुमचे हक्क आणि जबाबदाऱ्या याची माहिती करून देणारे हे 6 मुद्दे.
प्रत्येक ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी असं ग्राहक चळवळीचं म्हणणं आहे.
ग्राहकांनी चोखंदळ आणि चिकित्सक असायला हवं जेणेकरून आपली कुणी फसगत करणार नाही.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. त्यांची माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही.
1) सुरक्षेचा हक्क
आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं.
आपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नाही तर त्या वस्तू सुरक्षितही असाव्यात. इलेक्ट्रिकल उत्पादनं घेताना ही काळजी घेणं आवश्यक आहे.
वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसंच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात.
या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते.
2) माहितीचा हक्क
एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे.

फोटो स्रोत, BERTRAND GUAY/getty
एखादं उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही.
सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.
3) निवड करण्याचा अधिकार
आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ब्रॅंडच्या वस्तू दुकानदार विकत घेण्यास सांगत असेल तर लक्षात घ्या की, हे तुमच्या हक्कांचं उल्लंघन आहे. (अपवाद फक्त विशिष्ट ब्रॅंडच्या आउटलेटचा.)

फोटो स्रोत, Justin Sullivan/getty
समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही शीतपेय मागितलं. पण वेटरनं म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच कंपनीचं शीतपेय मिळेल तर हे तुमच्या हक्कांविरोधात आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे.
4) तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क
जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारनं तक्रार निवारण केंद्र आणि ग्राहक न्यायालयांची स्थापना केली आहे.
इतकंच नाही तर ग्राहक त्यांच म्हणणं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करू शकतात.
या ग्राहक मंचाचं शिष्टमंडळ आपलं म्हणणं सरकारकडे मांडू शकतं. सरकार त्यांच्या सूचना आणि शिफारसींवर विचार करतं.
5) तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क
जर ग्राहकाची फसगत झाली असेल तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. जर तक्रार रास्त असेल तर तिचं निवारण होईल असा हक्क कायद्यानं ग्राहकाला दिला आहे.
कधीकधी एखादी तक्रार लहान असू शकते पण तरी देखील त्याविरोधात दाद मागता येऊ शकते.
6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार
ग्राहक हक्क शिक्षणाच्या अभावामुळं ग्राहकांची फसवणूक होते असं ग्राहक हक्क चळवळ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, तसंच स्वयंसेवी संस्था शिबिरं किंवा कार्यशाळा घेत असतात.
"ग्राहक शिक्षणावर सगळ्यात जास्त भर असायला पाहिजे. जेणेकरून प्रत्येक ग्राहक सक्षम होईल," असं मत मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभाग प्रमुख वसुंधरा देवधर यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य
ग्राहकांना केवळ हक्कच आहेत असं नाहीत. त्यांच्या काही जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्यं देखील आहेत याची जाणीव देखील त्यांना असायला हवी.

फोटो स्रोत, Getty Images
ग्राहकांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, एगमार्क आणि ISO प्रमाणित उत्पादनं विकत घ्यावीत. "प्रमाणित केलेली उत्पादनं सुरक्षेची एकप्रकारे हमी देतात, म्हणून ती घेणं योग्य ठरतं," असं देवधर यांनी सांगितलं.
ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार निवारण केंद्र आहेत, पण आपल्या जागरूकतेमुळे प्रशासकीय यंत्रणेवरील तणाव कमी होऊ शकतो आणि सर्वांचा वेळ वाचू शकतो.
तुम्हाला हे माहीत आहे का?
काही गोष्टींची माहिती नसल्यामुळं ग्राहकांना कधीकधी त्रास सहन करावा लागल्याची उदाहरणं आहेत.
1. कोणत्याहीहॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता
इंडियन सराईज अॅक्टनुसार तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिऊ शकता आणि त्यांचे स्वच्छतागृह वापरू शकता ते ही अगदी मोफत. पण तुम्ही त्या हॉटेलमध्ये काही घेतलं नाही तरी देखील या दोन सेवांचा वापर तुम्ही करू शकता.
2. जागो ग्राहक जागो! ही जाहिरात घराघरांत कशी पोहचली?
'जागो ग्राहक जागो' ही जाहिरात घराघरांत पोहचली आहे. ही जाहिरात दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर यावी यासाठी ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सरकारकडे शिफारस केली होती.
"जाहिरातीसाठी असणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी आणि एक मोहीम सुरू करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली होती. ती केंद्र सरकारनं मंजूर केली," असं ग्राहक हक्क चळवळ कार्यकर्ते आणि ऑनलाइन कंज्युमर फोरमचे संस्थापक अध्यक्ष बिजोन मिश्रा यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Government of india
"एमआरपीवर देखील किंमत कमी करता येऊ शकते हा संदेश घराघरांत याच मोहीमेमुळे पोहोचला होता," असं मिश्रा म्हणाले.
3. सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही
एक किंवा दोन रुपये सुटे नाहीत म्हणून बऱ्याचदा दुकानदार एक रुपयाच्या गोळ्या किंवा चॉकलेट देतात.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/getty
चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांना नाही. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपण न मागता एखादी वस्तू आपल्याला विकणं हे ग्राहक कायद्याचं उल्लंघन आहे.
4. दिलेलं वचन न पाळल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते
जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता.

फोटो स्रोत, MANAN VATSYAYANA/getty
2015साली एक प्रकरण खूप गाजलं होतं. जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणं आपण गोरं झालो नाही असं म्हणत एका युवकानं एका फेअरनेस क्रीम कंपनीवर दावा केला होता.
दिल्लीच्या ग्राहक हक्क न्यायालयात या दाव्यावर सुनावणी झाली. न्यायालयानं कंपनीला दंड ठोठावला आणि जाहिरातीचे प्रसारण बंद करावे असे आदेश दिले होते.
5. शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तेचे निकष न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
100% प्लेसमेंटची जाहिरात दिली पण नोकरी मिळाली नाही तर विद्यार्थ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण होतो.

फोटो स्रोत, Justin Sullivan/getty
अनेक संस्था माहितीपत्रकावर अनेक गोष्टींची आणि अत्युच्च गुणवत्तेची आश्वासनं देतात पण ती पूर्ण करत नाहीत. त्या संस्था न्यायालयीन कारवाईसाठी पात्र ठरू शकतात.
6. रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्यास कारवाई होऊ शकते.
रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे नुकसान झाले तर रुग्णालयावर कारवाई होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
जर रुग्णालयानं काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत.
जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
7. चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही
चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाही.
खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणं कायद्यानं गैर आहे, असं ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
जर एखादं चित्रपटगृह खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी घालत असेल तर नागरिकांनी यासंदर्भात तक्रार करावी, असं आवाहन ग्राहक चळवळीकडून केलं जातं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








